esakal | अग्रलेख : बिहारी बिगूल 
sakal

बोलून बातमी शोधा

bihar-election

कॉंग्रेसने राज्य गमावले आणि लालूप्रसाद यादव मुख्यमंत्री झाले, तेव्हा नितीश लालूंसोबतच जनता दलात होते! दरम्यानच्या काळात एकीकडे "जब तक समोसा में आलू, तब तक बिहार में लालू!' अशा गर्जनाही व्हायच्या.

अग्रलेख : बिहारी बिगूल 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बिहारचे राज्य कॉंग्रेसने गमावले, त्यास यंदा 30 वर्षे पूर्ण होत असतानाच, कोरोनाच्या सावटाखाली होत असलेल्या निवडणुकीत तेथील जनता पुन्हा आपले राज्यकर्ते निवडण्यासाठी सज्ज आहे. या तीन दशकांच्या काळात काही महिन्यांचा अपवाद वगळाता, नितीश कुमारच 15 वर्षे मुख्यमंत्री होते. मधल्या आठ-दहा महिन्यांच्या काळात त्यांनीच प्यादे म्हणून त्या पदावर बसवलेल्या जितनराम मांझी यांनी सूत्रे सांभाळली होती. याच मुख्यमंत्रिपदाच्या शेवटच्या सत्रात कट्टर धर्मनिरपेक्ष, विकासपुरुष आणि मोदी विरोधक ते थेट प्रखर राष्ट्रवादी आणि मोदी समर्थक असे नितीशकुमार यांच्यात झालेले आमूलाग्र परिवर्तनही बिहारी जनतेने पाहिले. याच परिवर्तनानंतर 2019मधील लोकसभा निवडणुकीत बिहारच्या मतदारांनी नितीशकुमारांचे जनता दल (यू) आणि भारतीय जनता पक्ष यांच्या आघाडीला भरभरून मते दिली. अर्थात, तेव्हा ती मते नितीशकुमारांसाठी नव्हे, तर नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी पुनश्‍च आणण्यासाठी होती. आता नितीशकुमार भाजपच्या खांद्याला खांदा लावून मुख्यमंत्रिपदासाठी मैदानात उतरले आहेत. प्रस्थापितविरोधी जनभावनेला तोंड देण्याचे आव्हान सत्ताधाऱ्यांना नेहमीच भेडसावते, अशावेळी मूलभूत प्रश्‍नांपेक्षा अस्मितेचे आणि भावनिक प्रश्‍न मुद्दाम तापवले जातात. सध्या या राज्यातही तसेच दिसते आहे. दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूचे गूढ हा असाच एक अस्मितेचा मुद्दा. ही निवडणूक सुशांतच्या तथाकथित "गूढ' मृत्यूचा भावनिक मुद्दा उपस्थित करून लढवणार हे भाजपने निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याच्या महिनाभर आधीच आपल्या पोस्टरवर सुशांतचा फोटो लावून स्पष्ट केले होतेच. बिहारमधील अठराविश्‍वे दारिद्य्र तसेच कोरोना काळात झालेले बिहारी स्थलांतरित मजुरांचे अतोनात हाल यांचा मागमूसही महिनाभराच्या प्रचारात दिसलेला नाही. त्या पलीकडेही या निवडणुकीस आणखी एक पदर आहे तो संसदेने शिक्‍कामोर्तब केलेल्या तीन वादग्रस्त कृषीसुधारणा विधेयकांचा. त्यामुळे ही निवडणूक नितीश-भाजप यांच्या आघाडीने जिंकलीच तर ती विधेयकांमधील सुधारणांच्या पसंतीवर उमटलेली मोहोर असेल, असे डिंडिम केंद्रातील सत्ताधारी भाजप निश्‍चितच वाजवणार, यात शंका नाही. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कॉंग्रेसने राज्य गमावले आणि लालूप्रसाद यादव मुख्यमंत्री झाले, तेव्हा नितीश लालूंसोबतच जनता दलात होते! दरम्यानच्या काळात एकीकडे "जब तक समोसा में आलू, तब तक बिहार में लालू!' अशा गर्जनाही व्हायच्या. मात्र, पशुखाद्य गैरव्यवहारातील आरोपांनंतर लालूंना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले, तेव्हा त्यांनी पत्नी राबडीदेवी यांच्या हातात बिहार देण्याची खेळी करून सर्वांना धक्‍का दिला होता. मात्र, समाजवादी वर्तुळातील फाटाफुटीनंतर पुढची काही वर्षे ते एकमेकांचे कट्टर शत्रू झाले होते. तरीही मोदी विरोधात धर्मनिरपेक्षतेचे डिंडिम पिटत जयप्रकाश नारायण यांचे एकेकाळचे हे दोन्ही शिष्य 2015 मधील निवडणुकीत एकत्र आले. नितीश यांच्यापेक्षा जास्त जागा जिंकूनही लालूंच्या "राष्ट्रीय जनता दला'ने नितीशकुमार यांनाच पुनश्‍च मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसवले. मात्र, एकत्र राज्य करतानाही या दोघांत धुसफूस होतीच. अखेरीस अवघ्या दोन वर्षांतच अत्यंत नाट्यपूर्ण पद्धतीने लालूंच्या "राजद'शी काडीमोड घेऊन, नंतरच्या 24 तासांतच नितीशकुमारांनी भाजपच्या पाठिंब्यावर पुनश्‍च सरकार बनवले! त्यामुळेच आता तुरुंगातल्या लालूंनी कॉंग्रेस तसेच अनेक छोट्या-मोठ्या पक्षांचे "महागठबंधन' उभे करून 2019 मधील लोकसभा निवडणुकीत मोदी-नितीश यांच्यासमोर आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र, या आघाडीने 44 टक्‍के मिळवत बिहारमधील 40 पैकी 33 जागा जिंकल्या. उर्वरित सातपैकी सहा जागाही याच आघाडीतील लोकजनशक्‍ती पार्टी या रामविलास पासवान यांच्या पक्षाला मिळाल्या. कॉंग्रेसने एकमात्र विजय संपादन केला खरा; मात्र लालूंनी उभ्या केलेल्या चिरंजीव तेजस्वी प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील "राजद'च्या हाती भोपळाच आला होता! 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

त्यानंतर या "महागठबंधना'च्या चिरफळ्या उडू पाहात आहेत आणि बिहारमधील जातीपातींच्या समिकरणात किमान आठ-नऊ टक्‍के मते असलेल्या कुशवाह समाजाचे नेते उपेन्द्रसिंग कुशवाह यांनी महागठबंधनाचे नेतृत्व तेजस्वी यादव यांच्याकडे ठेवण्यास विरोध केलाय. हे नेतृत्व बदलले नाही तर आपण सर्वच्या सर्व, म्हणजे 243 जागा लढवू, अशी धमकीही दिली. शिवाय, लालूंचा उजवा हात असलेले रघुवंशप्रसाद यांचेही अलीकडेच निधन झाले. त्याच्या एकच दिवस आधी त्यांनी लालूंशी असलेला प्रदीर्घ काळचा दोस्ताना तोडण्याचा मनोदय व्यक्‍त केला होता. या राजकारणात अत्यंत दुबळ्या अवस्थेतील कॉंग्रेसला "मम' म्हणत तेजस्वींच्या हाताला "हात' लावण्याशिवाय पर्याय नाही. मात्र, त्याचवेळी पास्वानांच्या प्रकृती अस्वास्थ्याच्या काळात लोकजनशक्‍ती पार्टीची सारी सूत्रे हाती आलेले चिरंजीव चिराग यांनी नितीश आणि भाजप यांच्यात लावालावी करण्याचा उद्योग आघाडीत राहूनही सुरू केलाय. एकेकाळी "विकासपुरुष' असलेल्या नितीशकुमारांच्या कारभारातील गैरव्यवहाराच्या कहाण्याही बिहारमध्ये रंगत आहेत. भाजपने तर नितीशकुमारांपुढे शरणागतीच पत्करली आहे. या पार्श्‍वभूमीवर सुशांतच्या मृत्यूचा विषय हा निवडणुकीतील मुद्दा ठरू शकतो, हे लोकशाहीचे आणि गरीब-बिचाऱ्या बिहारी जनतेचे दुर्दैवच म्हणावे लागेल. 

loading image