esakal | अग्रलेख  : "आयपीएल'ची हिसाबनीती! 
sakal

बोलून बातमी शोधा

ipl

माणसाच्या आयुष्यातील खेळालाच खीळ बसणे, ही सर्वात अनिष्ट बाब मानली पाहिजे. याचे कारण खेळ हा केवळ त्या त्या स्पर्धेपुरता नसतो, विजय-पराजय, यश-अपयश याकडे कसे पाहायचे हेही तो शिकवत असतो.

अग्रलेख  : "आयपीएल'ची हिसाबनीती! 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

अवघ्या जगावर कोरोना विषाणूचे सावट घोंगावू लागल्यामुळे ओस पडलेली मैदाने आता हळूहळू जागी होऊ लागली आहेत. युरोप, अमेरिकेत तुफान लोकप्रिय असलेले फुटबॉलचे सामने सुरू झाले आहेत आणि इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामने "विनाप्रेक्षक' का होईना पार पडले आहेत; आणि आता "इंडियन प्रिमिअर लीग' -आयपीएल- स्पर्धाही होऊ घातली आहे. माणसाच्या आयुष्यातील खेळालाच खीळ बसणे, ही सर्वात अनिष्ट बाब मानली पाहिजे. याचे कारण खेळ हा केवळ त्या त्या स्पर्धेपुरता नसतो, विजय-पराजय, यश-अपयश याकडे कसे पाहायचे हेही तो शिकवत असतो. त्यामुळे मैदाने पुन्हा गजबजू लागणे, याइतकी दुसरी चांगली गोष्ट नाही. मात्र, या स्पर्धेचे संयोजन करणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळापुढे (बीसीसीआय) मुख्य अडचण होती, ती क्रिकेटच्या जागतिक कॅलेंडरमधील तारखांची! मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) येत्या ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होऊ घातलेली आंतरराष्ट्रीय "टी-20' विश्वचषक स्पर्धा कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन वर्षभरासाठी पुढे ढकलताच "आयपीएल'ची दारे सताड उघडली जाणे, हा निव्वळ योगायोग नाही. "आयसीसी'ने सोमवारी हा निर्णय जाहीर केल्यानंतर अवघ्या 24 तासांतच "आयपीएल' नियामक परिषदेचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी ही स्पर्धा यंदा संयुक्त अरब अमिरातीमध्ये सप्टेंबरमध्ये सुरू होणार असल्याचे जाहीर केले. 44 दिवस चालणारी ही स्पर्धा दुबई, अबूधाबी आणि शारजा या तीन शहरांत होणार असल्याने या स्पर्धेच्या टीव्ही प्रसारणाचे हक्क 1600 कोटी रक्कम देऊन खरेदी करणाऱ्या टीव्ही वाहिनीला मोठाच दिलासा मिळाला असणार यात शंका नाही. या स्पर्धेचे प्रायोजक आणि मुख्य म्हणजे संध्याकाळच्या निवांत वेळेत या स्पर्धेचा आनंद लुटणारे कोट्यवधी क्रिकेटप्रेमी या सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला असणार. 

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे  अॅप

अर्थात, "आयपीएल' भारताबाहेर खेळवली जाण्याची ही काही पहिलीच घटना नाही. 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीमुळे या स्पर्धेसाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था उपलब्ध होत नसल्यामुळे ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळवली गेली. तर 2014 मध्ये या स्पर्धेचा पहिला टप्पा लोकसभा निवडणुकीमुळेच संयुकत अरब अमिरातीतच खेळवला गेला होता. मात्र, यंदा पुनश्‍च याच अमिरातीची निवड होण्यामागेदेखील "हिसाबनीती" आहे. 2014मध्ये "आयपीएल'चा पहिला टप्पा तेथे खेळवला, तेव्हा त्या सामन्यांना अडीच लाखांहून अधिक प्रेक्षकांनी हजेरी लावली होती आणि त्यामुळे "बीसीसीआय'च्या गंगाजळीत 250 कोटींची घसघशीत भर पडली. त्यामुळे आर्थिक गणिते लक्षात घेऊनच संयुकत अरब अमिरातीची निवड झाली आहे, हे उघड आहे. "बीसीसीआय'ला या लीगच्या निव्वळ टेलिव्हिजन प्रक्षेपणाच्या हक्कातून प्रतिवर्षी साधारणपणे 1600 कोटी रुपये मिळतात. तसा पाच वर्षांचा करारच "स्टार इंडिया' या खासगी वाहिनीने "बीसीसीआय'शी केला आहे. जगभरात "आयपील'चे सामने ज्या ज्या देशांचे खेळाडू या लीगमध्ये खेळत असतात, तेथे तर हे सामने बघितले जातातच; पण पाकिस्तानसारख्या देशाचा एकही खेळाडू या लीगमध्ये खेळत नसतानाही, तेथेही मध्यरात्रीपर्यंत जागत हे सामने बघणारे लक्षावधी चाहते आहेत. त्यामुळेच या क्रिकेटवेड्या देशांमधील खासगी चॅनेल्सना या "लाइव्ह' प्रक्षेपणाचे हक्क विकून "बीसीसीआय'शी केलेल्या करारातील रकमेच्या दुपटीहून अधिक रक्कलम "स्टार इंडिया'च्या पदरात पडत असते. आंतरराष्ट्रीय "टी-20' स्पर्धा पुढे ढकलण्याचा जो काही निर्णय सोमवारी "आयसीसी'ने घेतला, त्यास याच प्रसारणाचे हक्क घेणाऱ्या वाहिनीने लिहिलेले एक पत्रही कारणीभूत आहे. ही बाब लक्षात घेतल्यावर क्रीडाप्रेमापेक्षाही त्यातील अर्थकारण कसे कारणीभूत आहे, हे स्पष्ट होते. 

"आयसीसी"ने आंतरराष्ट्रीय "टी-20' स्पर्धा पुढे ढकलताना "कोरोना'च्या प्रादुर्भावाचे कारण पुढे केले आहे. या पार्श्वभूमीवर आता "आयपीएल' होत असल्यामुळे संयुक्त अरब अमिरातीत या विषाणूने पायच टाकलेला नाही काय, असा कोणाचा समज होऊ शकतो. प्रत्यक्षात आजमितीला तेथे 57 हजार 498 बाधित असून, त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 341 आहे, हे विसरता कामा नये. पण "कोरोना'चे भय बाळगत किती दिवस मैदाने उजाड ठेवणार, असा विचार त्या देशाने केलेला दिसतो. भारतात या स्पर्धा झाल्या असत्या, तर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगारनिर्मितीला फायदा झाला असता, हे खरे आहे; पण त्यात मोठी जोखीमही होती. आता आखाती देशात "आयपीएल' आयोजित करण्यामागे निव्वळ क्रिकेटप्रेम नसून, त्यामागे आर्थिक गणिते आहेत. "आयपीएल' रद्दच झाली असती, तर प्रक्षेपणाचे हक्क, प्रायोजक, तसेच अन्य मार्गांनी मिळणारे पैसे, अशा एकूण साडेतीन हजार कोटींवर "बीसीसीआय'ला पाणी सोडावे लागले असते. ते आता टळले आहे. "कोरोना' साथीच्या दुष्परिणामांमध्ये मानसिकतेवरील परिणाम हाही मोठा घटक आहे, असे सर्वदूर प्रत्ययाला येत आहे. सध्या त्यामुळे निर्माण झालेली मरगळ दूर होण्यास या सामन्यांचा उपयोग होईल, हेही नसे थोडके.

loading image