esakal | अग्रलेख : वर्णद्वेषाची विषवल्ली 
sakal

बोलून बातमी शोधा

अग्रलेख : वर्णद्वेषाची विषवल्ली 

गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ जगाचे पुढारपण करणाऱ्या अमेरिकी महासत्तेलाही वर्णद्वेषाची विषवल्ली आपल्या व्यवस्थेतून उपटून काढता आलेली नाही, हे विदारक वास्तव पुन्हा एका घटनेने समोर आणले आहे.

अग्रलेख : वर्णद्वेषाची विषवल्ली 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कायद्यासमोर सर्व समान, प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा यासारख्या तत्त्वांवर आधारित कायदेकानूंचा नुसता सांगाडा तयार करून भागत नाही; त्यात त्या मूल्यांचा प्राण असावा लागतो. ती खोलवर रुजलेली असली, तर समाजात, प्रशासनात, राज्यव्यवस्थेत त्याचा पदोपदी अनुभव येतो. तसे नसेल काय होते याचे प्रत्यंतर अनेक विकसनशील देशांत येत असते आणि तिथल्या कथित लोकशाहीची लक्तरेही जगाच्या वेशीवर टांगली जात असतात. परंतु गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ जगाचे पुढारपण करणाऱ्या अमेरिकी महासत्तेलाही वर्णद्वेषाची विषवल्ली आपल्या व्यवस्थेतून उपटून काढता आलेली नाही, हे विदारक वास्तव पुन्हा एका घटनेने समोर आणले आहे. मिनिपोलीस शहरात जॉर्ज फ्लॉइड नावाच्या कृष्णवर्णीय नागरिकाला गोऱ्या पोलिसाने ज्याप्रकारे गुदमरवून मारले, तो निव्वळ पोलिसी खाक्‍या नव्हे, तर "वर्णद्वेषी पोलिसी खाक्‍या' होता, असे म्हणावे लागेल. त्या घटनेचा व्हिडिओ माध्यमांतून व्हायरल झाल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

असा काय गुन्हा केला होता जॉर्ज फ्लॉइड यांनी? एका दुकानातून काही खरेदी करून ते बाहेर पडले. त्यांनी दिलेली नोट बनावट आहे, असा संशय आल्याने दुकानदाराने तत्काळ पोलिसांना फोन केला. रस्त्यात अडवून एका गोऱ्या पोलिसाने त्यांना खाली पडले आणि आपला गुडघा त्यांच्या मानेवर दाबून धरला. श्वास घेता येत नाही म्हणून ते आकांत करत असतानाही, ना त्या पोलिसाच्या संवेदना जाग्या झाल्या, ना बरोबरच्या पोलिसांना हा प्रकार थांबवावा असे वाटले. भर रस्त्यावरच्या या "थर्ड डिग्री'ने तेथील एकूण कारभाराच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. गेले सहा दिवस न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, लॉस एंजेलिससह जवळजवळ 75 शहरांमध्ये उग्र निदर्शने सुरू आहेत. अनेक ठिकाणी जाळपोळ आणि हिंसाचाराचे प्रकारही घडले. परिस्थिती अद्यापही आटोक्‍यात आलेली नाही. ही मूळ घटना जेवढी धक्कादायक, तेवढाच ट्रम्प प्रशासनाने त्याला दिलेला प्रतिसाद. वास्तविक घटनेचा पूर्ण तपशील जाणून घेतल्यानंतर काही निवेदन करणे अध्यक्षपदावरच्या व्यक्तीकडून अपेक्षित असते. पण संकेत, संयम यांचीच ऍलर्जी असलेले डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून तशी काही अपेक्षा करणेही वेडेपणाचे ठरेल. "जिथे लूटमार होते, तिथे गोळीबारही होतो', असली भाषा त्यांनी वापरली. परिस्थिती फारच हाताबाहेर जात आहे, असे दिसल्यानंतर तब्बल पाच दिवसांनी जॉर्ज यांच्या नातलगांना त्यांनी सांत्वनाचा फोन केला, तोही कमालीचा कोरडा. मुळात ही भीषण घटना घडल्यानंतर सरकारने तत्परतेने पावले टाकायला हवी होती. पण सरकार हलले ते निदर्शनांचा वणवा पसरू लागल्यानंतर. प्रत्येक प्रतिकूल घटनेमागे आपले विरोधक आहेत, असा ठाम विश्वास असलेले आणि शत्रुकेंद्री राजकारणावर भिस्त ठेवणारे ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना "प्रतिनिदर्शने करा', असा सल्ला दिला. या सगळ्या घटनांकडे ते किती कोत्या दृष्टिकोनातून पाहत आहेत, हेच यातून दिसले. कोरोना विषाणूच्या संसर्गाने मृत्यू पावलेल्यांचा आकडा एक लाखांवर गेला असताना, सर्व लक्ष हा संसर्ग आटोक्‍यात आणण्यावर केंद्रित करण्यापेक्षा रोजच्या रोज चीनच्या नावाने खडे फोडण्यात त्यांना धन्यता वाटते. हाही शत्रुकेंद्री राजकारणाचाच भाग. गोरे म्हणजे श्रेष्ठ ही भावना अद्यापही अमेरिकेतील अनेकांच्या मनात रुतून बसलेली आहे. परंपरावादी रिपब्लिकन पक्ष अशांचे प्रतिनिधित्व करतो, हे कधीच लपून राहिलेले नाही. "आधीच रिपब्लिकन... त्यात ट्रम्प' अशी सध्याची अमेरिकेची अवस्था आहे. त्यामुळे जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांना शिक्षा होईल काय, याची शंका आहे. पोलिसांना असलेले अनिर्बंध अधिकार, त्यांचे पक्षपाती वर्तन आणि व्यवस्थेत अद्यापही कृष्णवर्णीयांना मिळणारी सापत्न वागणूक हे मुद्दे खरे म्हणजे या घटनेनंतर ऐरणीवर यायला हवेत. पण त्यात अध्यक्षांना रस नाही. या पद्धतीच्या राजकारणामुळे अमेरिकी व्यवस्थेतील दुभंगलेपण आणखीनच तीव्र होत आहे. हे खरे की जॉर्ज यांना न्याय मिळाला पाहिजे, या मागणीसाठी अनेक गोरे नागरिकही रस्त्यावर उतरले आहेत. त्या सगळ्यांची डेमोक्रॅटिक पक्षाचे हस्तक अशी संभावना करणे चूक ठरेल. जॉर्ज यांचा मृत्यू आणि त्यानंतरचे आंदोलन यानंतर लॉस एंजेलिसचे महापौर एरिक ग्रॅसेटी यांनी काढलेले उद्गार सगळ्यांच्याच डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे ठरावेत. ते म्हणाले, "लेट अस लर्न लेसन, लेट अस रिह्युमनाइज इचअदर.' "मानसा, मानसा कधी व्हशील मानूस?', या बहिणाबाईंच्या प्रश्नाची आठवण करून देणारे हे उद्गार आहेत. राष्ट्राच्या आत्मसन्मानाची जी भाषा रिपब्लिकन पक्ष करतो, तो केवळ आर्थिक, उद्योगिक आणि तंत्रज्ञानातील प्रगतीचा परिपाक नसतो. प्रत्येक व्यक्तीला प्रतिष्ठा हे आधुनिकतेचे एक महत्त्वाचे मूल्य आहे आणि त्याचेच आपण पाईक आहोत असेच अमेरिका जगाला सांगत आली आहे. त्या वारशाकडे पाठ फिरवून "अमेरिका महान'चा डिंडीम पिटणे ही फार मोठी आत्मवंचना ठरेल. 

loading image