esakal | अग्रलेख : तेज मोदींचेही...
sakal

बोलून बातमी शोधा

अग्रलेख : तेज मोदींचेही...

गेल्या काही वर्षांत अनेक राज्ये भारतीय जनता पक्षाच्या हातातून निसटली होती. यंदा बिहारमध्ये भाजप तसेच नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’ला सत्ता गमवावी लागली असती, तर देशाच्या राजकारणाचा पोतच बदलला असता.

अग्रलेख : तेज मोदींचेही...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बिहारमध्ये तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय जनता दलाने दिलेल्या अटीतटीच्या झुंजीनंतरही कायम राखलेली सत्ता आणि देशाच्या विविध भागांतल्या पोटनिवडणुकांतले दणदणीत यश, यामुळे भारतीय राजकारणावर असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या वर्चस्वावर पुन्हा शिक्‍कामोर्तब झाले आहे. गेल्या काही वर्षांत अनेक राज्ये भारतीय जनता पक्षाच्या हातातून निसटली होती. यंदा बिहारमध्ये भाजप तसेच नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’ला सत्ता गमवावी लागली असती, तर देशाच्या राजकारणाचा पोतच बदलला असता. बिहारमध्ये मध्यंतरीचा, २७८ दिवसांचा अपवाद वगळता सलग १५ वर्षे नितीश यांनी मुख्यमंत्रिपद आपल्याकडे राखलेले होते. यंदा कोरोनाच्या सावटाखालच्या या निवडणुकीत तेजस्वींनी त्यांच्यापुढे कडवे आव्हान उभे केले होते. एवढेच नव्हे, तर ते करताना तेजस्वींनी निवडणुकीचा सारा अजेंडा बिहारी जनतेच्या जिव्हाळ्याच्या रोजगाराच्या प्रश्‍नाला भिडवला होता. मात्र, सर्वाधिक मोठा पक्ष ठरल्यावरही सत्तासोपानापासून तेजस्वी यांच्या ‘महागठबंधन’ला दूरच राहावे लागले. त्यामुळे आता ‘बिहारचे बॉस नरेंद्र मोदीच!’ असे मतदारांनी सांगून टाकले आहे. खरे तर तीन दशके बिहारचे राजकारण नितीशकुमार, लालूप्रसाद यादव आणि रामविलास पासवान या नेत्यांभोवतीच फिरायचे. यापैकी कोणाचाही शब्द बिहारमध्ये चालत नाही आणि अद्याप आपला करिष्मा कायम आहे, हे निकालाद्वारे मोदींनी दाखवून दिलेय. यानिमित्ताने बिहारी जनतेने पुनश्‍च ‘एक्‍झिट पोल’चा फुगाही फोडला आहे. मतदानोत्तर चाचण्या असोत, की जाणकारांची निकालाबाबतची भाष्ये; त्यातून लालूप्रसादांच्या अनुपस्थितीत ‘महागठबंधना’ची सारी धुरा एकहाती खांद्यावर घेणारे तेजस्वी यांचा ‘राष्ट्रीय जनता दल’च सर्वांत मोठा पक्ष ठरेल, अशी भाकिते वर्तविली होती. प्रत्यक्षात सत्तापालट झाला नाही आणि त्याचे सारे श्रेय केवळ मोदी यांनी केलेल्या घणाघाती प्रचाराचेच आहे. त्यामुळे नितीश पुन्हा बिहारची सूत्रे मुख्यमंत्री म्हणून हाती घेणार असले, तरी आपल्याला हे पद केवळ मोदी यांच्या आश्रयानेच मिळाले आहे, याची जाणीव त्यांना सदैव ठेवावी लागेल. मोदींच्या करिष्म्यासमोर तेजस्वींचे तेजही उठून दिसले, हेही मान्य केले पाहिजे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अर्थात, बिहारमध्ये जे काही घडले त्यामागे जाणीवपूर्वक आखलेली रणनीती होती. मुख्य म्हणजे, अमित शहा बिहारच्या दिशेने फिरकलेही नसताना ते मोदी यांनी घडवून आणले आहे. बिहारमध्ये यापूर्वी, म्हणजे २०१५मधील निवडणूक नितीश आणि लालू या जिवलग सहकारी आणि नंतरचे हाडवैरी यांनी हातात हात घालून लढवली होती. तेव्हा नितीश यांच्या जेडी(यू)ला ७१, तर लालूंच्या ‘राजद’ला ८० जागा मिळाल्या होत्या. आता भाजपने नितीश यांनी तेव्हा जिंकलेल्या ७१ जागांपेक्षा अधिक बळ संपादले आहे. म्हटले तर हा ‘चमत्कार’ आहे आणि खरे तर हे भाजपच्या सूत्रबद्ध प्रचारयंत्रणेचे यश आहे. केंद्राच्या विविध योजना जशा भाजप कार्यकर्त्यांनी घराघरांपर्यंत पोहोचवल्या, त्याचबरोबर कोरोनाकाळात बिहारच्या गोरगरीब जनतेपर्यंत शिधा पोहोचतो का नाही, यावरही कडी नजर ठेवली. त्यामुळे कोरोना काळातील ठाणबंदीनंतर हालअपेष्टा सहन करत कसेबसे घर गाठणाऱ्या स्थलांतरित बिहारींना दोन घास अन्न मिळेल, याचीही काळजी घेतली. त्यामुळेच तेजस्वींनी अजेंड्यावर आणलेला रोजगाराचा मुद्दा काहीसा फिका पडला. मोदींनी प्रचारात रोजगाराऐवजी ‘ये लोग रामनाम नहीं लेते, भारतमाता की जय नहीं कहते...’ अशी रेकॉर्ड लावली होती. त्यावर बिहारी जनता भाळली, हेच निकालाचे आकडे सांगताहेत. या निवडणुकांचे भाजप आणि मोदी-शहा यांच्या दृष्टीने आणखी एका अर्थाने महत्त्व आहे. कारण, या निकालाने नितीश यांना मोठा फटका दिलाय. पाच वर्षांपूर्वी ७१ जागा जिंकणाऱ्या नितीश यांच्या जेडी(यू)ला यंदा जेमतेम ४३ जागाच मिळाल्या आणि हेही गळ्यात गळे घालणाऱ्या भाजपने चिराग पासवान यांना मैदानात उतरवल्यामुळेच! या साऱ्या रणनीतीमुळे मोदी-शहा यांची कुटिल रणनीतीच दिसली. पण, ती मोदी यांचीच चाल होती. त्याचबरोबर बिहारमध्ये ७४ जागा मिळाल्याने भाजपच्या बिहारबाबतच्या महत्त्वाकांक्षा वाढणार, हे नक्की. त्यामुळे सत्ताधारी आघाडीतील समीकरणेही बदलण्याची शक्‍यता आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मोदी यांचा करिष्मा केवळ बिहारच नव्हे, तर मध्य प्रदेशातील कळीच्या पोटनिवडणुकांबरोबरच गुजरात, उत्तर प्रदेश तसेच अन्य राज्यांतही असल्याचे निकाल सांगत आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांच्या नेतृत्वावरही भलेमोठे प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. गांधी परिवाराचे नेतृत्व आता वरदान नव्हे, तर शाप ठरत असल्याचेच हे संकेत आहेत. त्यामुळे काँग्रेसजनांना मनावर दगड ठेवून गांधी परिवाराच्या तथाकथित करिष्म्याबाहेर पडून नव्याने पक्षबांधणी करावी लागणार आहे. दिवाळीला चार दिवस असताना मोदींनी भाजपची धुरा एकहाती खेचून विजयपथावर नेली आणि त्यामुळेच भाजप पुढच्या पाच विधानसभा निवडणुकांना केवळ बिहारच्याच नव्हे, तर देशाच्या राजकारणातही बॉस असलेल्या मोदी यांच्या नेतृत्वाखाली अन्य सर्वच पक्षांपुढे मोठे आव्हान उभे करणार, हेच या निवडणुकांचे फलित आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा