आकाशाशी  जडले नाते!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 January 2021

नाशिकमध्ये मार्चच्या अखेरीस होणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. नारळीकरांची बहुमताने निवड झाली, हा मराठी साहित्यासाठीही मैलाचा दगड मानावा लागेल, तो यासाठीच.

‘कुठेतरी काहीतरी पारलौकिक असे आपल्याला ज्ञात होण्यासाठी धडपडत असते,’ अशा शब्दांत विख्यात विज्ञानकथा लेखक आणि खगोलतज्ञ कार्ल सेगन यांनी विज्ञानाची माणसाकडे धावण्याची ओढ मांडली होती. विज्ञानाला तशी ओढ असेलही, पण धर्म, भाषा, प्रांत असली कुंपणे पडली की सारेच खुंटते. ज्या भाषेत विज्ञान व्यक्त होऊ लागते, तीच खरी ज्ञानभाषा असते. त्या निकषावर इंग्रजी भाषा सर्वात अव्वल, हे खरेच. पण, डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे मोठेपण असे की याच विज्ञानाला त्यांनी मराठीत व्यक्त व्हायला लावले. काही प्रमाणात विज्ञानालाच मराठीचे धडेही दिले. कुठल्याही भाषेच्या साहित्यात विज्ञानसाहित्याची भर पडत जाणे, हे त्या भाषेलाही प्रगल्भ आणि परिपूर्ण करणारे असते. नाशिकमध्ये मार्चच्या अखेरीस होणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. नारळीकरांची बहुमताने निवड झाली, हा मराठी साहित्यासाठीही मैलाचा दगड मानावा लागेल, तो यासाठीच. एरवी विज्ञानकथा आणि विज्ञानलेखनाबाबत मराठीतला उत्साह मर्यादितच होता व आहे. नाही म्हणायला साठोत्तरी मराठी साहित्यात हाताच्या बोटावर मोजण्याइतके विज्ञानलेखक झाले. पण शेशंभर वर्षाच्या वाङ्‌मयीन इतिहासात (आणि वर्तमानातही) अवघे डझनभर विज्ञानलेखक निर्माण होणे, हे काही बरे लक्षण नाही. डॉ. नारळीकरांचे नाव त्यांच्यातही आघाडीचे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नारळीकरांचा जन्म कोल्हापूरचा असला तरी पुढले शिक्षण बनारसमध्ये झाले, तेथून भरारी घेतली ती केंब्रिज विद्यापीठात. खगोलभौतिकीतील कूटप्रमेये, क्‍लिष्ट समीकरणे आणि गुंतागुंतीच्या सिद्धांतांचे संशोधन करण्याचा सारा ज्ञानयज्ञ इंग्रजीतच पार पडला. त्या भाषेत खगोलभौतिकी, वैश्विकविज्ञान, गणित अशा अफाट विषयांत अत्युच्च शिखरे पादाक्रांत करतानाही त्यांची मराठीची नाळ तुटलेली नव्हती, हे विशेष. किंबहुना, मराठी भाषेवरही त्यांचे तितकेच प्रभुत्त्व राहिले. त्यांच्या लिखाणात ते सातत्याने दिसतही राहिले. डॉ. नारळीकरांच्या खुसखुशीत व्याख्यानात चुकूनही इंग्रजी शब्द डोकावत नाही, तरीही त्यांचे वक्तृत्त्व कधीही बोजड आणि कृत्रिम वाटत नाही, यातच सारे आले. ‘ज्ञान मातृभाषेतच द्यायला हवे, इंग्रजी शाळांमध्ये आपल्या मुलांना घालून मराठीचे वाचक कमी करण्यापलिकडे आपण काय साधले?’ असा प्रश्न जेव्हा डॉ. नारळीकरांसारखे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व करते, तेव्हा आपण कानकोंडे होतो. खगोल विज्ञानासारख्या गहन विषयात प्रकांड ज्ञान आणि दिगंत कीर्ती मिळवलेली व्यक्ती मराठी साहित्य संमेलनाला अध्यक्ष म्हणून मिळाली, ही खरे तर मराठीचेच वैभव वाढवणारी सुखद घटना आहे. साहित्य संमेलनात जेवणावळीपलिकडे काय घडते? असा तिरसट सूर अनेकजण लावतात. डॉ. नारळीकरांसारख्या विज्ञानवादी लेखकाच्या निवडीनंतर तरी अशाप्रकारची टीका होऊ नये असे वाटते. त्यांच्या निवडीने मराठी भाषेचे नाते आकाशाशी जडले नाते, असेच म्हणावे लागेल.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article about Jayant Narlikar