esakal | अग्रलेख :  इम्रान व्हर्सेस इलेव्हन
sakal

बोलून बातमी शोधा

अग्रलेख :  इम्रान व्हर्सेस इलेव्हन

‘पाकिस्तान तेहेरिक-ए-इन्साफ’चे नेते व पंतप्रधान इम्रान खान आणि लष्करप्रमुख कमर बाजवा यांच्याविरुद्ध बिगुल फुंकला. आगामी काळात आंदोलनाला अधिक धार येण्याची चिन्हे आहेत.

अग्रलेख :  इम्रान व्हर्सेस इलेव्हन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

‘आपली धोरणे आणि विशेषाधिकारांचे रक्षण करणारी व्यवस्थाच पाकिस्तानी लष्कराला प्रिय असते,’ असे विधान पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांनी केले होते. या वास्तवाचा प्रत्यय पाकिस्तानच्या बाबतीत नेहमीच येत असतो. पण, इम्रान खान लष्कराच्या इतके आहारी गेले आहेत, की फक्त ‘चेहरा’ त्यांचा आणि निर्णय प्रक्रियेची सूत्रे लष्कराच्या हाती, असे चित्र निर्माण झाले. विरोधकांच्या ताज्या आंदोलनाचा रोख त्यामुळेच सरकार आणि लष्कर, या दोघांवरही आहे. आत्मघाती हल्ल्याच्या बळी ठरलेल्या बेनझीर यांच्या तेराव्या स्मृतिदिनी कराचीत आणि त्याआधी गुजरानवाला येथे अकरा विरोधी पक्षांनी ‘पाकिस्तान डेमॉक्रॅटिक मूव्हमेंट’च्या झेंड्याखाली एकत्र येत सरकार आणि लष्कराविषयी रॅलीद्वारे असंतोष प्रकट केला. ‘पाकिस्तान तेहेरिक-ए-इन्साफ’चे नेते व पंतप्रधान इम्रान खान आणि लष्करप्रमुख कमर बाजवा यांच्याविरुद्ध बिगुल फुंकला. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली. आगामी काळात आंदोलनाला अधिक धार येण्याची चिन्हे आहेत. माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज), भुट्टोंची पाकिस्तान पीपल्स पार्टी, पख्तुनवा मिली आवामी पार्टी, बलोच नॅशनल पार्टी, पश्‍तुन तहफूज मूव्हमेंट, जमैत उलेमा-ए-इस्लाम (फजलूर) अशा पक्षांची ही मोट आहे. तिचे नेतृत्व मौलाना फजलूर रेहमान करत आहेत. पाकिस्तानातील लोकशाहीचे अवमूल्यन, ढासळती आर्थिक स्थिती, वाढती बेरोजगारी, महागाईची उड्डाणे असे प्रश्‍न रॅलीत उपस्थित करण्यात आले. सुमारे २७ महिन्यांपूर्वी निवडणुकीत विरोधी पक्षांना खिंडार पाडत, पडद्यामागून लष्कराचे साहाय्य घेत पाकिस्तानात इम्रान खान सत्तेवर आले. पण, त्यांनी साऱ्या देशाचे वाटोळे केले, अशी त्यांच्यावर सातत्याने टीका होते. विरोधक त्यांना ‘मास्टर डिझास्टर’ संबोधतात. त्यांची कारकीर्द आणि त्यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानची वाटचाल यावर नजर टाकली, तर ही उपाधी रास्त वाटते. कारण, जीवनावश्‍यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. उद्योग, व्यवसाय बंद पडण्याचे प्रमाण वाढले. कर्जाचा बोजा वाढला. आर्थिक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी बाजवाच पुढाकार घेताना दिसतात. सौदी अरेबियाने मदतीपोटी दिलेली रक्कम परत मागितली तेव्हाही तेच सौदीच्या राजाला भेटायला गेले होते. अनेक राष्ट्रप्रमुखांना इम्रान भेटत असताना ते शेजारील खुर्चीवर असतात. इम्रान खान यांची वेसण कोणाच्या हातात आहे, याचे पाकिस्तान जगाला ढळढळीत दर्शन घडवीत असतो. रॅलीला तीनदा पंतप्रधानपद भूषवलेल्या नवाज शरीफ यांनी लंडनमधून संबोधित केले. त्यांनी लष्कराच्या एकूण भूमिकेवर सडकून टीका केली. मात्र, ती करताना आपणही एकेकाळी त्याच्या ओंजळीने  पाणी प्यायलोय, हे ते विसरले. तरीही त्यांच्या टीकेने लष्करात अस्वस्थता आहे. नवाज यांच्या कन्या मरियम आणि बेनझीर यांचे पुत्र बिलावल हे दोघेही घराण्याचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी सरसावले आहेत. यानिमित्ताने या राष्ट्रीय पक्षांनी प्रादेशिक पक्षांशीही हातमिळवणी केली आहे. मौलना फजलूर यांच्यासारख्यांना सोबत घेत त्यांना या आघाडीत पुढे करण्यात आले आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

इम्रान खान यांचे सरकार विरोधकांना खिजगणतीतही धरत नाहीत. इम्रान आणि सातत्याने देशाला आपल्या बुटाच्या टाचेखाली ठेवणारे लष्कर काय पावले उचलते, हे पाहावे लागेल. अफगाणिस्तानात शांततेसाठी तालिबान्यांशी सुरू असलेल्या वाटाघाटी, चीनच्या कर्जाखाली आलेला पाकिस्तान अमेरिकेपासून काहीसा दुरावलेला आहे. याच अमेरिकेच्या मेहेरबानीवर लष्कर आणि तेथील सरकार पोट भरत होते. आता चीनकडे तोंड वेंगाडण्यात त्यांना धन्यता वाटते आणि चीनलाही ते सोईचे वाटते. सौदी अरेबियाशीही त्यांचे बिनसले आहे. जनमताचा रेटा, आंतरराष्ट्रीय जनमत आणि बाजवा यांची लष्कर व व्यवस्थेतील एकूण स्थिती हे पाहता सरकारला बाजूला सारून सत्ता हातात घेण्याचे धाडस लष्कर नजीकच्या काळात करेल, असे वाटत नाही. तथापि, या घडामोडींचा अन्वयार्थ लावत भारताला काळजीपूर्वक व्यूहरचना ठरवावी लागेल. ‘लंडनमधील नवाज शरीफ यांना भारतीय वकिलातीतून लिखित भाषण दिले गेले,’ असा आरोप पाकिस्तान सरकारने केला आहे. भारतद्वेष हाच सर्व समस्यांवर अक्‍सीर इलाज हे समीकरण पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांच्याच नव्हे, तर तेथील एकूण राजकीय वर्गाच्या डोक्‍यात पक्के बसलेले आहे. त्यामुळेच विरोधकांनीही काश्‍मीरप्रश्‍नी इम्रान खान यांनी बोटचेपी भूमिका घेतल्याचा आरोप केलाच. एकूणच, ‘इम्रान व्हर्सेस इलेव्हन’ या नव्या लढाईतून काही वेगळे आकाराला येईल, अशी शक्‍यता नाही. विशेषतः जोपर्यंत ‘पंच’ म्हणून तेथे लष्करच ठाण मांडून बसले आहे तोपर्यंत. सत्तेला हादरे बसू लागले वा देशात काही अस्थिरतेचे प्रसंग घडले, की तेथील सत्ताधाऱ्यांना पहिली आठवण होते ती भारताची. ‘नया पाकिस्तान’चा नारा देणारे इम्रान खानही याला अपवाद नाहीत. राजकीय आव्हान जसजसे गडद होऊ लागेल, तसतसे इम्रान खान भारतविरोधाचा आवाज आणखी वरच्या पट्टीत लावतील. काही आगळीक करण्याचा धोकाही नजरेआड करता येणार नाही. भारताला सावध राहावे लागेल, ते त्यामुळेच. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप