esakal | अग्रलेख : लढाई प्रतिबंधाची
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus

कोरोना विषाणूने आपली आरोग्य व्यवस्था कशी कच्च्या पायावर उभी आहे, तेच अधोरेखित केले आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागाकडे लक्ष केंद्रित करताना, लोकांचे सहकार्यही मोठ्या प्रमाणावर मिळायला हवे.

अग्रलेख : लढाई प्रतिबंधाची

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोरोना विषाणूच्या जगभरातील थैमानानंतर भारतात 24 मार्च रोजी जारी करण्यात आलेल्या "लॉकडाऊन'ला आता चार महिने पूर्ण होत असताना, महाराष्ट्राची प्रकृती नेमकी कशी आहे? देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबापुरीत या विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्या लाखावर जाऊन पोचली असली, तरी धारावीसारख्या अत्यंत दाट वस्तीच्या भागात या विषाणूच्या फैलावावर नियंत्रण आणण्यात प्रशासन यशस्वी झाले आहे. मुंबईतील परिस्थिती हळूहळू सुधारत असल्याने आता राजधानीचे हे शहर इतर आजारांवरील उपचारांसाठी सज्ज होऊ लागले असून, महापालिकेच्या चार मुख्य रुग्णालयांमध्येच अन्य आजारांवर उपचार सुरू करण्यात येत आहेत. मात्र, त्याचवेळी राज्याची सांस्कृतिक तसेच शैक्षणिक राजधानी म्हणून ख्यातकीर्त असलेल्या पुणे परिसरात मात्र बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तशीच काहीशी परिस्थिती मुंबईलगतच्या ठाणे आणि नवी मुंबई महापालिकांच्या परिसरात आहे. त्यामुळेच "मिशन बिगिन अगेन' असा नारा देत ही ठाणबंदी काही प्रमाणात शिथील करणाऱ्या सरकारला या भागात "पुनश्‍च ठाणबंदी!' अशी घोषणा करावी लागली. अर्थात, राज्य म्हणजे काही केवळ मुंबई-पुणे नाही आणि त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी शनिवारी एकूणातच राज्याचा जिल्हावार आढावा घेतला. त्यातून समोर आलेले वास्तव हे राज्याच्या ग्रामीण भागात या विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत चालल्याचे आहे. तिथली परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी त्यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांवर येऊन पडली आहे. त्यांनी निर्णय घेताना कोणत्याही दबावाला बळी पडू नये, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याने ठाणबंदीची व्याप्ती वाढण्याची शक्‍यता आहे. राज्य सरकारनेही ग्रामीण भागात आवश्‍यक तिथे मदतीची तत्परता दाखवायला हवी. त्यातच एक ऑगस्ट रोजी असलेली "बकरी ईद' आणि नंतर 22 ऑगस्टपासून सुरू होणारा "गणेशोत्सव' या दोन सणांमध्ये होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण कसे ठेवायचे, हा सरकारपुढील कळीचा प्रश्‍न आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या याच बैठकीत, राज्यात सध्या पाच हजार "व्हेंटिलेटर बेड' असले, तरी त्यापैकी फक्‍त 540 बेडचाच वापर सुरू असल्याची माहिती आरोग्य सचिवांनी दिली. तरीही पुण्यापासून राज्याच्या नाशिकसारख्या महानगरात आणि ग्रामीण भागातही रुग्णांना "बेड' उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारींचे प्रमाण मोठे आहे. या पार्श्‍वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, थेट मुंबई महापालिका आयुक्‍तांचीच शिकवणी पुण्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना लावली. त्यांचा हा निर्णय अनेकार्थांनी महत्त्वाचा आहे. 

मुंबईतील यश आणि पुण्यातील अपयश, या दोन्हीवर झालेल्या या शिक्‍कामोर्तबाच्या पार्श्‍वभूमीवर आता राज्याच्या ग्रामीण भागात वाढू लागणारा या विषाणूचा फैलाव सरकार नेमका कसा रोखणार, हा खरा प्रश्‍न आहे. देशभरात लॉकडाऊनची पहिली घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुढी पाडव्याच्या पूर्वसंध्येला केली, तेव्हा लोकांना त्या धक्‍क्‍यातून बाहेर येऊन काही तयारी करण्यासाठी अवघ्या चार तासांचाच अवकाश देण्यात आला होता. आता किमान काही दिवसांच्या मुदतीने नव्याने ठाणबंदी जाहीर करण्यात येत असली, तरी त्यामुळे बाजारपेठा तसेच रस्त्यांवर होणाऱ्या भाऊगर्दीमुळे लॉकडाऊनचे उद्दिष्टच नाहीसे होऊन जात आहे. शिवाय, वारंवार चार-सहा वा आठ-दहा दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केला जात असल्यामुळे, अर्थव्यवस्थेला मिळू लागलेल्या थोड्याफार गतीलाही सतत ब्रेक लागत आहे. त्यामुळे जोपर्यंत या विषाणूवर मात करणारी लस उपलब्ध होत नाही, तोपावेतो हे "लॉक-अनलॉक'चे रहाटगाडगे असेच सुरू राहणार, असे दिसते. भारताने या विषाणूच्या संशोधनात मोठी आघाडी घेतली आहे आणि ब्रिटनमधूनही लस लवकरच उपलब्ध होणार, अशी आश्‍वासक बातमी आहे. तर रशियाने लस तयार असून, ऑगस्टपासून ती सर्वांसाठीच उपलब्ध होणार, अशी सनसानटी घोषणा केली आहे. मात्र, रशियाने ही लस वा त्यासंबंधीचा "फॉर्म्युला' खुला केला तरी जगभरात ती वापरली जाईल का, याबाबत साशंकताच आहे. या साऱ्या बाबींचा साधक-बाधक वापर करूनच महाराष्ट्र सरकारला पुढचे काही निर्णय घ्यावे लागणार आहेत. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुंबापुरीत आता कोरोना रुग्णांच्या विलगीकरणासाठी आणखी काही केंद्रे उभारण्याऐवजी ती जबाबदारी संबंधित गृहनिर्माण सोसायट्यांवर टाकण्याच्या विचार आता सुरू झाला आहे. अर्थात, मुंबई नियंत्रणाखाली येत आहे, त्याचे कारण राज्याच्या अन्य महानगरांच्या आणि विशेषत: ग्रामीण भागाच्या तुलनेत येथे महापालिकेची ब्रिटिशांनी उभारलेली मोठी रुग्णालये हेच आहे. ग्रामीण भागात तशी कोणतीच सुविधा आपण उपलब्ध केली नाही. एकंदरितच कोरोना विषाणूने आपली आरोग्य व्यवस्था कशी कच्च्या पायावर उभी आहे, तेच अधोरेखित केले आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागाकडे लक्ष केंद्रित करताना, लोकांचे सहकार्यही मोठ्या प्रमाणावर मिळायला हवे. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर तर त्याची अधिक गरज आहे. एका वर्षी गणपतीला कोकणात न जाता, आपापल्या घरीच श्रीगणरायाची आराधना केली, तर सुरक्षिततेच्या दृष्टीने ते अत्यंत उपयुक्त ठरेल.त्यामुळेच आता ग्रामीण भागातील तसेच नाशिकसारख्या महानगरातील हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेबरोबरच आजी-माजी लोकप्रतिनिधींनीही पुढाकार घ्यायला हवा. अन्यथा, ठाणबंदीशिवाय सरकारपुढे लस तयार होईपावेतो दुसरा उपाय नाही, हे तर सर्वांनाच ठाऊक आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

loading image