esakal | अग्रलेख : ऍडव्हांटेज राहुल!
sakal

बोलून बातमी शोधा

rahul gandhi

सोनिया यांनी हे फेरबदल करताना "टायमिंग'ही अचूक साधले आहे! आता या बदलाबाबत कोणाला प्रश्‍नचिन्ह उपस्थित करावयाचे असेल, तर त्याचे उत्तर देण्यास दस्तुरखुद्द सोनियाच नव्हे तर राहुल गांधीही पुढचे काही दिवस उपलब्ध नसणार.

अग्रलेख : ऍडव्हांटेज राहुल!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोरोनाच्या सावटाखाली आजपासून सुरू होत असलेल्या संसदेच्या अधिवेशनाच्या तोंडावर कॉंग्रेस संघटनेत मोठे फेरबदल करून सोनिया गांधी यांनी गेल्याच महिन्यात नेतृत्वाविरोधात आवाज उठवू पाहणाऱ्या बड्या नेत्यांना जोरदार धक्‍का दिला आहे. सोनिया यांनी हे फेरबदल करताना "टायमिंग'ही अचूक साधले आहे! आता या बदलाबाबत कोणाला प्रश्‍नचिन्ह उपस्थित करावयाचे असेल, तर त्याचे उत्तर देण्यास दस्तुरखुद्द सोनियाच नव्हे तर राहुल गांधीही पुढचे काही दिवस उपलब्ध नसणार. सोनियांची ही अनुपस्थिती प्रकृतीच्या कारणास्तव असून, त्या उपचारासाठी अमेरिकेस जात आहेत. राहुलही त्यांच्यासोबत जात असल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आपल्या आईच्या प्रकृती अस्वास्थ्याच्या काळात तिच्यासोबत असणे, राहुल यांना गरजेचे जरूर वाटू शकते. मात्र, त्यामुळे निश्‍चितपणे वादळी ठरणाऱ्या या अधिवेशनात कॉंग्रेस पक्ष हा नेतृत्वाविना चाचपडतच राहणार. या विधानास संदर्भ आहे तो अर्थातच गेल्या महिन्यात 23 नेत्यांनी सोनिया यांना लिहिलेल्या पत्राचा. या पत्रातील मुख्य मुद्दा हा कॉंग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष असावा आणि कारभार पारदर्शक तसेच सामूहिक निर्णयप्रक्रियेवर आधारित असावा, असा होता. त्यानंतर झालेल्या पक्षाच्या बैठकीत या मुद्यांना पूर्णपणे बगल देऊन पुनश्‍च सोनिया गांधी यांनाच हंगामी अध्यक्षपदी ठेवण्याचे दरबारी राजकारण झाले. त्यानंतरच्या या नेमणुकांत या पत्र लिहिणाऱ्या नेत्यांना मोठा फटका बसला आणि राहुल यांच्या मांदियाळीतील नेत्यांच्या हातातच पक्षाची सूत्रे गेली आहेत. सर्वात जबर धक्‍का देण्यात आला आहे तो गुलाम नबी आझाद यांना. त्यांचे सरचिटणीसपद काढून घेण्यात आले आहे; तर मोठी बढती मिळाली आहे ती रणदीप सुरजेवाला या आपल्या निष्ठा केवळ राहुलचरणी वाहणाऱ्या नेत्यांना. त्यांना सरचिटणीसपदी बसवताना, त्यांचे मुख्य प्रवक्‍तेपदही कायम राखण्यात आले आहे. तर मोतीलाल व्होरा, अंबिका सोनी आणि मुख्य म्हणजे गेल्या लोकसभेतील पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांचीही सरचिटणीसपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतर झालेल्या नव्या नियुक्‍त्या बघता, राहुल यांच्या मर्जीतील नेत्यांनाच "भाव' दिल्याचे दिसत आहे. एकंदरित या फेरबदलाचा अर्थ "ऍडव्हांटेज राहुल!' असाच म्हणावा लागेल. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या साऱ्या फेरबदलाचा अर्थ स्पष्ट आहे आणि तो म्हणजे गांधी घराणे पक्षावरील आपला "कब्जा' सोडायला तयार नाही! लोकसभा निवडणुकीतील लागोपाठ दुसऱ्या दारूण पराभवानंतर अध्यक्षपदाचा राजीनामा देताना, गांधी परिवाराबाहेरील व्यक्‍तीकडे पक्षाची सूत्रे देण्याची मनीषा राहुल गांधींनी बोलून दाखवली होती. मात्र, इंदिरा गांधी यांच्या काळापासून गेली पाच दशके पक्षातील "जी हुजूर' संस्कृतीत वाढलेल्या नेत्यांना ते मान्य झाले नव्हते. आताही पुनश्‍च तेच होत आहे. खरे तर गांधी परिवाराच्या निकट असलेले पृथ्वीराज चव्हाण यांनी हे फेरबदल जाहीर होण्याच्या एकच दिवस आधी एका मुलाखतीत "पक्षाला पूर्णवेळ काम करणारा अध्यक्ष हवा. निव्वळ ट्‌वीट करून भागत नाही!' असे रोखठोक उद्‌गार काढले होते. चव्हाण यांचा निशाणा हा थेट राहुल यांच्यावरच होता, हे स्पष्ट आहे. मात्र, या नव्या नियुक्‍त्या बघता गांधी परिवार कोणाचेच काहीही ऐकायला तयार नाही, असे दिसते. कॉंग्रेसपुढे सध्या बिहारच्या अवघ्या दीड-महिन्यावर येऊन ठेपलेल्या निवडणुका आणि त्यानंतरच्या सहा महिन्यांतच पश्‍चिम बंगालमध्ये होणारी निवडणूक अशी दोन आव्हाने आहेत. पार खिळखिळा झालेला पक्ष या दोन निवडणुकांना सामोरा कसा जाणार, हा लाखमोलाचा प्रश्‍न असताना या नेमणुका करताना विचार झाला तो उत्तर प्रदेशात दोन वर्षांनी येऊ घातलेल्या निवडणुकांचा! देशातील या सर्वात मोठ्या राज्यात पक्षाची धुरा प्रियांका गांधी यांच्या खांद्यावर देण्यात आली असली, तरी त्याचवेळी तेथील नेते जितीन प्रसाद यांना मात्र, प. बंगालची सूत्रे देण्यात आली आहेत. याचा अर्थ लावायचा तरी कसा? "मेथड इन द मॅडनेस' असे इंग्रजीत म्हणतात. मात्र, कॉंग्रेस तशीही काही "मेथड' मानू इच्छित नाही, हाच या साऱ्या खेळाचा अर्थ आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या पार्श्‍वभूमीवर सोनियांपुढे अनेक प्रश्‍नचिन्हे उभ्या करणाऱ्या पत्रलेखकांपैकी एक कपिल सिब्बल यांनी "निवडणुका आणि नियुक्‍त्या' यांच्यातील फरक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्यांचे म्हणणेही केराच्या टोपलीतच हा परिवार टाकणार, असे तूर्त तरी दिसत आहे. राहुल यांना खरोखरच पुन्हा अध्यक्ष व्हायचे असेल, तर त्यांनी अवश्‍य व्हावे. मात्र, त्यानंतर तरी ते झडझडून काम करणार का? 2014 मध्ये मोदी यांनी मोठा विजय मिळवला आणि त्याचीच पुनरावृत्ती 2019 मध्ये झाली. या काळात खरे तर देशाला सक्षम विरोधी पक्षाची गरज होती आणि आहे. मात्र, राहुल गांधी यांनी आपल्या धरसोडीच्या धोरणामुळे याबाबत निराशा केली. तरीही तेच पुन्हा अध्यक्ष होतील, अशी चिन्हे दिसत आहेत; कारण त्यांसाठीच सोनियांनी जुन्या-जाणत्यांना खड्यासारखे टिपून गारद केले आहे. त्यामुळे किमान लोकशाही वाचवण्यासाठी तरी राहुल गांधी यांनी आपल्या मांदियाळीला घेऊन का होईना, पण पक्ष उभा करावा, याच शुभेच्छा! 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप