esakal | अग्रलेख : स्कॉटलंडचे पाणी!
sakal

बोलून बातमी शोधा

james-bond

स्कॉटलंडने इंग्लंडशी असलेली तीनशेहून अधिक वर्षांची साथ सोडावी आणि स्वतंत्र व्हावे, या मताचे ते होते. त्यांच्या हातावर त्यांनी ‘स्कॉटलंड फॉरेव्हर’ असे गोंदवूनच घेतले होते.

अग्रलेख : स्कॉटलंडचे पाणी!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

एडिंबरा हे स्कॉटलंडचे पुणे समजायला हरकत नाही. स्कॉटलंडमधल्या साऱ्या सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय विचारांचे ते आगर मानले जाते किंवा ‘जात होते’ असे म्हणा हवे तर! एकंदरीत, स्कॉटिश माणूस सामान्यत: आपल्या मराठी माणसासारखाच काहीसा भाबडा, परंपरांचा जाज्वल्य अभिमानी. भले तर डोक्‍यावर घेऊन नाचणारा आणि बिघडला तर लागलीच उसळणारा. त्या अर्थाने पाहू गेल्यास सर थॉमस शॉन कॉनरी हे स्वभावपिंडाने मराठमोळेच होते, असे म्हणावे लागेल. सारे जग त्यांना शॉन कॉनरी किंवा जेम्स बाँड या नावाने ओळखते. झीरो झीरो सेवन ऊर्फ जेम्स बाँड हा प्रसिद्ध ब्रिटिश गुप्तहेर ठाऊक नाही, असा इसम या पृथ्वीतलावर नसावा. इयान फ्लेमिंग यांच्या कल्पनेतून जन्मलेल्या या गुप्तहेराने ‘गुप्त’ राहण्यापेक्षा प्रसिद्ध होण्यावरच कारकीर्द खर्ची घातली. बहामामधल्या आपल्या शानदार हवेलीसदृश घरात सर शॉन यांनी शनिवारी वयाच्या नव्वदाव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आणि सारे जग हळहळले. वास्तविक, कोरोनाचे बोट पकडून मृत्यूने जगभर जे थैमान घातले आहे, ते पाहता एखाद्या मृत्यूची बातमी हल्ली तितकीशी धक्का देईनाशी झाली आहे. पण, शॉन कॉनरी हे तत्त्वचि वेगळे होते. वय, अनुभव, व्यक्तिमत्त्वाने पुरता पिकलेला हा जगन्मान्य अभिनेता केवळ अभिनेता नव्हताच. त्यांच्या लाडक्‍या स्कॉटलंडसाठी ते ‘सर्वश्रेष्ठ स्कॉट्‌समन’ होते. त्यांच्या तितक्‍याच लाडक्‍या इंग्लंडसाठी ते ‘सर शॉन कॉनरी’ होते, त्यांच्या जगभर पसरलेल्या लाखो चाहत्यांसाठी ते आद्य ००७ होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

साठ-सत्तरीच्या दशकात ज्यांना समजूत आली, त्या पिढ्यांसाठी ते ‘ग्लोबल आयकॉन’ होते. शॉन यांनी चित्रपटांच्या दुनियेला दीड तपापूर्वीच राम राम ठोकला होता. तब्बल सात चित्रपटांत त्यांनी जेम्स बाँड साकारला. त्यांच्यानंतर जॉर्ज लॅझनबी, रॉजर मूर, टिमथी डाल्टन, पियर्स ब्रॉस्नन, डॅनियल क्रेग अशा अनेक सिताऱ्यांनी जेम्स बाँडचे पडद्यावरले नेत्रदीपक आणि दिलखेचक कारनामे सुरू ठेवले. पण, शॉन कॉनरींच्या बाँडची त्यांना सर आली नाही. तो सहा फूट दोन इंच उंचीचा प्रमाणबद्ध आणि तंदुरुस्त देह, जाड भिवयांखालच्या डोळ्यांमधले बिलंदर भाव, हजारो तरुणींना घायाळ करणारे ते ओठांवरचे खट्याळ, काहीसे वाह्यात स्मित आणि किंचित बोबडी झाक असलेले चटकदार उच्चार... एकंदरीत रसायन लुभावणारे होते. ‘स’चा उच्चार ‘श’ करण्याची त्यांची लकब साठ-सत्तरीच्या दशकातील तरुणांनी चक्क फॅशन म्हणून उचलली होती. एका कारखान्यातील कामगाराच्या घरात जन्मलेल्या शॉन यांनी परिस्थितीवशात घरोघरी दुधाचा रतीब घालण्याचेही काम पोटासाठी केले. ते करता करता थोडेफार मॉडेलिंग केले. नाटकाच्या रंगमंचामागील कामे केली. मूळ पाणी होतेच स्कॉटलंडचे, त्यातूनही एडिंबराचे! एडिंबरातल्या संपन्न सांस्कृतिक वातावरणात त्यांना दिग्गज नाट्यकलावंत जवळून पाहायला मिळाले. दर्जेदार कलाकृतींचा आपोआप अभ्यास झाला. भाषेवर वळण चढत गेले. नाटकांत, चित्रपटांत किरकोळ कामे मिळत होती. पण, त्यांना १९६२मध्ये जेम्स बाँड मालिकेतला पहिला चित्रपट मिळाला, डॉ. नो. त्यात त्यांच्या साथीला होती मदनिका ऊर्सुला अँण्ड्रेस! एका हातात पिस्तूल, दुसऱ्या हाताच्या कवेत एखादी लावण्यवती आणि जगाचा सर्वनाश रोखण्यासाठी आणि सर्वशक्तिमान खलनायकाचे निर्दालन करण्यासाठी केलेली एकापाठोपाठ केलेली धाडसी कृत्ये... जेम्स बाँडपटांचा हा फॉर्म्युला पुढे रसिकांच्या इतका अंगवळणी पडला, की त्या मसालापटांमधून पूर्णत: गहाळ असलेले वास्तवाचे भान कुणाला जाचेनासेच झाले. ‘द नेम इज बाँड... जेम्स बाँड!’ हा त्यांच्या मुखातला, दुर्दम्य आत्मविश्वासाचे प्रत्यंतर देणारा संवाद इंग्लिश भाषेतला सर्वमान्य मुहावरा बनून गेला. प्रत्यक्षात शॉन यांना बाँडपटांबद्दल कवडीचीही आस्था नव्हती. आपल्या समंजस व्यक्तिमत्त्वावर शिरजोर झालेली ही व्यक्तिरेखा आहे, असे त्यांचे मत होते. ते खरेही होते, त्यांना मिळालेले एकमेव ऑस्कर ‘अनटचेबल्स’ या बिगर बाँडपटासाठी होते. शिवाय, इतर अनेक अप्रतिम भूमिका त्यांनी समर्थपणे पेलून जाणकारांची दाद मिळवली आहे. ‘खरा बाँड भेटला, तर लेकाच्याला हाणीन’ असे ते म्हणत. पण, याच भूमिकेने त्यांना प्रचंड कीर्ती आणि अमाप पैसा दिला, हे मात्र नाकारता येणार नाही. अर्थात, जेम्स बाँडने त्यांना भरभरून यश दिले असले, तरी शॉन कॉनरी यांनी बाँडला चेहरा मिळवून दिला, हेही खरे. स्कॉटलंडने इंग्लंडशी असलेली तीनशेहून अधिक वर्षांची साथ सोडावी आणि स्वतंत्र व्हावे, या मताचे ते होते. त्यांच्या हातावर त्यांनी ‘स्कॉटलंड फॉरेव्हर’ असे गोंदवूनच घेतले होते.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

स्कॉटिश स्वातंत्र्य चळवळीला त्यांचा भरघोस आणि उघड पाठिंबा असे. त्यापोटी त्यांनी शेलकी टीकादेखील सहन केली. सर शॉन कॉनरी यांना स्कॉटिश सरकारने अधिकृत श्रद्धांजली वाहताना ‘सर्वश्रेष्ठ दंतकथा’ असे म्हटले, ते काही उगाच नाही. स्कॉटलंडचेच सुप्रसिद्ध पाणी ते, जेथून आले तेथे परत गेले.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

loading image