अग्रलेख  : मोहे शाम रंग दईदे 

अग्रलेख  : मोहे शाम रंग दईदे 

Beauty lies in the Eyes of the Beholder सौंदर्य हे बघणाऱ्याच्या डोळ्यांत असते, हा विचार खरे तर ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकातच ग्रीक संस्कृतीत मांडला गेला होता आणि पुढे सोळाव्या शतकात प्रख्यात साहित्यिक विल्यम शेक्‍स्पीयरने आपल्या "लव्हज लेबर्स लॉस्ट' या नाटकातही तोच विचार "सौंदर्याचा निवाडा हा बघणाऱ्याचे डोळे करत असतात...' या उक्तीतून मांडला होता. मात्र, प्रत्यक्षात बऱ्याचदा या निखळ सौंदर्यकल्पना वेगवेगळ्या पूर्वग्रहांनी झाकोळलेल्या दिसतात. "गोऱ्या कातडी'चे आकर्षण हा असाच एक मनात भिनलेला पूर्वग्रह. आपली प्रियतमा असो की वाग्दत्त वधू; ती "गोरी, घारी, नाकी डोळी नीटस' असायला हवी, असे संस्कार आपल्या देशात मुलांच्या मनावर शतकानुशतके रुजवले गेले. त्यातूनच "गोरी, गोरी पान; फुलासारखी छान...' अशी गाणीही लिहिली जात होती. वधू-वर सूचक मंडळांच्या जाहिरातीतही मुलींच्या रंगाचा उल्लेख जाणीवपूर्वक केला जातो. त्यामुळेच "गोरे' बनवून देणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांचा बाजार वर्षानुवर्षे तेजीत सुरू होता. मात्र, गेल्या महिन्यात अमेरिकेत जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय व्यक्तीची गोऱ्या पोलिसाने गळा दाबून भर रस्त्यात हत्या केली आणि हा वर्णभेदाचा मुद्दा ऐरणीवर आला. आंदोलने झाली. त्या पार्श्वभूमीवर आता "हिंदुस्तान युनिलिव्हर' या आंतरराष्ट्रीय कंपनीने गेली चार दशके बाजारात असलेल्या आपल्या "फेअर ऍण्ड लव्हली' या क्रीमच्या नावातील "फेअर' हा शब्द वगळण्यात झाली आहे. त्याआधी अमेरिकेतच हेतल लाखानी या महिलेने एका वधू-वर सूचक मंडळाच्या वेब-साइटवर मुलींच्या रंगांच्या होत असलेल्या नोंदीबद्दल तीव्र आक्षेप घेऊन "ऑनलाइन पिटीशन' सादर केली होती आणि त्यास चांगला प्रतिसाद लाभला. आपल्याकडेही काही बॉलिवूड तारकांनी "वर्णप्रेमी' लोकांविरोधात आवाज उठवला होता. नंदिता दास ही सजग अभिनेत्री त्यात आघाडीवर होती. अर्थात, या बदलत्या वातावरणाची चाहूल लागल्यामुळेच का असेना बाजारपेठीय गणितात माहीर असलेल्या कंपन्या आपले मार्केटिंगचे तंत्र बदलत असू शकतात. या बदलांचे स्वागत करतानाच रंगाविषयी ग्रह, पूर्वग्रह संपवणे हे तेवढ्याने साधणारे नाही, याचीही पक्की खूणगाठ बांधली पाहिजे. 

खरे तर आपल्या 33 कोटी देवांपैकी प्रभू रामचंद्र असोत की भगवान श्रीकृष्ण की विठू माउली असो; त्यांचा वर्ण हा सावळाच होता. "सावळा ग रामचंद्र...' आणि "तू कृष्ण काला, मैं राधा गोरी...' अशी गीतेही शेकड्याने लिहिली गेली. तरीही गौरवर्णाची महती काही संपत नाही. मुद्दा केवळ गौरवर्णाच्या आकर्षणाचा नाही, त्यापायी श्‍याम, कृष्णवर्णाचा दुस्वास करण्याचा आहे. एकीकडे गोऱ्या रंगाविषयी आकर्षण आणि दुसरीकडे काळेसावळे असण्यात कमीपणा मानण्याची प्रवृत्ती. जाहिरात, चित्रपट, प्रसारमाध्यमे, साहित्य या सर्वच क्षेत्रांत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे रंगाधारे भेद करण्याची प्रवृत्ती आढळते. याचे एक कारण अगदी लहान वयापासून होणारे सोशल कंडिशानिंग. गोरा असणे म्हणजे चांगले, हे समीकरण कळत- नकळत डोक्‍यात फिट बसले, की दृष्टिकोन तसाच तयार होतो. 

अर्थात रंगविषयीच्या चुकीच्या कल्पना, धारणा घट्ट होण्यास साम्राज्यवादाचा इतिहासही कारणीभूत आहे. काळाच्या ओघात समाजात चांगले बदल झालेच नाहीत, असे नाही. निर्लेप दृष्टी असलेल्या व्यक्तीही हळूहळू वाढत आहेत. ज्या माणसाला रंगावरून नव्हे, तर अंतरंगावरून ओळखतात. पण साचेबद्ध कल्पनांचा पगडा अद्यापही दूर झालेला नाही, हे कटू वास्तव आहे. समाजातील मान्यवरांची तैलचित्रे काढतानाही त्यांच्या सावळ्या वर्णाला गोरी छटा देण्याचे प्रकार घडतात ते यातूनच. यच्चयावत सौंदर्यप्रसाधनांचा व्यवसाय बव्हंशी या समजांवरच तर आधारलेला असतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर "हिंदुस्तान युनिलिव्हर' असो की "जॉन्सन ऍण्ड जॉन्सन'; त्यांना या गोरे बनवून देण्याच्या क्रीमच्या जाहिरातींबाबत वाटू लागलेली खंत ही काही त्यांच्या मनोवृत्तीत बदल झाला म्हणून असेल असे मानायचे कारण नाही. उद्या सावळ्या रंगाविषयीच्या आकर्षणाची लाट आली, तर हीच बाजारपेठीय व्यवस्था लक्षात घेऊन एखादी कंपनी तसे बनवून देणाऱ्या क्रीमची जाहिरातबाजी करायला कमी करणार नाही! "त्वचेचे आरोग्य महत्त्वाचे; रंग नव्हे', असा संदेश खरे म्हणजे देण्याची गरज आहे. उजळ होण्याच्या हट्टापायी आपल्याच त्वचेवर प्रयोग करणे अन्यायकारक आहे, तर सावळ्याला नाक मुरडणे त्याहून अन्यायकारक. अर्थात, मूळ मुद्दा समाजाच्या मनातून हे रंगप्रेम वा हा रंगद्वेष गेला आहे काय, हा असला पाहिजे. त्याचे कारण गोरेपणाचा शतकानुशतके मनावर असलेला पगडा. आपल्यापेक्षा उजळवर्णीयांचा दुस्वास करायचा आणि आपल्यापेक्षा सावळ्याची हेटाळणी करायची, हा प्रघात काही फक्त लग्नाच्या वेळीच उपस्थित होतो, असे थोडेच आहे? खरा बदल हा मनातून व्हायला हवा. देखणे ते चेहरे, जे प्रांजळाचे आरसे... हे मनावर ठसले पाहिजे. केवळ क्रीमचे नाव बदलून ते होणार नाही हे उघड आहे. पण या निमित्ताने ती प्रक्रिया सुरू झाली तर चांगलेच. 

पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com