अग्रलेख - विघ्नहर्त्याचा आरोग्योत्सव

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 22 August 2020

कोरोनाविषाणूने अवघ्या धरतीवर आणलेल्या भयावह संकटावर मात करण्याची प्रार्थना ‘श्रीं’च्या मूर्तीसमोर करताना,आज आपण हा उत्सव सध्याच्या काळातील सर्व नियमांचे पालन करूनच साजरा करण्याची प्रतिज्ञा करायला हवी

गणपती या दैवताची वेगवेगळी रूपे आहेत आणि प्रत्येक भक्ताला त्यातील कोणते ना कोणते रूप विशेषत्वाने भावते. पण यंदाचा गणेशोत्सव सुरू होत आहे, तो अशा काळात, की प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर त्याचे ‘विघ्नहर्ता’ हे रूप प्रामुख्याने आहे. गंभीर अशा साथसंसर्गाला विनाऔषध तोंड देतादेता समस्त विश्‍वाच्याच नाकीनऊ आल्याचे दिसत आहे. अशा काळात आपल्या घरात विराजमान होत असलेल्या या विश्‍वाच्या नियंत्याने आपली सुटका करावी, अशीच प्रार्थना मनोमन प्रत्येक जण करतो आहे. अर्थात नुसती प्रार्थना करून भागणार नाही. हे दैवत आपल्याला बुद्धी देते आणि त्याचबरोबर सामंजस्याने, तसेच विवेकाने वागण्याचीही शिकवणूक देते. त्यामुळेच कोरोना विषाणूने अवघ्या धरतीवर आणलेल्या भयावह संकटावर मात करण्याची प्रार्थना ‘श्रीं’च्या मूर्तीसमोर करताना, आज आपण हा उत्सव सध्याच्या  काळातील सर्व नियमांचे पालन करूनच साजरा करण्याची प्रतिज्ञा करायला हवी. 

कोरोनाच्या साथीमुळे हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी जारी झालेली ‘ठाणबंदी’ थेट गणेशोत्सवापर्यंत चालू राहील, याची तेव्हा कोणालाच कल्पना नव्हती. ठाणबंदी जारी करणे भाग पडलेल्या शासनकर्त्यांना ती नव्हती, तसेच त्या विषाणूच्या विरोधात सर्वस्व पणाला लावून उभ्या ठाकलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनाही नव्हती. त्यामुळेच या विषाणूचे मळभ अधिक गडद होत गेल्यानंतर समाजधुरिणांनी हा उत्सव यंदा अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे मनापासून ठरवले होते. लोकमान्य टिळक, तसेच भाऊसाहेब रंगारी यांनी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात या उत्सवाची गुढी एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस उभारली होती. यंदा त्याच उत्सवाची राजधानी असलेल्या पुण्यातील मानाच्या पाच गणेश मंडळांनी ‘कोरोना’च्या फैलावामुळे हा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेऊन नवा पायंडा पाडला. त्या पार्श्‍वभूमीवर या उत्सवाची ‘आर्थिक’ राजधानी असलेल्या मुंबईतील ‘लालबागचा राजा’ या ८६ वर्षांची परंपरा असलेल्या मंडळाने यंदा ‘श्रीं’च्या मूर्तीची प्रतिष्ठापनाच न करता या उत्सवाचा ‘आरोग्योत्सव’ करण्यासंबंधात घेतलेल्या निर्णयाचे करावे तितके कौतुक थोडेच आहे. महाराष्ट्राच्या बहुतेक सर्व भागांत सर्वसाधारणपणे असेच निर्णय झाले आहेत आणि कोल्हापूरकरांनी तर यंदा वर्गणीदेखील न घेता आणि कोणताही डामडौल वा बडेजाव न माजवता छोटेखानी मूर्ती आणून पूजाअर्चा करण्याचे ठरविले आहे. त्याचे अनुकरण हे सर्वांनीच श्रीगणेशावरील निष्ठेपोटी करायला हवे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सव हा आता केवळ आपल्या राज्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. देशभरात त्याचे लोण एक आनंदोत्सव म्हणून पसरले आहे. मात्र, आपण हा उत्सव अत्यंत कठोरपणे ठाणबंदीतील नियमांचे पालन करून साजरा करण्याचे ठरविलेले असताना, अन्य राज्यांतील परिस्थिती मात्र वेगळी आहे. कर्नाटक आणि तमिळनाडू ही त्याची दोन ठळक उदाहरणे. अन्य अनेक राज्यांप्रमाणे कर्नाटकानेही हा उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्यास बंदी घातली आणि तो निर्णय प्रशंसनीयच होता. मात्र, मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी गुरुवारी अचानकपणे तो निर्णय मागे घेतला आणि रस्तोरस्ती आनंद साजरा करण्यास परवानगी दिली. तर तमिळनाडूतील अण्णाद्रमुक सरकार या उत्सवाच्या सार्वजनिक स्वरूपावर घातलेल्या बंदीच्या निर्णयावर ठाम राहिल्यामुळे वादंग उठले आहे. अण्णाद्रमुकचा मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षानेच त्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. यातून मार्ग काढण्याची राज्यकर्त्यांना ‘बुद्धी दे! एवढीच प्रार्थना आपण करू शकतो. महाराष्ट्रात सरकारने बराच घोळ घालून का होईना अखेर स्थलांतरित कोकणवासीयांना ‘श्रीं’च्या पूजनासाठी कोकणात आपल्या गावी जाण्याची अनुमती दिली. शिवाय, आता एसटी सेवा सुरू झाल्यामुळे शहरांतील अनेकांना गावाकडच्या आपल्या घरी सणासाठी जाता येणार आहे. अर्थात, तेथेही त्यांनी संयमानेच हा उत्सव साजरा करावयाचा आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात श्रावणानंतरच्या चार दिवसांतच येणारे ‘श्रीगणेश’ हे पुढच्या काही महिन्यांत अनेक छोट्या-मोठ्या उद्योगांना चालना देतात. गणेशोत्सवाच्या पाठोपाठ नवरात्र येते आणि लगेचच दसरा-दिवाळीचे वेध लागतात. या सर्वच सणांच्या निमित्ताने मोठी आर्थिक उलाढाल होत असते. ‘कोरोना’च्या सावटामुळे त्यास बसलेली खीळ ही यंदा ‘श्रीं’च्या मूर्तिकारांवर कुऱ्हाड घेऊन आली आहे. महाराष्ट्रातील पेणच्या गणेशमूर्ती यंदा आपल्यापैकी अनेकांच्या घरी येऊ शकलेल्या नाहीत. तर तिकडे दूर चंडीगडमध्येही गणेशमूर्तींना गतवर्षीच्या तुलनेत जेमतेम ५० टक्‍क्‍यांचीच मागणी असल्याचे वृत्त आहे. गेल्या पाच-सहा महिन्यांतील ठाणबंदीमुळे अर्थव्यवस्थाही पुरती ठप्प झाली आहे आणि सणासुदीच्या या मोसमात त्यानिमित्ताने चार पैसे कनवटीला लावू पाहणाऱ्यांची सारी स्वप्ने ‘कोरोना’ने हिरावून घेतली आहेत. त्यामुळे आज होणारे श्रीगणेशाचे आगमन नवी पहाट घेऊन येईल आणि गुदमरलेल्या समाजव्यवस्थेबरोबरच कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेलाही गती देईल, असे आशेचे किरण उत्सवाच्या निमित्ताने आसमंत उजळून टाकत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article about ganeshotsav