esakal | अग्रलेख :  नाथाभाऊंचे सीमोल्लंघन!
sakal

बोलून बातमी शोधा

eknath-khadse

भाजपला हा मोठा धक्‍का आहे. नाथाभाऊंच्या या निर्णयामुळे भाजपने गोपीनाथ मुंडे तसेच प्रमोद महाजन यांच्या पिढीतील नेता आणि मुख्य म्हणजे राज्यातील एक बडा ओबीसी नेता गमावला आहे. 

अग्रलेख :  नाथाभाऊंचे सीमोल्लंघन!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

दसऱ्याला चार दिवस बाकी असतानाच, भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते एकनाथ ऊर्फ नाथाभाऊ खडसे सीमोल्लंघन करत आहेत. खरे तर घटस्थापनेच्या मुहूर्तावर म्हणजे गेल्या शनिवारीच नाथाभाऊ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी चिन्हे होती. मात्र, तो मुहूर्त हुकला असला, तरीही आता शुक्रवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा हा प्रवेश निश्‍चित झाला आहे. भाजपला हा मोठा धक्‍का आहे. याचे कारण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात ‘महाविकास आघाडी’चे सरकार स्थापन झाल्यापासून या सरकारात फूट पडेल आणि पुनश्‍च भाजपचेच सरकार येईल, अशा गमजा त्या पक्षाची नेतेमंडळी रोजच्या रोज मारत होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाजपला धक्‍का देणारी रणनीती आखत होते, हे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वत:च ही घोषणा केल्यामुळे स्पष्ट झाले आहे. नाथाभाऊंच्या या निर्णयामुळे भाजपने गोपीनाथ मुंडे तसेच प्रमोद महाजन यांच्या पिढीतील नेता आणि मुख्य म्हणजे राज्यातील एक बडा ओबीसी नेता गमावला आहे. अर्थात, त्यास भाजपमधील काही विशिष्ट नेत्यांची कूटनीतीच कारणीभूत ठरल्याचे दिसते. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून खडसे यांचे महत्त्व हळूहळू कमी होत गेल्याचे दिसते. खरे तर तोपावेतो नाथाभाऊ हेच भाजपचे राज्यातील प्रमुख नेते होते. २००९ ते १४ या काळात त्यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने २०१४मध्ये लोकसभेत प्रथमच निर्विवाद बहुमत संपादले आणि महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांना शतप्रतिशत भाजपची स्वप्ने पडू लागली. तेव्हा आपला सर्वांत जुना मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेबरोबरची २५ वर्षांची युती तोडण्याचा निर्णय जाहीर करण्याची जबाबदारीही भाजपने नाथाभाऊंवरच सोपवली होती. मात्र, नंतरच्या काळात ते बाजूला पडले. २०१९मध्ये तर त्यांना विधानसभेची उमेदवारीही मिळाली नाही; शिवाय त्याच मतदारसंघात आपल्या कन्येलाही पराभूत करण्याचे डावपेच खेळले जात आहेत, असे त्यांना जाणवले. या साऱ्याची परिणती खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्यात झाली आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गेली तीन-साडेतीन दशके खानदेशात भाजपची जी काही वाढ झाली, त्यात खडसे यांच्या प्रयत्नांचा वाटा होता, हे वास्तव आहे. प्रामुख्याने लेवा पाटील समाजाचे वर्चस्व असलेल्या खानदेशातील भाजपच्या वाढीस स्वत: त्याच समाजातून पुढे आलेल्या नाथाभाऊंचा लोकसंग्रह हा महत्त्वाचा भाग होता. मधुकरराव चौधरी यांच्यानंतरचे ते या समाजातील मोठे नेते मानले जातात. त्यामुळे राज्यात २०१४मध्ये भाजपला सरकार स्थापनेची संधी मिळाली, तेव्हा ते मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार मानले जात होते. मात्र, भाजपने फडणवीस यांची निवड केली आणि त्यामुळे भाजपचा चेहराच बदलून गेला. १९८०च्या दशकात भाजपची महाराष्ट्रात जी काही वाढ झाली, त्यात वसंतराव भागवत यांनी केलेल्या ओबीसी राजकारणाचा मोठा वाटा होता. मात्र, २०१४पासून चित्र बदलले. त्यातच खडसे यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोपही झाले. मात्र, इतरांना क्‍लीन चीट देत राजीनामा फक्‍त नाथाभाऊंचाच घेतला गेला. यामुळे ते अस्वस्थ होते आणि त्यांनी ती अस्वस्थता जाहीरपणे भगवानगडावरील मेळाव्यात व्यक्‍तही केली होती. ‘भाजपमध्ये आपल्या छळाला मर्यादा नव्हत्या आणि कोणीही, कधीही कोणत्याही पक्षाने माझ्या राजीनाम्याची मागणी केलेली नव्हती. तरीही तो घेण्यात आला,’ अशा शब्दांत त्यांनी आपली वेदना बोलून दाखवली होती. संधी मिळेल तेव्हा ही नाराजी ते बोलून दाखवत राहिले. त्यांचा रोख प्रामुख्याने फडणवीस यांच्यावर होता. त्यांची ती नाराजी दूर करून त्यांना पक्षात नीट सामावून घेण्यात भाजपला अपयश आले, हे खरेच. मात्र, या सगळ्या विषयाची दुसरी बाजूही लक्षात घ्यायला हवी. गेल्या काही वर्षांत बदललेल्या राजकारणाचे स्वरूप आणि भाजपमधील अंतर्गत बदल लक्षात घेऊन त्याच्याशी जुळवून घेण्यात नाथाभाऊही कमी पडले, हे नाकारता येणार नाही. राजकारणात नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा वैयक्तिक असल्या, तरी त्याला सार्वजनिक स्वरूप देण्याचा प्रयत्न होतो, हे अनेकदा घडलेले आहे. खडसेही त्याला अपवाद नाहीत. शिवाय, त्यांनी सातत्याने केलेल्या तक्रारींच्या बाबतीत राज्याच्याच नव्हे, तर केंद्रातील नेत्यांनीही फारसा प्रतिसाद दिला नाही, याचाही अर्थ पुरेसा स्पष्ट होता. नाथाभाऊंना शेवटची तीन वर्षे मंत्रिमंडळातून बाहेर ठेवले तर गेलेच; शिवाय त्यांच्याच जळगाव जिल्ह्यातील गिरीश महाजन यांचा प्रभाव वाढत गेला आणि त्यांना नेतृत्वाचाही पाठिंबा होता. त्यातून खडसे यांची कोंडी आणखी वाढत गेल्याचे पाहायला मिळाले. ती कोंडी नाथाभाऊंनी अखेर फोडली आहे. आता त्यांचे हे सीमोल्लंघन राष्ट्रवादी काँग्रेसला किती बळ देते, ते बघायचे. स्पर्धात्मक राजकारणात कोणताही झेंडा हातात घेतला, तरी शेवटी स्वतःला सिद्ध करून दाखविण्याचे आव्हान असते आणि त्या आव्हानाला सतत सामोरे जावे लागते. ‘राष्ट्रवादी’ आता त्यांना नेमके कोणते स्थान आणि संधी देणार, हे लवकरच कळेल. तूर्त भाजपच्या अंतर्गत पातळीवरील नाथाभाऊंच्या संघर्षाचा अध्याय संपला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप