esakal | अग्रलेख : समाजोत्सवाची नांदी! 
sakal

बोलून बातमी शोधा

ganeshustav

यंदा वारकऱ्यांनी घरातच बसून विठूरायाची भेट घेण्यात समाधान मानले असेल, तर मग घरोघरचा श्रीगणेश हा लालबागचाच नव्हे, तर थेट विश्‍वाचा राजा आहे, अशा भावनेने त्याची पूजाअर्चा करायला काय हरकत आहे? 

अग्रलेख : समाजोत्सवाची नांदी! 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

शतकाहून अधिक मोठी परंपरा असलेल्या महाराष्ट्रातील गणेशोत्सवाची राजधानी असलेल्या पुण्यातील मानाच्या पाच गणेश मंडळांनी यंदा "कोरोना'च्या फैलावानंतर हा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेऊन नवा पायंडा पाडला आहे. कोल्हापुरातील अनेक मंडळांनीही यंदा वर्गणीदेखील गोळा न करता, डामडौल न मिरवता दहा दिवस मूर्तीची पूजाअर्चा करण्याचे ठरवले आहे, तर मुंबईतील "लालबागचा राजा' या 86 वर्षांची परंपरा असलेल्या मंडळाने यंदा "श्रीं'च्या मूर्तीची प्रतिष्ठापनाच न करता आरोग्यासंबंधीचे उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या पुढाकाराचे आणि सामाजिक बांधीलकीचे स्वागत करायला हवे. "लालबागचा राजा' असे नामाभिधान असलेला "राजा' गेल्या दोन-अडीच दशकात केवळ लालबागचा राजा राहिला नव्हता; तर संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांच्या मनावर त्याने आपले अधिराज्य स्थापन केले होते. त्याच्या दर्शनासाठी हजारो लोक 10 ते 15 लाख भक्त रात्र-रात्र रांगेत उभे राहत असतात. त्यामागे हा राजा नवसाला पावतो, अशी भाविकांची मनातील श्रद्धा कारणीभूत होती. एकाच वेळी रस्त्यावरील फाटका कष्टकरी, तर दुसरीकडे लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर असे "सेलेब्रिटी'ही या गणरायाच्या दर्शनासाठी उत्सुक असतात. त्यामुळेच हा राजा स्वत:च एक "सेलेब्रिटी' बनून गेला आहे. अक्षरश: कोट्यवधींची उलाढाल असलेल्या या मंडळाने "कोराना'मुळे यंदा हा उत्सव "आरोग्योत्सव' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला असून, त्यानिमित्ताने प्लाझ्मा, तसेच रक्‍तदान शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. तसेच सीमेवरील हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना मदत केली जाणार आहे. सव्वाशे वर्षांपूर्वी हा उत्सव सुरू झाला तेव्हाच त्यातून समाजकारण साधण्याचा उद्देश स्पष्ट झाला होता. लालबागच्या या राजाने याच समाजकारणाच्या वाटेवर आणखी एक पाऊल टाकले आहे. शतकानुशतकांची परंपरा असलेली आषाढी वारी "कोरोना'मुळे असलेला धोका लक्षात घेऊन यंदा न काढण्याचा संयम दाखवून वारकऱ्यांनी महाराष्ट्र समंजस असल्याचा प्रत्यय दिला होताच. लालबागच्या राजानेही त्याचीच साक्ष दिली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

अर्थात, सामाजिक विवेक हा एक भाग झाला; पण त्याचवेळी महाराष्ट्रातील कोट्यवधी गणेशभक्‍तांच्या मनातील भावना वेगळ्या असू शकतात. श्रीगणेश ही कोणत्याही नव्या कामाच्या प्रारंभाची वंदनीय देवता मानली जाते. त्यामुळे "लालबागचा राजा' यंदा दिसणारच नाही, ही बातमी अनेक भक्‍तांच्या मनाला वेदना देणारीही ठरू शकते. त्यामुळेच "या मंडळाचा हा निर्णय स्तुत्य असला, तरी उत्सवाची परंपरा खंडित होऊ नये म्हणून सर्व नियम पाळून किमान चार फुटांच्या मूर्तीची तरी प्रतिष्ठापना करावी,' अशी भूमिका बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने मांडली आहे. भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीही या समितीच्या सुरात सूर मिळवला आहे. मात्र, त्यावरून आता नवा वाद उभा राहू नये, अशी प्रार्थना या "बुद्धिदात्या' 
देवतेकडे करावीशी वाटते. त्याचे कारण अर्थातच गेल्या काही दशकांत गणेशोत्सव असो की नवरात्र, दहिहंडी असो की होलिकोत्सव; त्यातून साधल्या जाणाऱ्या राजकारणात आहे. शिवसेनेची स्थापना झाल्यापासूनच गणेशोत्सवाच्या माध्यमातून कार्यकर्ते उभे केले जातात आणि हा "राजा' तर थेट लालबाग या शिवसेनेच्या बालेकिल्यातच ठाण मांडत आला आहे. एकीकडे या उत्सवांच्या माध्यमातून राजकारण साधावयाचे आणि त्याचवेळी पुरस्कर्त्याच्या जमवाजमवीतून आर्थिक गणिते मांडायची, हा खेळ मराठी माणूस सातत्याने बघत आला आहे. त्यातूनच भाविकांच्या रूपाने आपली मतपेढीही उभी केली जात आहे. मात्र, यंदा "पुनश्‍च हरी ॐ!' म्हटल्यावरही राज्याच्या अनेक भागांत "कोरोना'च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा निर्बंध जारी करणे भाग पडले आहे. त्यामुळेच "लालबागच्या राजा'च्या आयोजकांनी संकटाचं गांभीर्य लक्षात घेऊन केल्य्‌ो या निर्णयाचे कौतुक आहे. 

महाराष्ट्राने आषाढी वारी, तसेच गणेशोत्सव याबाबत स्तुत्य निर्णय घेऊन, खरे तर अवघ्या देशापुढेच एक आदर्श उभा केला आहे. तीन महिने उलटल्यानंतरही कोरोना विषाणू पुरता कह्यात न आल्यामुळे पंतप्रधान, तसेच मुख्यमंत्री वारंवार शारीरिक दूरस्थतेचे आवाहन करत आहेत. तेव्हा दहिहंडीच्या निमित्ताने मनोऱ्यांचे थर लावण्यापासून ते नवरात्रात रंगणाऱ्या रासगरब्यापर्यंत सर्वत्र यापुढे कोरोनाचे संकट समोर ठेवूनच आवश्‍यक तिथे मुरड घातली पाहिजे. सरकारी आदेशापेक्षा समाज पुढाकार घेऊन हे करेल, तर त्याचा परिणाम अधिक चांगला असेल. आपले सारे सण हे एकत्र येऊन, मिळून मिसळून एकमेकांना आनंद देण्यासाठी आहेत. पंढरपूरच्या वारीत तर उराउरी भेटून "माउली... माऊली' म्हणत एकमेकांना आलिंगन देण्याचा आनंद तर अनुपमेय असतो. पण यंदा वारकऱ्यांनी घरातच बसून विठूरायाची भेट घेण्यात समाधान मानले असेल, तर मग घरोघरचा श्रीगणेश हा लालबागचाच नव्हे, तर थेट विश्‍वाचा राजा आहे, अशा भावनेने त्याची पूजाअर्चा करायला काय हरकत आहे? त्यामुळेच पुणे असो की मुंबई की कोल्हापूर; तेथील ही गणेशोत्सव मंडळाचा यंदाचा हा उत्सव एका अर्थाने "समाजोत्सव'च ठरू पाहत आहे. 

loading image