esakal | अग्रलेख : ‘प्रकाशपर्वा’त गरज संयमाची
sakal

बोलून बातमी शोधा

अग्रलेख : ‘प्रकाशपर्वा’त गरज संयमाची

दिवाळी आपण संयमाने साजरी करून ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्याला साथ देऊच; पण त्यापलीकडले अनेक प्रश्‍न आहेत. त्यातील सर्वांत मोठा विषय हा राज्यातील शाळा आणि महाविद्यालये कधी सुरू होणार, हा आहे.

अग्रलेख : ‘प्रकाशपर्वा’त गरज संयमाची

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

भारतातील सणासुदीच्या मोसमातील उत्सवांचा राजा असलेला दिवाळीचा उत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला असून, गेल्या सहा-आठ महिन्यांतील ठाणबंदीचा अतोनात कंटाळा आलेले लोक खरेदीसाठी बाजारात गर्दी करीत आहेत. अर्थात, ठाणबंदी काही प्रमाणात का होईना शिथिल झाल्यापासूनच सार्वजनिक ठिकाणी गर्दीला उधाण येऊ लागले आहे. मात्र, ही गर्दी कोरोना विषाणूच्या संसर्गाचे भान सुटलेली गर्दी आहे. या गर्दीला चेहरा आहे तो मास्क न घातलेला आहे आणि शारीरिक दुरस्थतेचे भान तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था गतिमान झाल्यापासूनच सुटले आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेचे कान टोचले आहेत, असेच त्यांच्या संवादातून स्पष्ट झाले आहे. खरे तर मुख्यमंत्री या नात्याने उद्धव हे आपली जबाबदारी कठोरपणे पार पाडत असल्याचेच अद्याप त्यांनी प्रार्थनास्थळे खुली न केल्यामुळे स्पष्ट झाले होते आणि या संवादातूनही त्यांनी दिवाळीतही मंदिरांच्या बाहेरूनच आपल्याला हात जोडावे लागणार, हे ठामपणे सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेला काही पार्श्‍वभूमी आहे आणि ती गेल्या सात आठवड्यांनंतर प्रथमच ‘कोरोना’बाधितांच्या संख्येत हळूहळू का होईना, होत असलेल्या वाढीची आहे. त्यामुळेच ऐन दिवाळीतील ही विनामास्कची गर्दी आपल्याला बिलकूलच परवडणारी नाही. त्याचे आणखी एक प्रमुख कारण म्हणजे इटली, स्पेन, नेदरलॅंड, ब्रिटन या युरोपातील देशांत ‘कोरोना’ची दुसरी लाट आली असून, काही देशांना पुनश्‍च एकवार ठाणबंदी लागू करणे भाग पडले आहे. अशीच दुसरी लाट दिवाळीनंतर आपल्या देशातही येऊ शकते, असा अंदाज वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविला आहे. तसे झाल्यास पुन्हा ठाणबंदी लागू करणे भाग पडेल आणि ते नुकतीच कुठे गती घेऊ पाहत असलेल्या अर्थव्यवस्थेला पुनश्‍च ‘ब्रेक’ लावणारे ठरेल. ‘कोरोना’ची ही दुसरी लाट ‘त्सुनामी’सारखी प्रचंड ठरू शकते, असा इशारा तज्ज्ञांच्या हवाल्याने मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. त्यामुळे दिवाळीचे हे ‘प्रकाशपर्व’ सर्वांनी संयम राखून आणि शारीरिक दुरस्थतेचे नियम पाळत, मास्क लावूनच साजरे करण्याशिवाय आपल्यापुढे पर्याय उरलेला नाही.

दिवाळीच्या या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे फटाक्‍यांची आतषबाजी. मात्र, त्यामुळे होणाऱ्या दणदणाटामुळे उपद्रव तर होतोच; शिवाय प्रदूषणातही बेसुमार वाढ होते. हे प्रदूषण एरवीही न परवडणारेच असते. पण, यंदा ‘कोरोना’च्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर तर ते कटाक्षाने टाळायला हवे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी फटाक्‍यांच्या आतषबाजीला स्वयंस्फूर्तीने लगाम घालण्याचे आवाहन केले आहे. देशातील काही राज्यांनी फटाक्‍यांवर यंदा बंदी लागू केली आहे आणि राजधानी दिल्ली, तसेच परिसरात तर राष्ट्रीय हरित लवादानेच थेट ३० नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण फटाकाबंदी लागू केली आहे. या पार्श्‍वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या या फटाकेबंदीच्या आवाहनास जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद द्यायला हवा. मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनास २४ तास उलटायच्या आत मुंबईत केवळ लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच आणि तेही खासगी जागेतच फटाक्‍यांना परवानगी असल्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्‍तांनी काढले आहेत. त्याचे अनुकरण खरे तर राज्यातील सर्वच प्रशासकीय यंत्रणांनी करायला हवे. फटाक्‍यांचा आणि अन्य सणांच्या वेळी होणारा ‘डीजे’चा दणदणाट याविरोधात ‘सकाळ’ने कायमच ठाम भूमिका घेतली असून, त्यास प्रतिसादही मिळत आहे. यंदा लोक संयम पाळतील आणि दणदणाट तसेच प्रदूषण, यापासून कोसो मैल दूर असे प्रकाशपर्व दिव्याच्या उत्सवात उभे करतील, अशी आशा आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अर्थात, येणारी दिवाळी आपण संयमाने साजरी करून ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्याला साथ देऊच; पण त्यापलीकडले अनेक प्रश्‍न आहेत. त्यातील सर्वांत मोठा विषय हा राज्यातील शाळा आणि महाविद्यालये कधी सुरू होणार, हा आहे. मार्चच्या उत्तरार्धात गुढीपाडव्यापासून ठाणबंदी जारी झाली आणि यंदाचे पहिले शैक्षणिक सत्र ‘कोरोना’ नामक विषाणूने गिळूनच टाकले. आता दिवाळी आली, तरीही शाळेची घंटा वाजू शकलेली नाही. त्यामुळे यासंदर्भात नेमका काय निर्णय घ्यायचा, या पेचात राज्य सरकार अडकले आहे. लोकांनी दिवाळीत संयम पाळला आणि या लढ्याचे नियम कसोशीने पाळले तर नववी ते बारावीचे वर्ग सुरू होऊ शकतील. अर्थात, ते तुमच्या-आमच्या वर्तनावरच अवलंबून आहे. ऑनलाइन शिक्षणाचे डिंडीम वाजत असले तरी ग्रामीण भागात, तसेच गरीब वर्गात त्या संकल्पनेचा बोजवारा वाजला आहे. त्यामुळे शक्‍य तितक्‍या लवकर शाळा-महाविद्यालयांचे वर्ग भरायला हवेत. शिवाय, त्यापलीकडची आणखी एक बाब म्हणजे ‘कोरोना’ने अनेकांचे रोजगार आणि नोकऱ्या हिरावून घेतल्या आहेत. त्यामुळे दिवाळीनिमित्त घराघरांत दिवे लुकलुकत असले तरी अशा लोकांच्या घरात आशेची किमान एकतरी पणती तेवत राहील, हीदेखील आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळेच यंदाचा हा दीपोत्सव संयमाने आणि सर्वांना सोबत घेऊन साजरा करायला हवा, तरच प्रकाशाचा हा सण खऱ्या अर्थाने आपण साजरा केला, असे म्हणता येईल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

loading image