अग्रलेख : बंगालमधील औचित्यभंग

अग्रलेख : बंगालमधील औचित्यभंग

प. बंगालमध्ये तोंडावर आलेल्या निवडणुका पाहता, कोलकत्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांसमक्ष मुख्यमंत्री ममतादीदींच्या भाषणावेळी घडलेला प्रकार औचित्यभंगाचा आणि सभ्यतेला सोडून होता. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भाषणास उभ्या राहताच, मोजक्‍याच उपस्थितांमधून ‘जय श्रीराम’ अशा घोषणांचा गजर होणे, हा केवळ औचित्यभंग बिलकूलच नव्हता. सध्याच्या कोरोनाच्या सावटाखालील अशा कार्यक्रमांत प्रवेश हा अगदी घासून-पुसून मोजक्‍याच व्यक्तींना दिला जाण्याचा रिवाज पडला आहे. त्यामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सव्वाशेव्या जयंतीनिमित्ताने कोलकत्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात हे जे काही घडले, ते जाणीवपूर्वक घडवून आणले गेले असावे, असा निष्कर्ष काढला जातो आहे. खरे तर मोदी यांच्यासमवेत ममतादीदी एकाच व्यासपीठावर येण्याचा हा अलीकडल्या काळातील दुर्मिळ प्रसंग होता आणि तोही येत्या दोन-अडीच महिन्यांत होऊ घातलेल्या प. बंगालच्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आयोजित केला गेला होता. त्यामुळे साहजिकच ममतादीदींच्या भाषणाबाबत कमालीचे औत्सुक्‍य होते. मात्र, त्यांचे भाषण सुरू होताच रामनामाचा जो काही गजर सुरू झाला तो त्यांना निव्वळ चिथावणी देण्यासाठीच सुरू झाला होता, अशी शंका येते. श्रीमती बॅनर्जी यांचा संताप त्यामुळे उफाळून आला आणि त्यांनी भाषण केलेच नाही. मात्र, त्याच व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्यपाल जगदीप धनखार यांनी त्यावेळी कोणतीही भूमिका घेतली नाही आणि कार्यक्रमानंतर मात्र, केंद्राच्या प्रत्येक योजनेला विरोध करण्याची ममतादीदींची भूमिका ही देशाच्या संघराज्यात्मक रचनेवर घाला घालणारी आहे, असा उपदेशाचा एक डोस ट्‌वीटच्या माध्यमातून पाजला! हे सारेच्या सारे प. बंगालचे राजकारण भारतीय जनता पक्ष कोणत्या दिशेने घेऊन जात आहे, त्याचीच परत एकदा साक्ष देणारे आहे. प. बंगालची सत्ता येन-केन प्रकारेण ममतादीदींच्या हातातून हिसकावून घेण्यासाठी भाजपने कोणत्या टोकाला जाण्याचे ठरविले आहे, ते तर त्यामुळे दिसून आलेच; शिवाय नेताजींसारख्या थोर राष्ट्रपुरुषाचा कार्यक्रमही त्यास अपवाद ठरू शकत नाही, हेही उघड झाले. खरे तर हा कार्यक्रम केंद्र सरकारने आयोजित केलेला होता आणि त्यास राज्याच्या मुख्यमंत्री या नात्याने ममतादीदींना आमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळेच मग ‘कार्यक्रमास बोलावून नंतर अवमानित करण्याच्या’ या प्रकाराचा तीव्र निषेध करून त्यांनी आपले भाषण न करणे, हेही स्वाभाविक म्हणावे लागते.

अर्थात, भाजपला आलेला हा नेताजींच्या प्रेमाचा अतीव उमाळा हा विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्यामुळेच आला होता, हे तर दिसू लागले आहेच. शिवाय, खुद्द ममतादीदींनी हा आरोप या कार्यक्रमाच्या आधी त्यांनी स्वत:च आयोजित केलेल्या एका फेरीत केलेला होता. त्यामुळेच भाजप कार्यकर्त्यांनी त्याचा बदला या कार्यक्रमात आणि तोही थेट मोदी यांच्या उपस्थितीतच प्रभू रामचंद्रांच्या नावाने घोषणा देत घेतला, हेही स्पष्ट आहे. अर्थात, ‘जय श्रीराम’ या घोषणेमुळे ममतादीदी कशा चवताळून उठतात, हे यापूर्वी किमान दोन वेळा दिसून आलेले आहे. २४ परगाणा जिल्ह्यात श्रीमती बॅनर्जी यांच्या मोटारींचा ताफा जात असताना जमलेल्या गर्दीतून ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देणाऱ्या आठ जणांना पोलिसांनी ताब्यातही घेतले होते. मात्र, त्याचवेळी ममतादीदींनी ‘‘आपल्याला प्रभू रामचंद्रांविषयी आदरच आहे आणि आक्षेप आहे तो भाजप ज्या पद्धतीने रामाचा वापर करत आहे, त्याबद्दल आहे,’’ असेही स्पष्ट केले होते. मात्र, या तार्किक भूमिकेचा अन्वयार्थ लावण्याएवढी तसदी किंवा परिपक्वता भाजप कार्यकर्त्यांनी दाखवलेली नाही. भाजप नेत्यांनाही त्यात न पडता या घोषणेस असलेल्या ममतादीदींच्या विरोधाचा वापर केवळ बंगालचे राज्य हस्तगत करण्यासाठीच करावयाचा आहे, हेही नेताजींसारख्या थोर नेत्याच्या कार्यक्रमाचा जो काही रसभंग झाला, त्यावरून दिसून आले आहे. खरे तर दस्तुरखुद्द पंतप्रधानांनीच या घोषणा देणाऱ्यांना त्याच व्यासपीठावरून रोखले असते, तर ते अधिक उचित ठरले असते आणि या सोहळ्याची शान, प्रतिष्ठा तसेच आबही राखला गेला असता. मात्र, पंतप्रधानांनी त्यावेळी सोयीस्कर मौन धारण केले. या घोषणा देणाऱ्यांची शिकवणी मात्र अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडली गेली असावी, अशी शंका घेतली जात आहे. कारण पंतप्रधान भाषणास उभे राहताच घोषणा देण्यात आल्या. मात्र, त्या ‘भारतमाता की जय’ एवढ्यापुरत्याच मर्यादित होत्या.

त्यामुळे मग तृणमूल काँग्रेसचे बडे नेते डेरेक ओब्रायन यांनी केलेले ट्विट हे भाजपच्या या साऱ्या राजकारणावर भेदक प्रकाश टाकते. ‘डिग्निटी’ म्हणजेच आब राखणे ही बाब भाजप कार्यकर्त्यांच्या समजावणीपलीकडली आहे, असे जळजळीत भाष्य करतानाच ओब्रायन यांनी या कार्यकर्त्यांचा उल्लेख ‘लुम्पेन’ म्हणजेच ‘मवाली’ किंवा ‘कोणतीही प्रतिष्ठा नसलेले’ असा केला! अर्थात, या राजकीय रणधुमाळीत प. बंगालच्या विकासाचे प्रश्न तसेच ममतादीदींचा कारभार आणि प्रश्‍न असे सारे मग पडद्याआड गेले तर त्यात नवल नव्हते. भाजपला तेच हवे आहे; कारण लोकसभेच्या थोड्याथोडक्‍या नव्हे तर ४२ जागा असलेला बंगाल केवळ ध्रुवीकरणाच्या जोरावर जिंकण्यासाठी त्यांनी चंग बांधला आहे, यावरच शिक्कामोर्तब झाले. मोदी यांची प्रतिमा आणि प्रतिष्ठाही राखण्यासाठी भाजप कोणत्या थराला जात आहे, त्याचेच हे प्रदर्शन आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com