esakal | अग्रलेख :  ‘निसर्गा’चा धडा
sakal

बोलून बातमी शोधा

अग्रलेख :  ‘निसर्गा’चा धडा

कोकणातील नयनरम्य नैसर्गिक जैवविविधतेचे मोठे नुकसान या वादळाने केले आहे.अनेकांची घरे कोसळली,कित्येकांच्या घरांवरील छपरे दूर उडून गेली.मुंबईतही असंख्य वृक्ष-वेली उन्मळून पडल्या.

अग्रलेख :  ‘निसर्गा’चा धडा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

भारताची आर्थिक राजधानी म्हणून जगभरात ख्यातकीर्त असलेल्या मुंबापुरीवर ‘कोरोना’पाठोपाठ आणखी एक संकट ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या रूपाने घोंघावत येणार, हे कळल्यानंतर सगळ्यांनीच श्वास रोखून धरले होते. या वादळाच्या तडाख्याने मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली असली, तरी जीवितहानी टाळण्यात आली आणि ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. जमिनीवर येताच वादळाचा वेग कमी झाला आणि त्याने दिशा बदलली, ही बाब जेवढी या बाबतीत महत्त्वाची ठरली, तेवढीच पूर्वानुमानामुळे प्रतिबंधात्मक उपाय योजण्यास मिळालेला अवधीदेखील निर्णायक ठरला. एखादे चक्रीवादळ कधी येणार, त्याचा वेग आणि दिशा या बाबतीत आधीच अंदाज व्यक्त करता येणे, हे प्रामुख्याने गेल्या दोन दशकांत विज्ञानाने केलेल्या प्रगतीचे फलित. त्यानुसार आपल्या शास्त्रज्ञांनी बरेचसे अचूक अनुमान केले. ओडिशा, पश्‍चिम बंगाल, तमिळनाडू येथे यापूर्वी धडकलेल्या वादळांच्यावेळीही हा अनुभव आला होता. पश्‍चिम किनारपट्टीवर अशी वादळे येण्याचे प्रमाण तुलनेने कमी असल्याने त्यांना तोंड देण्याचा अनुभवही त्या प्रमाणात कमी असणे स्वाभाविकच. तरीही आपल्याकडच्या यंत्रणांनी हाताशी आलेल्या माहितीचा उपयोग करून बरीच सावधगिरी बाळगली. केंद्र व राज्य सरकारने समन्वयाने आपत्ती व्यवस्थापनाच्या आघाडीवर काम केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चा करून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा (एनडीआरएफ) वेळीच कामास लावली. ‘एनडीआरएफ’च्या महाराष्ट्र विभागाचा या कामगिरीत मोठा वाटा होता. अल्पावधीत जवळजवळ चाळीस हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. बरीच सरकारी यंत्रणा ‘कोरोना’शी दोन हात करण्यात गुंतलेली असताना या नव्या संकटाचा मुकाबला करणे हे मोठेच आव्हान होते आणि सर्व संबंधित यंत्रणांनी ते चांगल्या प्रकारे पेलले ही बाब उल्लेखनीयच. या सकारात्मक घटनांची नोंद घेतली जाणे आवश्‍यक आहे. 

 या ‘निसर्ग’निर्मित संकटाने मुंबईला मोठा तडाखा दिला नसला, तरी जाता जाता कोकण किनारपट्टीला हे वादळ मोठा फटका देऊन गेले. कोकणातील नयनरम्य नैसर्गिक जैवविविधतेचे मोठे नुकसान या वादळाने केले आहे. अनेकांची घरे कोसळली, कित्येकांच्या घरांवरील छपरे दूर उडून गेली. मुंबईतही असंख्य वृक्ष-वेली उन्मळून पडल्या. त्याचबरोबर या वादळाने सोबत आणलेल्या तुफानी वृष्टीमुळे पुण्याच्या परिसराबरोबरच, पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतीलाही जबर तडाखा दिला आहे. कोकणपट्टीत झालेले नुकसानच काही कोटींच्या घरात आहे आणि या परिसराबरोबरच अन्यत्र खंडित झालेला वीजपुरवठा पुन्हा सुरू होण्यास काही दिवस लागणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुंबई महानगर हे मुळातील सात बेटांना एकत्र जोडून उभे करण्यात आलेले महानगर. विविध कारणांनी पश्‍चिम किनारपट्टीवरील एक महत्त्वाचे बंदर म्हणून टोपीकर इंग्रजांनी आपल्या राजवटीत या शहराला अमाप महत्त्व प्राप्त करून दिले. त्यामुळे आधीच्या या सात बेटांवरील जमिनी विकासाला अपुऱ्या पडू लागल्या. मग समुद्राच्या पाण्यात भराव टाकून ‘बॅक-बे रेक्‍लमेशन’, ‘वांद्रे रेक्‍लमेशन’, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्‍स असे नवनवे मानवनिर्मित भूभाग तयार करण्यात आले. त्याला सर्वपक्षीय सत्ताधारी, नोकरशहा आणि बिल्डर-कंत्राटदार यांची अभद्र युती कारणीभूत होती. हे समुद्रावरील म्हणजेच निसर्गावरील थेट आक्रमणच होते आणि समुद्रही त्यास वसई-विरार-पालघर या पट्ट्यात अधिकाधिक जमीन पादाक्रांत करून उत्तर देत होता. दक्षिण मुंबईतील अत्यंत चिंचोळ्या पट्टीत समुद्राने एकाच वेळी दोन्ही बाजूंनी आक्रमण केले, तर या महानगराचे रिझर्व्ह बॅंक, स्टॉक एक्‍स्चेंज आदी आर्थिक महासंस्था असलेले नाकच पाण्याखाली जाईल, याचे भान आतातरी धोरणकर्ते, नगरनियोजनकार आणि ती धोरणे राबविणाऱ्यांनी ठेवायला हवे. ‘निसर्ग’ वादळावर आज थोड्या-फार प्रमाणात मात करण्यात आपल्याला यश आले असले, तरी निसर्गाच्या प्रकोपाची पुनरावृत्ती पुन्हा होण्याची शक्‍यता आहेच. किंबहुना अलीकडील काळात वारंवार कोसळणाऱ्या विविध नैसर्गिक व अन्य संकटांमुळे आपत्ती व्यवस्थापनाबाबत सतत सज्ज राहण्याशिवाय पर्याय नाही. या विषयाच्या अद्ययावत प्रशिक्षणाचा आग्रह प्रत्येक पातळीवर धरला जायला हवा. ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या तडाख्याने जे नुकसान झाले आहे, त्याचे आव्हानही मोठे आहे. त्यातील सर्वात मोठी बाब ही वीजपुरवठा पूर्ववत करण्याची आहे. कोकण किनारपट्टीवर विजेचे खांब जागोजागी उखड़ून पडल्यामुळे आता सारी सुरुवात ही ‘पुनश्‍च हरी ॐ!’ याच पद्धतीने करावी लागणार आहे. शिवाय, जमिनीची धूप रोखण्यासाठी ठिकठिकाणी ‘झाडे लावा, जमीन जगवा’ ही मोहीमही हाती घ्यावी लागणार आहे. एकीकडे विकास कामांच्या नावाखाली झाडे तोडली जात आहेत आणि त्यांच्या पुनर्रोपणाच्या निव्वळ बाता मारल्या जात आहेत. यापुढे निसर्गाशी सारे व्यवहार हे एक जिवाभावाचा मित्र म्हणून केले पाहिजेत. निसर्गाला शत्रू मानून केलेला विकास प्राणघातक ठरू शकतो, हे अनेकदा अनुभवास आले आहे. त्याची पुनरावृत्ती होता कामा नये, हाच या ‘निसर्गा’ने दिलेला धडा आहे.

loading image