अग्रलेख : देवाचिये द्वारी!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 November 2020

सरकारच्या या निर्णयामुळे जनतेला दिवाळी पाडव्याच्याच मुहूर्तावर आपापल्या आराध्यदेवतेची आराधना थेट मंदिरात जाऊन करता येणार असली, तरी सरकारने यासंदर्भात जारी केलेल्या नियमावलीचे कसोशीने पालन करण्याची जबाबदारी ही तुम्हा-आम्हा सर्वांचीच आहे.

दिवाळी पाडव्याच्या आजच्या मंगलमय मुहूर्तावर राज्यातील सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यामुळे ‘तेणे मुक्ती चारी साधिलिया!’ अशीच भावना लोकांच्या मनामनांत उभी राहिली असणार, यात शंकाच नाही. कोरोनाचे मळभ दाटून आल्यापासूनचे गेले जवळपास आठ महिने जनतेला आपापल्या आराध्यदेवतेचे दर्शनच देवदुर्लभ झाले होते. एकीकडे कोरोनाबाधितांची वाढती संख्या, त्यासंबंधातील नियम पाळण्याबाबतची लोकांची कमालीची बेफिकिरी आणि नेमकी तीच संधी साधत, भारतीय जनता पक्षाने मंदिरप्रवेशावरून सुरू केलेले राजकारण, अशा तिहेरी पेचात सरकार सापडले होते. खरे तर राज्यातील वास्तव हे कोणत्याही सार्वजनिक सभा-समारंभांवरील बंदी अद्यापही कायमच ठेवायला हवी, असेच अजूनही आहे. गणेशोत्सवापासून ही बंदी शिथिल व्हायला सुरुवात झाल्यापासून तर लोकांची वाढती गर्दी बघून पुनश्‍च एकवार कडक ठाणबंदी लागू करायला तर लागणार नाही ना, असेच भले मोठे प्रश्नचिन्ह सामोरे उभे राहत आहे. या पार्श्वभूमीवर खरे तर मंदिरप्रवेशाचे राजकारण कोणीही करायला नको होते. पंढरीच्या विठ्ठलाच्या वारीचा रिवाज कधीही न मोडणाऱ्या राज्यातील लाखो वारकऱ्यांनीदेखील त्यामुळेच सरकारी निर्णयाचा मान राखला आणि यंदा वारी मनातल्या मनातच केली. बकरी ईद असो की माउंट मेरीची जत्रा असो, लोकांनी आपल्या उत्साहाला यंदा आवर घातला होता. तरीही भाजपचे नेते हा मुद्दा लावून धरू पाहत होते. एवढेच नव्हे तर भाजपच्या या मागणीत थेट राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारीही जातीने सामील झाले आणि त्यांनी ‘तुम्ही सेक्‍युलर कधी झालात?’ असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला. अर्थात, त्याबद्दल थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाच राज्यपालांना समज देणे भाग पडले. हे सारे राजकारण जनतेच्या आरोग्याची काहीही पर्वा आपल्याला नाही, हीच बाब अधोरेखित करत होते. मात्र, सरकार बधले नाही. दिवाळीनंतरच प्रार्थनास्थळे खुली होतील, या आपल्या आश्वासनाची पूर्तता करणारा निर्णय अखेर सरकारने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घेतला आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अर्थात, सरकारच्या या निर्णयामुळे जनतेला दिवाळी पाडव्याच्याच मुहूर्तावर आपापल्या आराध्यदेवतेची आराधना थेट मंदिरात जाऊन करता येणार असली, तरी सरकारने यासंदर्भात जारी केलेल्या नियमावलीचे कसोशीने पालन करण्याची जबाबदारी ही तुम्हा-आम्हा सर्वांचीच आहे. मंदिरात जाताना पादत्राणे बाहेरच काढायची असली, तरी तोंडावरचा मास्क हा कायमच ठेवायचा आहे, असे मुख्यमंत्री या निर्णयाची घोषणा करताना म्हणाले! हा विनोद नाही, हे लोकांना गांभीर्याने लक्षात घ्यायला लागेल. त्याशिवाय प्रार्थनास्थळांत एकावेळी नेमक्‍या किती जणांना प्रवेश देण्यात येणार आहे, याबाबतचे काही ठोस नियम सरकारला तयार करावे लागणार आहेत. त्याचबरोबर याबाबतच्या नियमांत काही बदल करण्याचे अधिकार हे स्थानिक पातळीवर दिले जाता कामा नयेत, ही जबाबदारी अर्थातच राज्य सरकारचीच आहे. मंदिरे तसेच अन्य धर्मीयांची प्रार्थनास्थळे ही खुली व्हायलाच हवीत. मात्र, संबंधित नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही प्रशासनाबरोबरच प्रार्थनास्थळांच्या व्यवस्थापनाला स्वीकारावी लागणार आहे. अन्यथा, सारेच गाडे विस्कळीत होऊन जाऊ शकते, हे सर्वांनाच ध्यानात घ्यायला लागेल. प्रार्थनास्थळे खुली झाली, ही बाब चांगलीच आहे. मात्र, आता त्याबरोबरच सरस्वतीची विद्यामंदिरेही खुली व्हायला हवीत. त्याचे सूतोवाच उद्धव ठाकरेंनी केले आहे. अर्थात, त्यासाठीही काही कठोर नियमावलींची गरज आहे. त्यापलीकडला विषय हा खासगी कोचिंग क्‍लासेसचा आहे. काही बडे क्‍लासेसवाले वगळता राज्यात अनेकांची उपजीविका ही अशा शिकवण्यांवर अवलंबून असते. शाळा सुरू होणार असतील, तर तेच नियम लावून मग हे खासगी वर्गही त्याच नियमावलीनुसार सुरू करता येऊ शकतात. त्याचाही विचार सरकाराला आज ना उद्या करावाच लागणार आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या ‘पुनश्‍च हरि ॐ’!’ मंत्राचे स्वागत करताना, त्याबाबतच्या नियमांचे पालन करण्याची जबाबदारी जनतेने टाळता कामा नये. राजधानी दिल्लीत राष्ट्रीय हरित लवादाने फटाकाबंदी जारी केली असतानाही, लोकांनी ती धाब्यावर कशी बसवली, त्याचे दर्शन लक्ष्मीपूजनाच्या वेळी बघायला मिळालेच. महाराष्ट्रातही तसेच घडले. त्यात आपल्या राज्यात तर काही शहरांत बंदी आणि काही ठिकाणी परवानगी, असा घोळ झाला होता. त्यामुळे प्रदूषणात झालेली बेसुमार वाढ ही कोरोनाकाळात तर आरोग्याला अत्यंत घातक आहे. कोरोनानेच लादलेल्या ठाणबंदीपासून आता लोकांना मुक्तता हवी आहे, हे खरेच! पण, त्या स्वातंत्र्याची किंमतही कठोर नियम पाळून लोकांनी जशी द्यायला हवी, त्याचबरोबर या नियमांचे पालन होते का नाही, हे प्रशासनानेही डोळ्यांत तेल घालून बघायला लागेल. त्यामुळेच आता मंदिर आपल्या आराध्यदेवतेचे असो की सरस्वतीचे त्या ‘द्वारी उभा क्षणभरी’ असताना आपल्याला सामाजिक तसेच वैयक्तिक सुरक्षेचे भान पाळावेच लागेल. अन्यथा, पुन्हा आपल्या नशिबी ठाणबंदी येऊ शकते, हे ध्यानात घेणे अत्यंत आवश्‍यक आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article about Places of worship of all religions in the state are open for devotees