अग्रलेख : ऐन उन्हाळ्यातील कडाक्‍याची लढाई!

अग्रलेख : ऐन उन्हाळ्यातील कडाक्‍याची लढाई!

प. बंगाल, तमिळनाडू, केरळसह पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्याने आघाड्यांचे राजकारण गतिमान होत आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर अंतर्गत मतभेदाला तोंड देणाऱ्या काँग्रेसने पुदुच्चेरीतील सत्ताही गमावली आहे. अशा स्थितीत भाजपचे आव्हान आणि प्रादेशिक पक्षांशी काँग्रेस कशी मोट बांधते यावर राजकारण आकाराला येईल.

अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा अखेर जाहीर झाल्या असल्या तरी त्यानंतरच्या अवघ्या २४तासात ज्येष्ठ काँग्रेसजनांनी पक्षनेतृत्वाला दिलेला इशारा हीच त्यापेक्षा मोठी बातमी ठरली आहे. आता एप्रिलच्या कडाक्‍याच्या उन्हाळ्यात पश्‍चिम बंगाल आणि आसाम या पूर्वेकडील दोन राज्यांबरोबरच तमिळनाडू, केरळ तसेच पुदुच्चेरी या दक्षिणेकडील तीन राज्यांतही निवडणुकांचे रण पेटणार आहे. या निवडणुकांचे प्रथमदर्शनीच सामोरे येणारे ठळक वैशिष्ट्य हे की या पाचपैकी एकाच राज्यात, आसाममध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार आहे. पुदुच्चेरी या एकाच राज्यात असलेली सत्ता गेल्याच आठवड्यात काँग्रेसला गमवावी लागली. निवडणुकीच्या तोंडावर आपलेच आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचे बघणे काँग्रेसच्या नशिबी आले. त्यामुळे एका अर्थाने भाजप तसेच काँग्रेस या दोन्ही पक्षांना या निवडणुकांत मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. या निवडणुकांमधील आणखी एक ठळक बाब म्हणजे हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात मैदानात या पाचही राज्यांत असले, तरी त्यांची खरी लढत ही प्रादेशिक पक्षांच्या विरोधातच आहे! या निवडणुकीतील सर्वात लक्षवेधी आणि अर्थातच अटीतटीची लढत ही प. बंगालमध्ये आहे. तेथे डाव्यांच्या नेतृत्वाखालील जवळपास तीन दशकांच्या वर्चस्वाला तडा देऊन दहा वर्षे राज्य करणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्याकडून सत्ता हिसकावण्यासाठी भाजपने सर्वस्व पणाला लावले आहे. तर त्याच राज्यात डाव्या पक्षांनी सहकार्याचा हात पुढे केलेला असतानाच, केरळमध्ये याच डाव्यांच्या विरोधात लढणे नशिबी आलेल्या काँग्रेसची त्यामुळे भलतीच पंचाईत झाली आहे! तर तमिळनाडूमध्ये यावेळी पहिल्यांदाच द्रमुकचे नेते करुणानिधी आणि आण्णा द्रमुकच्या नेत्या जे. जयललिता यांच्या निधनामुळे त्यांच्याशिवाय पहिल्यांदा निवडणूक होत आहे. त्यामुळे दुसऱ्या फळीतून पहिल्या फळीत आलेल्या नेतृत्वाचा कस यावेळी लागेल. सलग दोनदा निवडून येणारा अण्णाद्रमुक यावेळी हॅटट्रीक करेल काय, हे पाहण्यासारखे आहे. अनपेक्षितरित्या जयललितांच्या निकटवर्ती शशीकला तुरूंगवासातून बाहेर पडल्यामुळे आण्णा द्रमुकमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे येथील निवडणूक कमालीची रंगतदार होऊ शकते.

मात्र, निवडणुका पाच राज्यात असल्या तरी संपूर्ण देशाचं लक्ष खऱ्या अर्थाने प. बंगालकडेच केंद्रीत आहे. डाव्यांची ३३वर्षे सत्ता असलेले हे राज्य संघपरिवाराने कधीपासूनच आपले लक्ष्य केले होते. आता तर २७टक्के मुस्लिम लोकसंख्येच्या या राज्यात थेट प्रभू रामचंद्रांना मैदानात उतरवून भाजपने ध्रुवीकरण हाच या निवडणुकीतील कळीचा मुद्दा बनवला आहे. या पार्श्वभूमीवर तेथे काँग्रेस काय भूमिका घेतो, यावर बरेच काही अवलंबून असले तरी अद्याप काँग्रेसला एकुणातच या निवडणुकांसंबंधात काही धोरण वा दिशा ठरवता आल्याचे राहुल गांधी यांनी केरळ तसेच पुदुच्चेरीच्या केलेल्या दौऱ्यानंतरही दिसून आलेले नाही. मात्र, देशव्यापी पक्ष म्हणून आपले स्थान भारताच्या नकाशावर अधोरेखित करण्याची काँग्रेसला ही आयती संधी असतानाच गेल्या ऑगस्टमध्ये काँग्रेस हायकमांडला असाच इशारा देणाऱ्या काँग्रेसजनांनी पुन्हा दिलेला इशारा म्हणजे अपशकुनच आहे, असा प्रचार आता कायम ‘गांधी...गांधी!’ असा गजर करणारे पक्षातील ‘जी हुजूर!’ म्हणणारे कार्यकर्ते करतीलच. मात्र, कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद, मनीष तिवारी, अभिषेक मनू सिंघवी यांनी मात्र आपण काँग्रेसचाच प्रचार या पाचही राज्यांत करणार असल्याची ग्वाही त्याचवेळी देऊन पक्षावरील निष्ठाही जाहीर केली आहे. त्यामुळे एकीकडे जनतेला सामोरे जाताना, या पक्षांतर्गत मतभेदांना कसे तोंड द्यायचे, हा आणखी प्रश्न सोनिया, राहुल तसेच प्रियांका या गांधी कुटुंबियांपुढे आहे.

या पार्श्वभूमीवर बंगालबरोबरच दक्षिणेत आपले बस्तान बसवण्यास भाजप सज्ज झाल्याचे चित्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा यांचे दक्षिणेकडील दौरे तर निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याच्या आधीच सुरू झाले होते. त्यातच राहुल यांच्या अलीकडच्या एका विधानामुळे उत्तर भारत विरुद्ध दक्षिण असा सामना भाजप उभा करू पाहत आहे. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने भाजपला ध्रुवीकरण सहजासहजी साध्य करता आले, तशी स्थिती ना केरळमध्ये आहे ना तमिळनाडूमध्ये. त्यामुळे तमिळनाडूत शशीकला यांना हाताशी धरून भाजप आपले फासे टाकू पाहत आहे. तर प. बंगालमध्ये २०१६मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे अवघे तीनच आमदार निवडून आलेले असले तरी नंतरच्या तीनच वर्षांत झालेल्या निवडणुकीत भाजप तेथे मुसंडी मारण्यात यशस्वी झाला होता. गेल्या काही महिन्यांत ममतादीदींच्या तृणमूल काँग्रेसचे अनेक बडे नेते भाजपच्या गळ्याला लागले आहेत. त्यामुळेच तेथील या कडाक्‍याच्या रणसंग्रामात हिंसाचारही मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्‍यता दिसते आहे. म्हणूनच तेथील अवघ्या २९४ जागांसाठी आठ टप्प्यात मतदान विभागण्यात आले आहे. एक मात्र खरे की, गेल्या महिनाभरात पेट्रोल-डिझेल तसेच स्वयंपाकासाठी लागणारा गॅस यांच्या दरात झालेली बेसुमार वाढ हा मुद्दा ऐरणीवर आणण्यात बिगर भाजप पक्ष कितपत यशस्वी होतात, त्यावर बऱ्याच प्रमाणात या निवडणुकांचे निकाल अवलंबून आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com