esakal | अग्रलेख  : ...बाय द पीपल!
sakal

बोलून बातमी शोधा

Joe-Biden

डेमोक्रॅटिक पक्षातर्फे ज्यो बायडेन यांची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा ट्रम्प यांना ते कितपत टक्कर देऊ शकतील की नाही, याविषयी साशंकता व्यक्त होत होती. सगळीकडे ट्रम्प यांचे ट्रम्पेट निनादत होते.

अग्रलेख  : ...बाय द पीपल!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

अमेरिकेच्या राजकीय इतिहासात दीर्घकाळ  द्विपक्षपद्धती रुळलेली असल्याने रिपब्लिकनांची  सत्ता जाऊन डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता येणे, ही घटना एरवी काही अभूतपूर्व मानली गेली नसती. पण, या वेळची निवडणूक आणि त्यातील ज्यो बायडेन यांचा विजय हा अनेक अर्थांनी असाधारण ठरला आहे. त्यामुळेच या विजयाचे महत्त्व समजून घ्यायला हवे. हा इतिहास घडवला तो लोकांनी. डेमोक्रॅटिक पक्षातर्फे ज्यो बायडेन यांची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा ट्रम्प यांना ते कितपत टक्कर देऊ शकतील की नाही, याविषयी साशंकता व्यक्त होत होती. सगळीकडे ट्रम्प यांचे ट्रम्पेट निनादत होते. अर्थव्यवस्थेवर त्यांनी लक्ष केंद्रित केले होते आणि याबाबतीत बरीच स्वप्नेही दाखवली होती. प्रसारमाध्यमे विरोधात भूमिका घेत होती, तरी ‘व्हिक्‍टिम कार्ड’ वापरून ट्रम्प तो विरोध निकालात काढत होते. विरोधातील प्रत्येक बातमीची ‘फेक न्यूज’ अशी संभावना करीत होते. कोविडचा तडाखा बसला आणि पाहतापाहता चित्र बदलू लागले. जेव्हा लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्‍न येतो, तेव्हा त्यांना मदतीचा हात देण्यासाठी सत्ताधारी आणि प्रशासन काय करते, हे महत्त्वाचे ठरते. हे संकट कोणामुळे आले, हा प्रश्‍न नंतर येतो. पण, ट्रम्प यांनी चीनच्या नावाने खडे फोडण्यावर जेवढा भर दिला, तेवढा आरोग्यव्यवस्था सुदृढ करून कोविडच्या मुकाबल्यासाठी सुसंगत, शिस्तबद्ध प्रयत्न केले नाहीत. त्यांच्या या निवडणुकीतील पीछेहाटीची इतरही कारणे असली तरी हे एक महत्त्वाचे होते, यात शंका नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुळात प्रस्थापित राजकीय ‘प्रवाहाबाहेरचा’ अशी स्वतःची प्रतिमा ट्रम्प यांनी तयार केली आणि त्यामुळेच सगळे संकेत, मूल्ये, लोकशाहीच्या प्रथा-परंपरा उचकटायला सुरुवात केली. रोजगारसंधींच्या अभावापासून ते सुरक्षेपर्यंतच्या प्रत्येक प्रश्‍नाला इतर कोणीतरी जबाबदार आहे, असा प्रचार केला. राग, लोभ, मत्सर अशा विकारांपासून कोणीच मुक्त नसते. पण, देशाच्या सत्तेचे सुकाणू सांभाळणाऱ्याला त्यांच्या अधीन होऊन चालत नाही. ट्रम्प यांनी मात्र ही विकारवशता हीच आपली ‘शैली’ बनवून टाकली. त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे अमेरिकी सार्वजनिक जीवनातील समावेशकतेलाच त्यांनी नख लावले. जगभरातून येथे येऊन स्थिरावलेल्या आणि या देशाच्या समृद्धीत भर घालणाऱ्या वेगवेगळ्या समाजांच्या अस्मिता येथील ‘मेल्टिंग पॉट’मध्ये विरघळून जातात, असे मानले जात असे. या प्रतिमेच्या त्यांनी चिंधड्या उडवल्या आणि त्याचवेळी लोकशाहीच्या माध्यमातून सत्ता मिळवल्यानंतर त्याच सत्तेचा वापर लोकशाहीला छेद देणाऱ्या गोष्टींसाठी करायला सुरुवात केली. बायडेन यांचा विजय त्यामुळेच केवळ नैमित्तिक सत्तांतर न राहता तो लोकशाहीचा विजय ठरतो. त्यांनी लोकशक्तीला साद घातली. तुलनात्मक विचार करता संयमाने प्रचार केला. त्याचे फळ त्यांना मिळाले.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

त्यांच्यापुढे मोठी आव्हाने वाढून ठेवली आहेत. ती अमेरिकेतील आहेत; त्याचप्रमाणे जगातीलही आहेत. तातडीचे आव्हान अर्थातच कोविडच्या नियंत्रणाचे. त्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन जात, विविध खात्यांमध्ये समन्वय साधत एक ठोस कार्यक्रम आखावा लागेल. दुसऱ्या महायुद्धानंतरची सात दशके ही महासत्ता जगाचे पुढारपण करीत आली आहे. त्यामुळेच या सत्तांतराचा जगाच्या दृष्टीने काय अर्थ होतो, हेही समजून घ्यायला हवे. बायडेन हे अनुभवी प्रशासक आहेत. कायद्याचे जाणकार आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणातील अनिश्‍चितता कमी व्हावी, अशी अपेक्षा आहे. जगभरातील डोईजड झालेल्या राजकीय जबाबदाऱ्यांचे ओझे लवकरात लवकर उतरविण्यासाठी ट्रम्प आग्रही होते. अफगाणिस्तान, इराक येथून माघारीला त्यांनी प्राधान्य दिले. संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांचा आर्थिक भार अमेरिकेनेचे का म्हणून उचलायचा, असा ‘रोख’ठोक प्रश्‍न विचारायला त्यांनी सुरुवात केली होती. ‘जयाअंगी मोठेपण तया यातना कठीण’ हे वास्तव असले, तरी या यातनांपासून दूर राहण्याचा खटाटोप अमेरिकेने अलीकडच्या काळात सुरू केला आणि ट्रम्प यांनी त्याला गती दिली. मात्र, ‘मोठेपण’ सोडायचे नाही, असाही प्रयत्न केला गेला.  ही विसंगती फार काळ टिकू शकत नाही, हे ओळखून बायडेन यांना पावले टाकावी लागतील. आपल्या सर्वंकष महत्त्वाकांक्षेने पेटलेला चीन अमेरिकेच्या हितसंबंधांआड येत आहे. अमेरिका ही केवळ अटलांटिक सत्ता नव्हे, तिला प्रशांत महासागर विभागातही स्थान आणि स्वारस्य आहे. भारत-अमेरिका संबंधांतील वाढत्या जवळिकीला हा संदर्भ आहे आणि बायडेन यांनादेखील तो नजरेआड करता येणार नाही, हे उघड आहे. त्यामुळे भारताबरोबरचे हे सहकार्य आणि जवळीक कायम राहील, अशीच चिन्हे आहेत. काश्‍मीर प्रश्‍नाकडे रिपब्लिकन पक्षापेक्षा डेमोक्रॅटिक पक्ष वेगळ्या नजरेने पाहतो. त्यामुळे मानवी हक्कांच्या चौकटीत ज्यो बायडेन आणि कमला हॅरिस ही सत्ताधीशांची नवी जोडी हा प्रश्‍न हाताळण्याचा प्रयत्न करेल. अशावेळी या प्रश्‍नाविषयीची आपली भूमिका नव्या सरकारला पटवून देण्याचे आव्हान भारतीय मुत्सद्यांपुढे असेल. बायडेन यांना ट्रम्प यांची सगळीच धोरणे बदलता येतील, असे नाही. याचे कारण त्या त्या निर्णयांमागे काळाची हाक किंवा परिस्थितीचा रेटाही आहे. पूर्वसुरींनी जे जे केले, ते बदलण्याचा सपाटा लावण्याइतके बायडेन अप्रगल्भ नाहीत. शिवाय, प्रतिस्पर्धी ट्रम्प यांना मिळालेल्या मतांचे प्रमाण दुर्लक्ष करावे, असे नाही. या दोन्हीचे भान ते ठेवतील. त्यांच्या बाबतीत तशी अपेक्षा बाळगता येते, म्हणूनच तर ते ट्रम्प यांच्यापेक्षा वेगळे आहेत!

loading image