
विठ्ठलराया हा लोकांचा देव. त्याला सोवळे-ओवळ्याचा बडिवार नाही. पंक्तिप्रपंचाचा ताप नाही. सारे पंथ नि संप्रदाय विठ्ठलचरणी एक होतात आणि मनुष्य आणि ईश्वराचे एक विस्मयकारक अद्वैत तेवढे दृग्गोचर होते.
एरवी आषाढी एकादशीच्या निव्वळ उल्लेखाने वारकऱ्यांच्या हृदयात हुरहूर दाटून येते. आभाळात दाटून आलेला मेघुराया त्या तिथे पंढरीत तिष्ठत उभ्या राहिलेल्या विठुरायाचा जणू सांगावा घेऊन आलेला असतो. नि:शब्द ममताळूपणाने तो मेघदूत सांगत असतो, ‘‘बाबांनो, बाइयांनो, घटकाभर हा प्रपंचाचा भार खाली ठेव. डोईवर तुळशी वृंदावन घे आणि दक्षिणेकडे चालू लाग. तिथे तो साऱ्या जगताचा राणा तुझी वाट पाहतो आहे.’’ मन उचंबळू येते, चंद्रभागेच्या तीरी धावू पाहते. मनातल्या मनात टाळचिपळ्या घुळघुळू लागतात. मृदंगाचा नाद मोहवू लागतो. शतकानुशतकांच्या भक्तिसिंचनाने फांद्याफांद्यांनी वाढून गगनाला भिडलेला भागवतधर्माचा विशाल अश्वत्थ चैतन्याने सळसळू लागतो. मग पीकपाण्याची कामे भराभरा मार्गी लागतात. शहरगावच्या चाकरमानी वारकऱ्यांच्या सुट्यांचे अर्ज खरडले जातात. गावागावांतून भागवतांच्या वाऱ्या-पालख्या ग्यानबा-तुकाराम असा गजर करत निघतात आणि त्यांच्या संगतीने लाखो प्रापंचिकांची पावले पंढरीची वाट चालू लागतात. घाट रस्ते गजबजतात. मुक्कामाच्या ठिकाणी आमटीभाताचे टोप उठतात. कुणी दमगीर वारकऱ्यांचे पाय चेपून देते, कुणी त्यांना भजने म्हणून रिझवते. कुणी वैद्यकातला तज्ज्ञ दवापाण्याची सोय पाहतो. अवघा महाराष्ट्र एकसंध होतो. ‘एक तत्त्वनाम दृढ धरी मना’ या संतोपदेशाची वर्तमानातली ही प्रतीती भल्या भल्या समाजशास्त्रींना तोंडात बोटे घालावयास लावणारी. लाखो वारकऱ्यांचा हा शिस्तबद्ध यात्रासोहळा डोळ्यांचे आणि मनाचे पारणे फेडणारा असाच असतो. पण औंदाची वारी मात्र अपवाद आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
यंदा दिवेघाटातली ती वारकऱ्यांची रांग नाही. ठिकठिकाणी माणसांनी फुललेली मुक्कामाची गावे नाहीत. वैद्यकीय शिबिरे नाहीत. भाकऱ्यांच्या चळती आणि आमटीभाताचे टोप नाहीत. डोईवर तुळशी वृंदावन नाही आणि हातात टाळमृदंग घेऊन वाजतगाजत जाणारा जनांचा प्रवाहो नाही. ठराविक रिंगणेदेखील शास्त्रापुरती झाली. मात्र यात अक्षुण्ण राहिली ती सहिष्णुतेची, सामंजस्याची संतांची शिकवण. साथीच्या संकटाला तोंड देताना कोणत्याच प्रकारची गर्दी सार्वजनिक हिताला बाधक ठरेल, त्यामुळे नेहमीच्या पद्धतीने वारी करण्यावर हटून न बसता वारकऱ्यांनी सामंजस्य दाखवले आणि परंपराही जपली. संतांच्या पालख्या आपापल्या स्थानापासून एसटी बसने निवडक वीस-वीस वारकऱ्यांसमवेत शांतपणे पंढरीला येऊन ठेपल्या. यंदा प्रथमच ऐन वारीत पंढरपूरच्या रस्ते नि गल्लीबोळात तुरळकच गर्दी असेल. सोळखांबीत घुमणारा गजर क्षीण असेल. विठ्ठलभक्तांची ती रेटारेटी नसेल. अभावातही उराशी भाव जपणाऱ्या तमाम मराठी भक्तांच्या मांदियाळीकडे पाहून तो कानडाऊ विठ्ठल कानकोंडा होईल का? एकाच वेळी सत्राशेसाठ अरिष्टचे मोहोळ उठून दमगीर झालेल्या महाराष्ट्राला तो नि:शब्द दिलासा देईल का?
विठ्ठलराया हा लोकांचा देव. त्याला सोवळे-ओवळ्याचा बडिवार नाही. पंक्तिप्रपंचाचा ताप नाही. सारे पंथ नि संप्रदाय विठ्ठलचरणी एक होतात आणि मनुष्य आणि ईश्वराचे एक विस्मयकारक अद्वैत तेवढे दृग्गोचर होते. असा देव अन्यत्र कुठे नसेल आणि असा भक्तगणही कुठे शोधता येऊ नये! भागवतांच्या गर्दीत सदासर्वकाळ रमलेला हा विठुराया यंदा मात्र काहीसा एकुटवाणा राहिला. एका विषाणूने आणलेल्या या अरिष्टाने हे अद्वैतच जणू नाकारले. ज्या मुखाने हरिनामाचा मुक्तपणाने गजर करायचा, त्या मुखावरच पट्टी आली. ऊराऊरी भेटायचे, तिथे ‘दो गज की दूरी’ पाळण्याचे बंधन आले. अधीरतेने जिथे लोटांगण घालायचे तिथे हस्तस्पर्शदेखील टाळणे आले. या चुटपुट दर्शनाने ना भक्ताचे समाधान होणार, ना त्या भावाच्या भुकेल्या विठ्ठलाचे. पण यंदाची वारीच आपल्या ‘आंतुल्या’ विठ्ठलाला साद घालणारी आहे, असे मानणे श्रेयस्कर ठरावे. विज्ञानानेच घालून दिलेले नियम पाळावेच लागणार, कारण हे विज्ञानदेखील त्या विठ्ठलाच्याच सृष्टीचा भाग नाही का? विठ्ठलासाठी एरवी एवढे आग्रही राहणाऱ्या वारकऱ्यांनी स्वत:हून हे विषाणूने लादलेले बंधन स्वीकारले. शहरगावातील तथाकथित सुशिक्षितांना आजही ‘सामाजिक अंतर राखा, सोशल डिस्टन्सिंग पाळा’, असे वारंवार सांगावे लागते. तरीही रस्त्यांवरली वाहनांची गर्दी हटता हटत नाही. शिस्तीचा बडगा दाखवल्याशिवाय शहरी वावर कमी होत नाही. त्यांना वारकरी संप्रदायाने खरा मार्ग दाखवला आहे. आध्यात्मिकांनी त्यांना विज्ञानाचा मार्ग उदाहरणासहित घालून द्यावा, यातच सारे काही आले! तुकोबामाउली म्हणतात त्याप्रमाणे-
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
जन विजन जाले आम्हां। विठ्ठलनामा प्रमाणें।
पाहें तिकडे बाप माय। विठ्ठल आहे रखुमाई।
वन पट्टण एक भाव। अवघा ठाव सरता जाला।
आठव नाही सुखदु:खा। नाचे तुका कौतुकें।।
या भावानुभवातूनच आपण शहाणे व्हायचे. मनातल्या मनात ते अद्वैत जपायचे. वारकऱ्यांमधले काही महानुभाव म्हणतात त्याप्रमाणे, यंदाची वारी ही झुरणीची वारी आहे. आपण विठुरायासाठी झुरायचे, त्याने आपल्यासाठी.