अग्रलेख : संकटमोचक नाना

Nana Patole
Nana Patole

कॉंग्रेस श्रेष्ठींना अखेर महाराष्ट्रातील पक्षसंघटना सक्रिय करण्याच्या प्रयत्नांना मुहूर्त लाभलेला दिसतो. राज्यातील पक्षाचे अस्तित्व अधिक ठळक करण्याच्या दृष्टीने प्रदेशाध्यक्षपदावर नाना पटोले यांच्यासारख्या आक्रमक नेत्याला आणण्यात आले. ही निवड रास्त असली तरी आघाडीच्या राजकारणात अत्यंत कळीचे विधानसभा अध्यक्षपद त्यांनी सोडल्याने त्या पदासाठी आघाडीत रस्सीखेच होऊ शकते.

राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व कोणी करावयाचे, या प्रश्नाचे उत्तर काँग्रेसला गेल्या वर्षभरात सापडले नसले तरी किमान महाराष्ट्र पातळीवर तरी या प्रश्नाचे उत्तर काँग्रेसने दिले आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर कोणाच्याही ध्यानीमनी नसलेली ‘महाविकास आघाडी’ उभी राहिली आणि त्यामुळेच राज्यात चौथ्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या काँग्रेससाठी सत्तेचे दरवाजे खुले झाले, त्यावेळी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे बाळासाहेब थोरात यांना मंत्रिपदात रस असणे हे स्वाभाविकच होते. ते मंत्रिपदी विराजमान झाले, त्या दिवसापासून काँग्रेसची राज्यातील धुरा आता कोणाकडे सोपवली जाणार, अशी चर्चा सुरू होती. आता सरकार स्थापनेस जवळपास सव्वा वर्ष होत असताना ती जबाबदारी विदर्भातील एक लढवय्ये शेतकरी नेते; तसेच ओबीसी नेते नाना पटोले यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेऊन काँग्रेस हायकमांडने केवळ स्वपक्षालाच नव्हे, तर एका अर्थाने सत्ताधारी ‘महाविकास आघाडी’लाही अडचणीत आणले आहे. काँग्रेसचे राज्यातील गेल्या अनेक वर्षांपासूनचे निष्क्रिय नेतृत्व बघता विदर्भातील नानांची या पदासाठी झालेली निवड अचूक आहे, यात शंकाच नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला विदर्भातून मिळालेला कौल उत्साहवर्धक होता. तो मुद्दाही या निवडीत महत्त्वाचा ठरला असू शकतो. तरीही आघाडी सरकारांच्या राजवटीत कळीचे ठरणारे विधानसभा अध्यक्षपद सोडून नानांनी हे संघटनात्मक पद कसे काय स्वीकारले, हा प्रश्नच आहे. 

गेल्या दोन दशकांतील तब्बल १५ वर्षे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार होते आणि मुख्यमंत्रिपदही काँग्रेसकडेच होते. तरीही नेत्यांचे आपापसातील कुरघोडीचे राजकारण आणि मुख्य म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे होता होईल तेवढे खच्चीकरण करण्यासाठी आखलेले डावपेच यामुळे एकेकाळी राज्यात दीड-दोनशे जागा सहज निवडून आणू शकणाऱ्या या पक्षाला गेल्या पाच-सात वर्षांत मोठी ओहोटी लागली. वर्षानुवर्षे याच पक्षाच्या छायाछत्राखाली राहून वारसा हक्काने मनमुराद सत्ता उपभोगणारी अनेक घराणी भारतीय जनता पक्षाचे आश्रित वा मांडलिक बनून राहण्यात समाधान मानू लागली. अवघ्या पाच-सात वर्षांपूर्वीपर्यंत गर्दीने फुलून जाणाऱ्या काँग्रेस कार्यालयांत शुकशुकाट दिसू लागला. या पार्श्वभूमीवर आता या निष्प्राण काँग्रेसमध्ये प्राण फुंकण्याची जबाबदारी नानांवर सोपवण्यात आली आहे.

नानांनी त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून, आता त्या पदासाठी आघाडीतच सुरू झालेल्या रस्सीखेचाचा फायदा, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वालील हे सरकार पाडण्यासाठी कमालीचे उतावीळ झालेले भाजप नेते उठवू शकतील का, या प्रश्नाचे उत्तर काळ देईल. मात्र, काँग्रेसने नानांच्या दिमतीला जी काही नेत्यांची फौज दिली आहे, ती बघता काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांना महाराष्ट्रातील काँग्रेसला खरोखरच संजीवनी द्यायची आहे की राज्यपातळीवर नेत्यांना एकमेकांच्या पायात पाय घालून खेळवत, आपलेच वर्चस्व अबाधित राखावयावचे आहे, असा प्रश्न पडतो. नव्या अध्यक्षांच्या या ‘टीम’मध्ये सहा कार्याध्यक्ष, १० उपाध्यक्ष आणि संसदीय मंडळाचे ३७ सदस्य आहेत. या सहा कार्याध्यक्षांपैकी शिवाजीराव मोघे आणि बसवराज पाटील या विदर्भ तसेच मराठवाड्यातील दोन नेत्यांबरोबरच नसीम खान  आणि चंद्रकांत हंडोरे यांच्या पदरी गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव आला होता. आता स्वत:ला निवडून आणण्यात अपयशी ठरलेले नसीम खान तसेच हंडोरे यांना म्हणे वर्षभरावर येऊन ठेपलेली प्रतिष्ठेची मुंबई महापालिका निवडणूक लक्षात घेऊन, ही जबाबदारी देण्यात आली आहे! सत्तेतील शिवसेना आणि विरोधातील भाजप यांनी मुंबईतील सत्ताकारणाचा बहुतांश अवकाश व्यापून टाकलेला असताना, खरे तर काँग्रेसने मुंबईतून काही नवीन आणि मुख्य म्हणजे आक्रमक तसेच तरुण चेहरे पुढे करायला हवे होते. राज्याच्या पटलावरील अन्य पदाधिकाऱ्यांच्या नावांवर एक नजर टाकली तरी त्याच त्या बद्द वाजणाऱ्या नाण्यांच्या खुळखुळाटातच काँग्रेसला एवढा रस का असतो, असाच प्रश्न पडावा. नवीन कार्याध्यक्षांमध्ये सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती तसेच रोहिदास पाटील यांचे चिरंजीव कुणाल ही अन्य दोन नावे आहेत. काँग्रेस अद्यापही घराणेशाहीच्या पलीकडे विचार करायला तयार नाही, त्याचीच साक्ष यामुळे मिळाली आहे.

त्यामुळे काँग्रेसच्या एकेकाळच्या बालेकिल्यांमध्ये कुठे ‘राष्ट्रवादी’ने तर कुठे भाजपने वर्चस्व केलेले असताना पश्चिम महाराष्ट्र तसेच विदर्भ येथील आपले जुने गड परत हस्तगत करण्याचे आव्हान नाना पटोले यांच्यापुढे आहे. अर्थात, आव्हान मग ते कोणतेही असो; ते स्वीकारण्यात नाना कायमच आघाडीवर असतात. दहा वर्षांपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये गेल्यानंतर शेतकरी तसेच ओबीसी यांची बाजू घेऊन ते थेट नरेंद्र मोदी तसेच देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत होते. नागपुरात त्यांनी नितीन गडकरी यांच्याचपुढे निवडणुकीच्या मैदानात आव्हान उभे केले. तेथे ते पराभूत झाले असले, तरी गडकरी यांचे मताधिक्य कमी करण्यात मात्र त्यांना यश जरूर आले होते. सध्या राज्यातील थोरात असोत की अशोक चव्हाण असोत की पृथ्वीराज चव्हाण हे दरबारी राजकारणाच्या पुढे जायला तयार नसल्यामुळे आम आदमीच्या खांद्याला खांदा लावून मैदानी लढाई करण्यात नाना तरबेज आहेत. त्यामुळेच त्यांची या पदासाठी निवड झाली, हे उघड आहे. मात्र, त्यामुळे निर्माण झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाचा पेच लक्षात घेता, काँग्रेसमध्ये मैदानी राजकारण करू शकणाऱ्या नेत्यांची किती वानवा आहे, तेच उघड झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com