अग्रलेख :  नवा अध्याय

Joe Biden of the Democratic Party
Joe Biden of the Democratic Party

यश नुसते मिळून चालत नाही, ते दिसावेही लागते, या लोकोक्तीची प्रचिती अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीने दिली. या लढतीत डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना मागे टाकल्याचे सात नोव्हेंबरलाच स्पष्ट झाले होते. पण, निवडणूक प्रक्रियेत अनेक गैरप्रकार झाल्याचा आरोप करीत डोनाल्ड ट्रम्प यांनी पराभव मान्य करण्यास नकार दिला होता. पण, ज्या नेवाडा, ॲरिझोना, जॉर्जिया, पेनसिल्व्हानिया, विस्कॉन्सिन आणि मिशिगन या राज्यांच्या निकालांबाबत ट्रम्प यांनी आक्षेप घेतले होते, तेथे बायडेन यांनीच आघाडी घेतल्याचे या राज्यांनी घोषित केल्यानंतर सर्व शंका-कुशंकांचे जाळे दूर झाले. सत्ता मिळविण्यासाठी २७० इलेक्‍टोरल मते किमान मिळवावी लागतात. बायडेन यांनी तो टप्पा ओलांडून ३०६पर्यंत मजल गाठली. त्यांच्या विजयाला न्यायालयामार्फत अटकाव करण्याचे प्रयत्नही असफल ठरले. त्यामुळे बायडेन यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता वीस जानेवारीला ते शपथग्रहण करून अमेरिकेच्या कारभाराचे सुकाणू अधिकृतरीत्या आपल्या हाती घेतील. 

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

त्यांच्याच पक्षाचे नेते बराक ओबामा यांच्या प्रचाराचे भरतवाक्‍य ‘येस वुई कॅन’ असे होते. बायडेन यांची २०२०ची निवडणूक कदाचित ‘येस, वुई वन’ या उद्‌गारांनी ओळखली जाईल, याचे कारण त्यांच्या विजयाच्या अधिमान्यतेवरच (लेजिटिमसी) सातत्याने प्रश्‍नचिन्ह लावण्याचा प्रयत्न झाला. अमेरिकी मतदारांचा कल स्पष्ट झाल्यानंतरदेखील ‘मीच खरा विजयी’ असा धोशा ट्रम्प यांनी लावला होता. अलीकडेच ट्रम्प समर्थक आणि बायडेन समर्थकांमध्ये प्रत्यक्ष हाणामारीही झाली. एखाद्या विकसनशील देशांतील निवडणुकांत घडावेत, तसे बहुतेक सगळे प्रकार अमेरिकेत घडले. त्यामुळेच विजयानंतरच्या बायडेन यांच्या भाषणात याचे पडसाद उमटणे स्वाभाविक होते. आता लोकशाही संस्थांचे महत्त्व टिकविण्याचे आव्हान समोर आहे, याची जाणीव बायडेन यांना असल्याचे या भाषणातून स्पष्ट झाले. ज्या रिपब्लिकन नेत्यांनी हा विजय मोकळेपणाने कबूल केला, त्यांचेही आभार मानत बायडेन यांनी देशाच्या प्रगतीसाठी एकत्रित प्रयत्नांच्या आवश्‍यकतेवर भर दिला. ध्रुवीकरण, शत्रुकेंद्री राजकारण, लोकशाही संस्थांविषयी तुच्छता, ‘मी आणि माझा मतदारसंघ’ ही ऱ्हस्व दृष्टी या सगळ्यांचे मळभ हटून अमेरिकेत नवे राजकीय वातावरण निर्माण व्हावे, अशी आता अमेरिकेतील नागरिकांची अपेक्षा आहेच; पण जगही मोठ्या आशेने या सत्तांतराकडे पाहत आहे. या निवडणुकीने दिलेले धडे बरेच काही सांगू पाहतात आणि त्याचा अर्थ नीट समजून घेण्याची गरज आहे. तसे केले, तरच बायडेन यांच्यापुढील आव्हान किती व्यापक आहे, हे स्पष्ट होईल. नव्या सहस्रकात जागतिक परिस्थितीत सर्वच क्षेत्रांत मूलगामी बदल घडताहेत. जागतिक सत्ता संतुलन, अर्थकारण यात ते ठळकपणे दिसू लागले आहेत. मोठेपणाचे ओझे पेलतही नाही आणि सोडवतही नाही, अशी अमेरिकेची अवस्था झाली आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बेफाम आणि विक्षिप्त विधाने करण्याबद्दल कुख्यात झाले आहेत; पण त्यांची ही आदळआपट हा जसा त्यांच्या स्वभावाचा, शैलीचा भाग आहे, तेवढाच परिस्थितीचा रेटाही काही प्रमाणात त्याला कारणीभूत आहे, हे नजरेआड करता येणार नाही. अमेरिकी निवडणूक पद्धतीतील त्रुटी या वेळी प्रकर्षाने समोर आल्या. स्वायत्त निवडणूक आयोगाचा अभाव ही उणीव किती त्रासदायक आहे, हे स्पष्ट झाले. विज्ञान संशोधनापासून खेळांपर्यंत आणि साहित्य क्षेत्रापासून ते विविध कलांपर्यंत सर्वच क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची विपुल संख्या असलेली ही महासत्ता निवडणूक पद्धतीतील सुधारणांच्या बाबतीत एवढी हतबल का, असा प्रश्‍न उपस्थित होतो.  कोविड विषाणूच्या संकटानेही अमेरिकेला घेरले आहे. या देशात कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येने दीड कोटीचा टप्पा केव्हाच ओलांडला आहे आणि तीन लाखांहून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. अधिक दक्षतेने ही परिस्थिती हाताळायला हवी होती, असे सांगून बिल गेट्‌स यांनी पुढचे सहा महिने अत्यंत आव्हानात्मक असतील, असा इशारा दिला आहे, त्याचे गांभीर्य लक्षात घ्यायला हवे. बायडेन यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाची त्या बाबतीत कसोटी आहेच. परंतु, या पुढच्या काळात अमेरिका बोले, जग डोले, ही स्थिती झपाट्याने बदलत असताना नवी अधिक न्याय्य आणि विकेंद्रित रचना जगात यावी, असे वाटत असेल तर संकुचिततेच्या कुंपणाबाहेर येण्याची गरज आहे. त्याचे उदाहरण सात दशकांहून अधिक काळ जगाचे पुढारपण करीत आलेल्या अमेरिकेलाच घालून द्यावे लागेल. या व्यापक दृष्टिकोनातून नव्या जबाबदारीकडे पाहिल्यास आणि त्या दिशेने प्रयत्न केल्यास अमेरिकेतील सत्तांतराला खऱ्या अर्थाने ऐतिहासिक परिमाण लाभेल.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com