अग्रलेख : कोरोनाला धोबीपछाड!

अग्रलेख : कोरोनाला धोबीपछाड!

‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेला हिरवा कंदील दाखवून राज्य सरकारने एक स्पष्ट संकेत दिला, हे बरेच झाले. मैदाने पुन्हा गजबजतील, ही स्वागतार्ह बाब आहे. परंतु, समाजाचा कोरोनाशी लढाही चालू आहे, याचे भान ठेवूनच स्पर्धा पार पडल्या पाहिजेत.

भिंत खचली, चूल विझली, होत्याचे नव्हते झाले असेल. सारे जगणे मोडून पडले असेल; तरी कणा मात्र अजून ताठ आहे. त्या पाठकण्यात अजूनही लढायची दुर्दम्य ऊर्मी आहे... हाच काव्यात्म संदेश घेऊनच जणू ‘यंदा फेब्रुवारीत ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा होणार’ ही बातमी आली. त्याच्या काही दिवस आधीच राज्यात क्रीडा विद्यापीठ होणार असल्याची दवंडीही सुखद झुळूक सोडून गेली. हे खरे की, कोरोना विषाणूचे संकट अजून पुरते टळलेले नाही. जनजीवन अजून पुरते रांगेला लागले नाही. दबक्‍या पावलांनीच सारे व्यवहार सुरू होत आहेत. खुर्च्या झटकून नाट्यगृहे, चित्रपटगृहे रसिकांची वाट पाहू लागली आहेत. खेळांची मैदाने थोडी थोडी गजबजू लागली आहेत. अर्थात, कोरोनाच्या ऐन भरात, परदेशातल्या रिकाम्या स्टेडियममध्ये क्रिकेटचे फड रंगवून त्याचा टीव्हीवर आस्वाद घेणारी आपण भारतीय माणसे! पैशाच्या जोरावर क्रिकेटवाल्यांना तेवढे घडवता आले. अन्य खेळांच्या वाट्याला ही सुबत्ता कुठली? ते बंदच राहिले. त्यामुळे ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेला हिरवा कंदील दाखवून राज्य सरकारने एक स्पष्ट संकेत दिला, हे बरेच झाले. अर्थात, अजूनही संकट रेंगाळलेले असताना कुस्तीसारखा थेट अंगझटीला येणारा खेळ खेळावाच का, असा रास्त प्रश्न कुठल्याही सावध मनाला पडेल. पण, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद आणि राज्य सरकारने त्याचे उत्तर ‘होय’ असे दिले, त्याला कारण कुस्ती या नावाची जादू आहे. जिवाचे भय फेकून देत आव्हानाला भिडणे, हेच मुळी कुस्तीमध्ये अभिप्रेत असते. हे येरागबाळाचे कामचि नोहे! महाराष्ट्र हे तर कुस्तीचे पाळणाघर. भारताला पहिले ऑलिंपिक पदक मिळवून देणाऱ्या खाशाबा जाधवांपासून थेट आत्ताच्या राहुल आवारेपर्यंत एक खूप मोठी पाणीदार मोत्यांची माळ सह्याद्रीच्या छाताडावर पिढ्यान् पिढ्या रुळते आहे. लाल मातीत मिसळलेला तो पैलवानांचा घाम, तालमीत घुमणारे हुंकार, पैलवानांच्या मर्दुमकीचे किस्से याने महाराष्ट्राचा क्रीडा इतिहास रंगलेला आढळतो.

‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेला एक निराळे वलय आहे. मॅटवरल्या आधुनिक कुस्तीसोबतच इथे लाल मातीचाही मान ठेवला जातो. विविध वजनी गटातले कुस्तीगीर इथे आपली प्रसिद्धी, प्रतिष्ठा नि प्रशिक्षण पणाला लावतात, ते काही उगीच नाही. सर्वोच्च वजनी गटातले शंभर-सव्वाशे किलो वजनाचे दणकट कुस्तीगीर इथे इरेला पडून एकमेकांना भिडतात, तेव्हा महाराष्ट्रातील अक्षरश: लाखो कुस्तीप्रेमी श्वास रोखून बसतात. ‘जणू जिंकाया गगनाचे स्वामित्व, आषाढघनांशी झुंजे वादळवात’ अशी ती लाखमोलाची लढत असते. लाल मातीतल्या कुस्तीला खरा आश्रय मिळत आला तो फडाच्या कुस्तीमुळे. विशेषत: पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये या कुस्तीला आणि कुस्तीगिरांना योद्‌ध्याचा मान आहे. उदाहरणार्थ, गणेश चतुर्थीनंतर येणाऱ्या रविवारी हजारो कुस्तीप्रेमींच्या आरोळ्यांनी दुमदुमणारे कुंडलचे कुस्ती मैदान. याला शंभर वर्षांचा इतिहास आहे. क्रांतिसिंह नाना पाटील, नागनाथअण्णा नायकवडींसारखे क्रांतिकारक इथे लढले आहेत. किंवा आंतरराष्ट्रीय मल्ल आणून त्यांच्या कुस्त्या भारतीय पैलवानांशी लावणारे, रोख इनामांसाठी गाजणारे कोल्हापूरचे वारणा कुस्ती मैदान, पलूस या साखरपट्ट्यातल्या मातब्बर गावांत शेवटच्या श्रावणी सोमवारी लागणाऱ्या कुस्त्या, दरवर्षी स्वातंत्र्यदिनी सांगली जिल्ह्यातील बांबवड्याला रंगणारा जबरदस्त फड, यशवंतराव चव्हाण यांचे जन्मगाव देवराष्ट्रे इथल्या जोरकस कुस्त्या, अशी कितीतरी नावे घेता येतील.

याखेरीज पुसेगाव, फुरसुंगी, खराडी, लोहगाव, लोणी काळभोर, अशाही ठिकाणी कुस्त्यांचे फड रंगतात. लाल माती उधळली जाते. दंड थोपटले जातात. हवेत एक कैफ चढतो. तो अस्सल मऱ्हाटी वळणाचा असतो. पश्‍चिम महाराष्ट्राखेरीज इतरही अनेक ठिकाणी जत्रा किंवा उत्सवांच्या निमित्ताने कुस्तीचे फड लागतात. रोख बक्षिसांची लयलूट होते. कुस्तीतील नायक, महानायक यांची आपोआप एक क्रमवारी घडत जाते. मानधनांचे आकडे फुगत जातात. तालमीतली मेहनत खऱ्या अर्थाने सार्थकी लागते. शेकडो वर्षाच्या अशा परंपरेतूनच महाराष्ट्राची कुस्ती समृद्ध होत गेली आहे. ही रोख बक्षिसे शंभर रुपयांपासून पंधरा-वीस लाखांच्या घरात जातात. या बक्षिसांच्या जोरावरच कुस्तीगिरांची मेहनत, खुराक चालतो. पण, गेल्या वर्षी हे सगळेच दाणकन थांबले. यंदा ‘महाराष्ट्र केसरी’चा फड पुण्यात बालेवाडीच्या बंदिस्त क्रीडा संकुलात होणार आहे. अर्थात, या वेळी कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. कुस्ती मारल्यावर आपल्या लाडक्‍या विजेत्याच्या अंगी लागलेल्या मातीचा स्पर्श आपल्यालाही व्हावा, या ईर्ष्येने चाहते पाठ थोपटायला धावतात, गर्दी करतात. यंदा ते आवर्जून टाळावे लागेल. एरवी पाच दिवसांत सर्व वजनी गटाच्या माती व मॅटवरल्या कुस्त्या घेतल्या जातात. यंदा कोरोनाची बंधने आल्याने यासाठी दहा दिवस लागणार आहेत. कोरोनाला धोबीपछाड घालून पाडायचा असेल आणि निखळ कुस्तीचा आनंद लुटायचा असेल, तर ही काळजी घ्यावीच लागणार. एकंदर, गाडे रुळावर येण्याचा सकारात्मक संकेत म्हणूनच यंदाच्या ‘महाराष्ट्र केसरी’कडे बघावे लागेल. यंदाचा किताब जिंकणारा पैलवान फक्त अजिंक्‍यपद जिंकणार नाही, जीवघेण्या संकटाला चारीमुंड्या चीत करणाऱ्या अजेय महाराष्ट्रधर्माचे ते एक प्रतीक ठरावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com