esakal | हे गजमाते, माफ कर!
sakal

बोलून बातमी शोधा

हे गजमाते, माफ कर!

वाघ,बिबट्या विविध जातींची हरणे,हत्ती आदी प्राण्यांशी विविध कारणांनी माणसाचा संघर्ष होतो आणि त्यात वन्यप्राण्यांचा बळी जातो.वन्यजीव आणि वनसंपदेची हानी ही अंतिमतःमाणसाच्याही घातालाही कारणीभूत ठरणार आहे

हे गजमाते, माफ कर!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

‘हे  गभर्वती गजमाते, समस्त मानवजातीच्या वतीने आम्ही तुझी क्षमा मागतो’, अशाच भावना केरळमधील गर्भवती हत्तिणीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर  कोणत्याही संवेदनशील माणसाच्या मनात उमटल्या असतील. दुर्मीळ जैववैविध्याचा खजिना असलेल्या पश्‍चिम घाटातील सायलेंट व्हॅली राष्ट्रीय अभयारण्याच्या बाह्य भागातील एका खेड्यात ही हत्तीण आढळली. फटाके लपवलेला अननस तिने खाल्ला. त्याचा स्फोट झाला आणि त्यात तिचा जबडा व तिच्या संवेदनशील सोंडेला जखम झाली. त्याची वेदना शमवण्यासाठी नदीत सोंड बुडवून उभ्या असलेल्या हत्तिणीला बाहेर काढून तिच्यावर उपचार करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले आणि तिचा अंत झाला. वन्यजीव आणि माणूस यांच्यातील संघर्षाचा आणखी एक बळी असे याबाबत नुसते म्हणून चालणार नाही, तर यावर दीर्घकालीन उपाय योजले पाहिजेत. वाढत्या लोकसंख्या, निसर्गसंपत्ती ओरबाडण्याची लालसा, विकासाच्या नावाखाली जैवसंपदेचा नाश या गोष्टी घातक आहेत. वाघ, बिबट्या, नीलगायी, विविध जातींची हरणे, हत्ती आदी प्राण्यांशी विविध कारणांनी माणसाचा संघर्ष होतो आणि त्यात वन्यप्राण्यांचा बळी जातो. वन्यजीव आणि वनसंपदेची हानी ही अंतिमतः माणसाच्याही घातालाही कारणीभूत ठरणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हत्ती हा खरेतर उमदा, राजस प्राणी. तो माणसाच्या अध्यात-मध्यात न येता आपल्या वाटेने डौलदारपणे कळपाने जाणारा, समाजप्रिय अन्‌ बुद्धिमान मानला जातो. शतकानुशतके आदिवासी, तसेच ग्रामस्थांच्या साहचर्याने गुण्यागोविंदाने राहातो. दक्षिणेकडे तर हत्तीला देव मानले जाते. त्या भागात प्रत्येक मोठ्या मंदिरात हत्ती ठेवण्याचीही परंपरा आहे. अनेक ठिकाणी पाळीव हत्तींकडून अवजड कामेही करून घेतली जातात. देशातील विविध जंगलांतील हत्तींची संख्या हळूहळू कमी होत आहे. वनांखालील क्षेत्र कमी होत असल्याने त्यांचा अधिवास आक्रसतो आहे, त्यांचे खाद्य कमी होते आणि आणि पर्यायाने त्यांच्या वाढीलाही मर्यादा येत आहे. आता देशात उरलेल्या २९ हजार हत्तींपैकी ४४ टक्‍क्‍यांवर हत्ती दक्षिणेकडील चार राज्यांतच आहेत. मानव अकारण वाढवत असलेल्या गरजांमुळे या शिल्लक हत्तींनाही वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. हत्ती हा मुळातच भटक्‍या प्राणी. दर वर्षी तीनशे ते साडेतीनशे किलोमीटरचा साधारणतः वर्तुळाकार प्रवास तो करतो. त्यांचे पारंपरिक सुमारे १०१ मार्ग देशभरात आहेत. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांनी यापैकी दोन तृतीयांश मार्ग तुटले आहेत. त्यामुळे हे मार्ग ओलांडून आपल्या जुन्या मार्गांवर जाणारे अनेक हत्ती अपघातांत बळी जातात. त्यांच्या काही मार्गांवरच मानवाने बांधकामे करून ठेवली आहेत. हस्तिदंताच्या लालसेने काही हत्ती शिकारीला बळी पडतात.

शेतातील पीक खाणाऱ्या हत्तींवर उपाय म्हणून काही वेळा त्यांना विष दिले जाते, तर काही वेळा अशा प्रकारे अननसासारख्या फळात बॉम्ब पेरला जातो. शेतीला उपद्रव देतात, म्हणून रानडुक्कर, हत्ती, हरणांना अटकाव घालण्याकरिता विजेचे कुंपणही उभारले जाते. शेतीही वाचली पाहिजे आणि वन्यप्राणीही जगले पाहिजेत, असा विवेकी विचार मात्र होताना दिसत नाही. त्यासाठी विशिष्ट पिकांच्या मागे न लागता त्या त्या प्रदेशानुसार योग्य पीकपद्धती स्वीकारल्यास वन्यप्राण्यांचा उपद्रव होणार नाही, हे अभ्यासकांचे म्हणणेही विचारात घ्यावे लागेल. तसेच सहजीवनासाठी लोकशिक्षणही महत्त्वाचे ठरते. शेतीक्षेत्राभोवती चर खणून हत्तींसारख्या वन्यप्राण्यांना दूर ठेवता येते. अनेक आदिवासी हत्तींच्या अगदी जवळ जाऊ शकतात. कारण हत्ती त्यांना जंगलाचा घटक मानतात. अशा आदिवासींना वनकर्मचारी केल्यास वन्यजीव संवर्धनाला ते पूरक ठरू शकते. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने संकल्प करायला हवा, तो वन्यजीव आणि माणूस यांच्यातील निकोप संबंधांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्याचा.

loading image