अग्रलेख : काळ, काम आणि वेगाचे गणित!

Government Office Government Employees
Government Office Government Employees

कार्यालयीन कामाची वेळ सरसकट ‘दहा ते पाच’ ठेवण्यापेक्षा त्यात लवचिकता आणयला हवी,  ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सूचना केवळ वाहतूक नियोजनाच्या दृष्टीनेच नव्हे, तर कार्यशैली आणि पद्धती बदलण्याच्या दृष्टीनेही विचारात घ्यायला हवी.

देशावर कोरोना विषाणूच्या लाटेचे संकट नव्याने घोंगावत असून, महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरांमधील बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या पारंपरिक जीवनशैलीत काही आमूलाग्र बदल करावे लागले आहेत. ‘वर्क फ्रॉम होम’ अशी संकल्पना अवघ्या वर्षभरापूर्वी कोणी चर्चेत आणली असती, तर त्याची गणना जगातील आणखी एका मूर्खात करून आपण मोकळे झालो असतो! मात्र, या कोरोनानामक विषाणूने ती संकल्पना आपल्याला स्वीकारणे भाग पाडले आहे. 

अर्थात, त्यामागे रस्तोरस्ती तसेच प्रवासात होणारी गर्दी टाळणे, हेच एकमेव उद्दिष्ट होते. त्यामुळेच आता प्रामुख्याने देशातील प्रमुख  महानगरांमध्ये ‘ब्लू कॉलर’ कष्टकरी असो की ‘व्हाइट कॉलर’ बाबू मंडळी असोत; त्यांची प्रवासात होणारी गर्दी टाळण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारी कार्यालयातील ‘दहा ते पाच’ ही कामाची पारंपरिक वेळ बदलण्याची सूचना केली आहे. त्यांनी ही सूचना थेट ‘निती आयोगा’च्या बैठकीत केली आणि केंद्र सरकारने त्यासंदर्भात काही निश्चित धोरण स्वीकारावे, असाही आग्रह या वेळी धरला. त्यामुळेच ठाकरे केवळ मुंबई वा महाराष्ट्रापुरता विचार करत नव्हते, हेही स्पष्ट झाले. ‘दहा ते पाच’ या कामाच्या वेळेत बदल करावयाचा म्हणजेच विविध आस्थापना, तसेच कार्यालये यांच्यासाठी ही एकच पारंपरिक वेळ न ठेवता, वेगवेगळ्या ठिकाणी कामाच्या वेळा वेगवेगळ्या असाव्यात, अशी त्यांची सूचना आहे. अर्थात, मुंबईकरांसाठी ही मागणी नवी नाही. या महानगरात बहुतेक सरकारी तसेच निमसरकारी आणि खासगी कार्यालये ही दक्षिण मुंबईतील नरिमन पॉइंट, फोर्ट, बॅलार्ड परिसरात आहेत. त्यामुळे तेथील सर्वांची कामाची वेळ एकच असल्याने मस्टर गाठण्यासाठी एकाच वेळी मुंबईतील लोकल रेल्वेगाड्या दुथडी भरून वाहत असतात. ही गर्दी रोखण्यासाठी अशी सूचना अनेकदा पुढे आली होती आणि त्यास जनतेचा पाठिंबा असतानाही त्याची अंमलबजावणी मात्र कधीच झालेली नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी ही सूचना नव्याने केली आहे. तिचा केवळ सध्याच्या संकटापुरता नव्हे, तर दूरगामी वाटचालीच्या दृष्टीने विचार करायला हवा. बहुतेक सरकारी तसेच बऱ्याच खासगी कार्यालयांमध्येही कामाची वेळ एकच असल्याने केवळ मुंबईकरांचीच नव्हे तर देशाच्या सर्वच भागात अनेकांची अडचण होत असते. सरकारी कार्यालयात काही काम असले तर रजा घेण्याशिवाय पर्याय नसतो. हे लक्षात घेऊनच पूर्वी ‘दहा ते पाच’ याच वेळात असलेल्या बँका आता सकाळी लवकर सुरू होतात. जागतिकीकरणानंतर सर्वच क्षेत्रांत फार झपाट्याने बदल होत गेले आणि कामाच्या वेळांपासून इतर सेवाशर्तींमध्येही व्यापक बदल झाले. असे असताना सरकारमधील कार्यसंस्कृती मात्र फारशी बदलली नाही. केवळ वाहतुकीच्या नियोजनासाठीच नव्हे, तर काळाच्या आव्हानांचा विचार करूनही ‘दहा ते पाच’ या पारंपरिक पठडीत बदल व्हायला हवा. दहा ते पाच ही वेळ आपल्या मानसिकतेत पूर्वापार रुजली आहे, ती पूर्णपणे रद्द करावी, असे कोणीच म्हणणार नाही. मात्र कामाचे स्वरूप लक्षात घेऊन त्यानुसार लवचिकता स्वीकारणे आवश्यक आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोना विषाणूने आपल्या जगण्याच्या साऱ्याच संकल्पना आरपार बदलवून टाकल्या असताना मग हे काळ-काम-वेगाचे गणित तरी सोडवायला हरकत काय असावी? जी गोष्ट कामाच्या वेळांची आहे, तीच गोष्ट ही शाळा तसेच महाविद्यालयांमधील शिक्षणाची आहे. जे मोबाईल फोन आपण लहानग्यांच्या हातात देऊ नये, असे आजवर म्हणत आलो होतो, तेच त्यांच्या शिक्षणाचे आता प्रमुख साधन बनले आहे. त्यामुळेच यापुढे नवे शैक्षणिक अभ्यासक्रम तयार करतानाही, ‘घरातून शिक्षण’ ही संकल्पना नजरेआड करता कामा नये. कोरोनानंतरचे जग हे आपल्या स्वप्नातही नसलेले जग आहे आणि आता त्यास सामोरे जातानाच नव्हे, तर सोबत घेऊन पुढे जाताना आपल्याला हे बदल स्वीकारण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. ‘कोरोनाबरोबरची लढाई आता संपलेली आहे आणि खुद्द पंतप्रधानही व्हिडिओच्या माध्यमातून बैठका घेत आहेत. त्यामुळेच आपणही या बदलाला सामोरे जात कार्यालयीन कामकाजाच्या वेळा वेगवेगळ्या ठेवायची तयारी दाखवायला हवी,’ असेही उद्धव यांनी सांगितले. त्यातील पूर्वार्ध हा तितकासा खरा नसला, तरी उत्तरार्ध हा निश्चितच विचार करायला लावणारा आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने हा विषय, त्यात राजकारण न आणता गांभीर्याने घ्यायला हवा. राज्य सरकारही आपल्या अखत्यारीत किमान राज्यातील प्रमुख महानगरांमध्ये या वेळा बदलू शकते. कोरोनाकाळात आपण सामोऱ्या आलेल्या अनेक अडचणींचे रूपांतर संधीत केले आणि आपली जीवनशैली बदलत, जगण्याचे नवनवे मार्ग अंगीकारले, हे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे खरेच आहे. नवे तंत्रज्ञान आपल्याबरोबर नवी जीवनशैलीही आणू पाहत आहे. त्याचा स्वीकार करूनच आता पुढे जावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com