esakal | अग्रलेख : कोळिष्टकात काँग्रेस
sakal

बोलून बातमी शोधा

congress

राजीव गांधी यांच्या १९९१मधील अमानुष हत्येनंतर सोनिया विजनवासात गेल्या, तेव्हा पी. व्ही. नरसिंह राव यांनी या गांधी घराण्यापलीकडे काँग्रेसमध्ये नेतृत्वाची कमी नाही, हे दाखवून दिले होते. 

अग्रलेख : कोळिष्टकात काँग्रेस

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

डॉ.  मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानपदाच्या अखेरच्या काळात दिलेल्या एका मुलाखतीत ‘इतिहास हा आपल्याकडे अधिक दयाळू दृष्टीने बघेल...’ असे उद्‌गार काढले होते. मात्र, त्यानंतर अवघ्या सहा-सात वर्षांत राजीव सातव नावाचा तरुण तुर्क काँग्रेसच्या याच सहा-सात वर्षांत झालेल्या दारूण पराभवास आपल्या नेतृत्वाखालील ‘युपीए’च्या दुसऱ्या पर्वास जबाबदार धरेल, याची त्यांनी कल्पनाही केली नसणार. मात्र, तसे झाले खरे! अर्थात, त्यानंतर शशी थरूर, आनंद शर्मा अशा बुजुर्गांबरोबरच मनीष तिवारी आणि मिलिंद देवरा हे तरुण नेतेही डॉ. सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या बचावासाठी पुढे सरसावले. त्यामुळे आता कॉंग्रेसमधील जुन्या-नव्यांचा संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर आला असून, १३५ वर्षांच्या पक्षाचे यानिमित्ताने विघटन होते की काय, असा प्रश्‍न उभा राहिला आहे. राजस्थानात आणखी एक तरुण तुर्क सचिन पायलट यांनी आपल्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांच्याविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. अर्थात, काँग्रेसमध्ये असा जुन्या-नव्यांचा संघर्ष नवा नाही. खुद्द इंदिरा गांधींनी काँग्रेसमधील बुजुर्गांना आव्हान दिले होते. पुढील काळात इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जारी केल्यानंतर चंद्रशेखर, कृष्णकांत, मोहन धारिया आदींनी त्याविरोधात आवाज उठविला होता. 

सातव यांनी लागोपाठ दोन लोकसभा निवडणुकांत पदरी आलेल्या मोठ्या पराभवाचे विश्‍लेषण करताना कुवतीपलीकडला मोठाच घास घेतला. त्यापलीकडची बाब म्हणजे हे विश्‍लेषण भले पक्षांतर्गत व्यासपीठावर झाले असेल, ते जाहीर होतेच कसे आणि मग त्यास प्रत्युत्तरही जाहीरपणे दिली गेली. एकंदरीतच पक्षाची लक्‍तरे चव्हाट्यावर आली आहेत. काँग्रेसमध्ये सध्या जे तथाकथित मंथन सुरू आहे, त्याचे मूळ शोधणे कठीण नाही. दिग्विजय सिंग यांच्यासारख्या आणखी एका बुजुर्ग नेत्यापासून बहुतेक ज्येष्ठ नेते हे राहुल, प्रियांका आणि सोनिया गांधी, या गांधी घराण्यापलीकडे नेतृत्वाचा विचार करायला तयार नाहीत. त्याचवेळी हे घराणे सद्यस्थितीत पक्षाला प्रभावी नेतृत्व देण्यात अपयशी ठरत आहे. पक्ष एकसंध राखण्यासाठी, पक्षात चैतन्य निर्माण करण्यासाठी कोणतेही प्रयत्न होत असल्याचे दिसत नाही. २००४ मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी सिमला येथे झालेल्या ‘चिंतन बैठकी’तच काँग्रेस कार्यकारिणीने सचिन पायलट, ज्योतिरादित्य, शिंदे, आर. पी. एन. सिंग, अशा काही तरुणांची नावे आगामी काळातील नेते म्हणून निश्‍चित केली होती. त्यांना पुढे तीच निवडणूक लढवणारे राहुल गांधी येऊन मिळाले. यापैकी बहुतेक नेते पुढे मंत्री झाले. हीच राहुल यांची ‘टीम’ होती. मात्र, १० वर्षांच्या सत्तेनंतर २०१४ मध्ये आलेल्या पहिल्याच परीक्षेत राहुल सपशेल ‘फेल’ झाले. त्याची कारणे अनेक आहेत. राहुल यांना आपल्या ‘टीम’समवेत मनासारखे काम काही म्हाताऱ्या अर्कांनी करू दिले नाही आणि त्यांना थेट सोनिया यांचाही पाठिंबा मिळत गेला, असे आता दिसत आहे. त्यानंतरही राहुल यांनी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड तसेच कर्नाटक येथे सत्ता मिळवून दाखवली होती. त्यानंतर आता काँग्रेस उभारी घेणार, असे दिसत असतानाच खऱ्या अर्थाने कॉंग्रेसच्या पडझडीला सुरुवात झाली. २०१४मधील पराभवाचे विश्‍लेषण करण्यासाठी ज्येष्ठ नेते ए. के. अँटनी यांना नियुक्‍त केले गेले. त्यांच्या अहवालाचे काय झाले, ते काँग्रेसच जाणो! मात्र, आता मनीष तिवारी त्या पराभवाचे खापर तत्कालीन महालेखापाल विनोद राय यांच्यावर फोडू पाहत आहेत. विविध गैरव्यवहारांप्रकरणी राय यांच्या अहवालांमुळे ‘युपीए’च्या दुसऱ्या पर्वातील कथित भ्रष्टाचाराला पुष्टी मिळाली, हे खरेच आहे. त्याचा वापर भाजप नेत्यांनी करून घेतला. मात्र, त्यांना उत्तर देण्यात काँग्रेस नेत्यांना अपयश आले, हेही तितकेच खरे आहे. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर आता पुनश्‍च एकवार ‘तरुण तुर्क आणि म्हातारे अर्क’ यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

राजीव गांधी यांच्या १९९१मधील अमानुष हत्येनंतर सोनिया विजनवासात गेल्या, तेव्हा पी. व्ही. नरसिंह राव यांनी या गांधी घराण्यापलीकडे काँग्रेसमध्ये नेतृत्वाची कमी नाही, हे दाखवून दिले होते. त्यांनीच डॉ. मनमोहन सिंग यांना साथीला घेऊन घडवून आणलेल्या आर्थिक सुधारणांमुळेच आज देश प्रगतिपथावर आहे. मात्र, या सुधारणांचे ‘श्रेय’ही काँग्रेसला स्वत:कडे राखता आले नाही. त्यास ही जुनी खोंडेही तितकीच जबाबदार आहेत. गांधी घराण्याच्या पुण्याईवर सत्तेची फळे चाखायची आणि पराभवाचे विश्‍लेषण नको म्हणायचे असा त्यांचा दुटप्पी पवित्रा आहे. २००४ मध्ये सोनिया गांधी यांनी अनेक प्रादेशिक पक्षांना सोबत आणले होते. आता तेच प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय स्तरावर या घराण्याचे नेतृत्व मानायला तयार नाहीत, हे वास्तव आहे. त्यास अर्थातच राहुल यांची धरसोड वृत्ती कारणीभूत आहे. आता या पेचातून आधी मार्ग काढायचा, की राजस्थानातील सरकार वाचवायचे या चक्रव्युहात सापडलेल्या काँग्रेसचे भवितव्य हे काळच ठरवणार आहे. भूतकाळाच्या कोळिष्टकात अडकलेला काँग्रेस पक्ष त्यातून बाहेर पडून भविष्याचा वेध कधी घेणार हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे.

loading image