अग्रलेख : भाजपची मुलुखगिरी

अग्रलेख : भाजपची मुलुखगिरी

बिहार विधानसभा निवडणुकीत आखलेली रणनीती  फळास येणार, अशी चिन्हे दिसू लागताच; त्या  निवडणुकीच्या प्रचार मोहिमेत न दिसलेले अमित शहा (Amit Shah) थेट पश्‍चिम बंगालमध्ये जाऊन पोचले होते! आणि आपले सारेच मनसुबे फळास आणण्याचे काम बिहारी जनतेने चोखपणे बजावल्याचे स्पष्ट होताच, शहा यांनी आपले पुढचे लक्ष्य तमिळनाडू असल्याचे दाखवून दिले आहे. एकीकडे केंद्रीय गृह खात्याची जबाबदारी पार पाडतानाच, अमित शहा पक्षाची जबाबदारी विसरत नाहीत, याचेच प्रत्यंतर त्यांनी शनिवारी केलेल्या तमिळनाडूच्या दौऱ्यातून आले आणि त्याचवेळी गेल्या लोकसभा निवडणुकीपासून भाजपने (BJP) आखलेल्या रणनीतीचेही पुन्हा दर्शन घडले. निवडणूक लोकसभेची असो की कोणत्याही राज्याची; आपण वा आपल्या मित्रपक्षांनी काय केले, याबाबत चकार शब्द न उच्चारता आपल्या विरोधकांनी कसे काहीही काम केलेले नाही, हे दाखवून देण्यावर भाजपचा भर असतो, हे अलीकडे वारंवार निदर्शनास येत आहे. खरे तर २०१४मध्ये झालेल्या निवडणुकीत केंद्रात नरेंद्र मोदी यांचे ताज्या दमाचे सरकार आलेले असतानाही भाजपला तमिळनाडूत एकही जागा जिंकता आलेली नव्हती. मात्र, त्यामुळे जराही नाउमेद न होता शहा यांनी आपल्या घणाघाती भाषणांत द्रमुक आणि काँग्रेस आघाडीने गेल्या दहा वर्षांत तमिळनाडूसाठी काहीच कसे केलेले नाही, याचाच पाढा शहा यांनी वाचला! खरे तर २०१६मध्ये तमिळनाडूतील सत्ता राखून जयललिता यांनी सलग दुसऱ्यांदा विधानसभा जिंकून इतिहास घडविला होता. त्यामुळे आता तमिळनाडूत गेली १० वर्षे सलग अण्णा द्रमुकचेच राज्य आहे. मात्र, त्या कारभाराबाबत न बोलता शहा यांनी २००४ ते २०१४ केंद्रात काँग्रेस तसेच द्रमुकची आघाडी असतानाही तमिळनाडूच्या पदरात काहीच कसे पडलेले नाही, हे दाखवून देण्यावरच शहा यांनी आपला बहुमोल वेळ खर्ची घातला. हीच रणनीती बिहारमध्येही वापरण्यात आली होती. नितीशकुमार यांच्या १५ वर्षांच्या कारभाराविषयी बोलण्याऐवजी लालूप्रसाद यादव यांच्या तथाकथित ‘जंगलराज’वर प्रहार करण्यात मोदींनी जास्त स्वारस्य दाखविले. अर्थात, ज्या दोन राज्यांचे आव्हान भाजपला पेलायचे आहे, तिथे सामना प्रादेशिक पक्षांशी आहे. समोर काँग्रेससारखा पक्ष असेल, तर भाजपला मैदान जेवढे सोपे जाते, तशी स्थिती या दोन राज्यांत नाही. पण, भाजप पुढच्या काळाचा विचार करून तयारी करीत असल्याचे या दोन राज्यांच्या बाबतीत स्पष्ट दिसते; म्हणूनच त्याची दखल घ्यायला हवी.  

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

विशेषतः २०१३मध्ये भाजपने मोदी यांचे नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केल्यापासून ही शिस्तबद्ध प्रचार मोहीम हा त्या पक्षाच्या कार्यशैलीचा अविभाज्य घटक बनून गेला आहे. त्यामागे शहा यांनी अथक काम करण्याची प्रवृत्ती आहे तसेच देशातील सर्वच विरोधी पक्षांना नामोहरम करण्याची जिद्दही आहे. काँग्रेस तर २०१४ मधील पराभवानंतर कोषातच गेली आहे. पण, बाकी सर्वच विरोधी पक्ष मोदी आणि शहा यांनी उभ्या केलेल्या या रणनीतीमुळे गारठले असल्याचे सातत्याने बघावयास मिळत आहे. शहा यांची तमिळनाडूतील देहबोली आणि त्यांची वक्तव्ये ही बिहारमधील विजयानंतर ते किती आक्रमक झाले आहेत, त्याचेच दर्शन घडवत होती. त्यातच मोदी नामाचा महिमा अद्याप कायम असल्याचे बिहारमध्ये बघावयास मिळाल्यामुळे या आक्रमकतेला आत्मविश्वासाचीही जोड मिळाली आहे. त्यामुळेच पुढच्या वर्ष-सहा महिन्यांत होऊ घातलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवरच भाजपने कसे लक्ष केंद्रित केले आहे, तेही स्पष्ट झाले आहे. या पाच राज्यांपैकी पश्‍चिम बंगाल आणि तमिळनाडू हीच दोन मोठी राज्ये आहेत आणि या दोन्ही राज्यांत तशा अर्थाने भाजप हा मागच्या बाकावर बसणारा पक्ष आहे. अर्थात, बंगालमध्ये भाजपने आपले बस्तान गेल्या काही वर्षांत चोखपणे बसविले आहे. मात्र, त्यानंतर आता तमिळनाडूतही या निवडणुकीच्या निमित्ताने काही जागा जिंकून चंचुप्रवेश तरी करता येईल, हे बघणे हाच शहा यांच्या या दौऱ्याचा उद्देश असणार.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गेली तीन दशके तमिळनाडूचे राजकारण करुणानिधी आणि जयललिता यांच्याभोवती फिरत होते. या दोन्ही बड्या नेत्यांच्या अनुपस्थितीत होणारी ही पहिलीच निवडणूक असेल. पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या १० वर्षांच्या राजवटीला शह देऊन सत्ता खेचून घेण्याचा भाजपचा मानस आहे, तर तमिळनाडूत पाय रोवण्यासाठी भाजपची धडपड सुरू आहे. तमिळनाडूत राष्ट्रीय पक्षांना नेहमीच दुय्यम भूमिकेत राहावे लागले आहे. त्यातून बाहेर पडणे सोपे नाही. तरीही, भाजप दक्षिण दिग्विजयाची स्वप्ने पाहणे सोडत नाही. त्या स्वप्नाचे काय होईल, हा भाग वेगळा असला, तरी हे ध्येय गाठण्यासाठी भाजपने केलेले नियोजन, हे इतर सर्व पक्षांनी लक्षात घेण्यासारखे आहे. विशेषत: काँग्रेसने काही बोध  घ्यायला हवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com