esakal | अग्रलेख :  सलाम धारावी! 
sakal

बोलून बातमी शोधा

dharavi

जागतिक आरोग्य संघटनेने त्याबद्दल प्रशासन आणि मुख्य म्हणजे धारावीकर जनता यांना ‘सलाम’ केला आहे.एवढेच नव्हे तर धारावीत राबविली गेलेली मोहीम आणि आरोग्य यंत्रणांना सहकार्य कसे करावे.

अग्रलेख :  सलाम धारावी! 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

चित्रपटसृष्टीचा ‘शहेनशहा’ अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याची आणि कोट्यवधींच्या काळजाचा ठोका चुकवणारी बातमी घेऊन रविवारची सकाळ उजाडली. मात्र, हीच सकाळ अवघ्या भारतवर्षांची मान जगात उंचावणारी आणखी एक सुखद बातमी घेऊन आली. ती बातमी होती आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी अशी कुप्रसिद्धी असलेल्या धारावीतील दहा लाखांहून अधिक रहिवाशांनी कोरोनाशी दिलेल्या झुंजीची. अवघ्या २.१ चौरस किलोमीटरच्या परिसरातील या झोपडपट्टीत एप्रिलमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला आणि अनेकांचे धाबे दणाणले. या विषाणूवर मात करण्याचा एकमेव उपाय हा विलगीकरण हा असताना, या इतक्या दाटीवाटीच्या वस्तीत ते कसे साध्य करणार, हा प्रश्न केवळ धारावीकरच नव्हे तर महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महापालिका यांच्यापुढेही उभा होता. मात्र, त्यानंतर प्रशासकीय यंत्रणा सर्व शक्तिनिशी या लढ्यात उतरल्या आणि अभिमानाची बाब म्हणजे तेथील रहिवाशांनी कमालीचा संयम पाळत या लढ्याला संपूर्ण सहकार्य केले. त्यामुळेच आतापावेतो त्या परिसरात आढळलेल्या एकूण २३७० रुग्णांपैकी तब्बल १९५२ जण कोरोनामुक्त होऊन घरीही परतले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) त्याबद्दल प्रशासन आणि मुख्य म्हणजे धारावीकर जनता यांना ‘सलाम’ केला आहे. एवढेच नव्हे तर धारावीत राबविली गेलेली मोहीम आणि आरोग्य यंत्रणांना सहकार्य कसे करावे, याचा धारावीकरांनी घालून दिलेला आदर्श यांचे जगभरात अनुकरण व्हायला हवे, अशी टिपणीही ‘डब्ल्यूएचओ’ने केली आहे. या मोहिमेत राज्य सरकार तसेच मुंबई महापालिका यांच्यासमवेत धारावीकरांना सोबत घेणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्थांचेही अभिनंदन करावे लागेल. समाजातील सर्व घटकांना समवेत घेऊन सामंजस्याने काम केले की काय होऊ शकते, तेच या उदाहरणातून दिसते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

धारावीचा हा आदर्श जगाने घ्यायला हवा, असे ‘डब्ल्यूएचओ’चे आवाहन आहे. मात्र, तूर्तास तरी हा आदर्श अमिताभ राहत असलेल्या जुहूसारख्या याच मुंबापुरीतील अनेक उच्चभ्रू आणि श्रीमंत वस्तीतील लोकांबरोबरच पुणे-ठाणे-नवी मुंबई परिसरातील रहिवाशांनी तातडीने घ्यायला हवा. या तथाकथित सुशिक्षित तसेच समंजस लोकांच्या परिसरात लोक सरकारच्या कोणत्याच आदेशांचे पालन करत नसल्यामुळे पुण्याबरोबरच ठाणे तसेच अन्य भागात या विषाणू बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळेच या भागात ‘लॉकडाउन’ नव्याने जारी करावा लागला आहे. त्याचवेळी धारावीकरांनी मात्र रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी थेट ४३० दिवसांवर नेला आहे. मुंबईच्या अन्य भागात हाच कालावधी सरासरी ५० दिवस आहे, ही बाब ध्यानात घेतली की संयम आणि नियमपालन यांचे महत्त्व लक्षात येऊ शकते. या दाटीवाटीच्या वस्तीत घरात विलगीकरण हे केवळ अशक्य होते. त्यामुळे तेथे संस्थात्मक विलगीकरणाचा उपाय योजला गेला. त्याशिवाय, रुग्ण शोधणे, म्हणजेच चाचण्या घेणे, मग विलगीकरण आणि नंतर उपचार असा मार्ग अवलंबिला गेला. एकीकडे मुंबई तसेच राज्याच्या अन्य भागातील पंचतारांकित रुग्णालये लक्षावधी रुपये उकळत असताना, धारावीकरांनी मात्र सार्वजनिक आरोग्य यंत्रणेवरच अवलंबून राहून हा चमत्कार दाखवून दिला आहे! त्यासाठी या यंत्रणेने ४७ हजार ५०० घरांपर्यंत डॉक्टर तर पोचवलेच; शिवाय अन्यत्र अनेक खासगी दवाखाने बंद असताना धारावीत मात्र डॉक्टरमंडळींनी कमालीचे सहकार्य दाखवून धोका पत्करत ते उघडले. त्याबद्दल हे डॉक्टर तसेच त्यांचे सहकारी आणि परिचारिका यांनाही धन्यवाद द्यायला हवेत. या मोहिमेत जवळपास साडेतीन लाख नागरिकांचे स्क्रिनिंग करण्यात आले. त्यासाठी मोबाइल व्हॅनचा वापर केला गेला आणि त्यातून सुमारे १५ हजारांचे स्क्रिनिंग पार पडले. धारावीतील १० लाख रहिवाशांपैकी जवळपास ८० टक्के लोक हे सार्वजनिक शौचालयांचा वापर करतात. त्यामुळे या भागात संसर्गाचा धोका अधिक होता. मात्र, त्या शौचालयांचीही कमालीची स्वच्छता राखण्यात आली. त्यासाठी सफाई कामगारांनी दिलेले सहकार्य; तसेच अहोरात्र पोलिसांनी प्राणाची पर्वा न करता केलेले काम यांचाही उल्लेख व्हायलाच हवा. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

धारावीकरांनी हे जे काही ‘करून दाखवलं!’ त्यामुळे आता या परिसरातील अनेक छोटे-मोठे उद्योग सुरू झाले आहेत आणि थोड्या-फार प्रमाणात का होईना आर्थिक चलन-वलन सुरू झाले आहे. मात्र, या यशाचा आनंदोत्सव साजरा करण्याची ही वेळ नाही. यापुढच्या काळातही कमालीची सावधानता बाळगावी लागेल. यश मिळवण्याइतकेच ते टिकवणे महत्त्वाचे. राज्याच्या आणखी काही भागात संसर्ग नियंत्रणात येत आहे, हे दिसून आल्यावर ‘ठाणबंदी’ काही प्रमाणात शिथिल केली गेली आणि लोकांनी रस्तोरस्ती झुंबड उडवून या विषाणूला जणू आमंत्रण दिले. त्यामुळेच पुणे असो की ठाणे येथे ‘पुनश्च हरी ॐ!’चा नारा देणाऱ्या सरकारला ‘पुनश्च ठाणबंदी!’ हा मंत्र जपणे भाग पडले आहे. धारावीकरांना सलाम करतानाच, या बाबीही लक्षात घ्यायला लागतील, तरच या लढ्यात अंतिम विजय मिळू शकतो. 

loading image