अग्रलेख  -  "बंडा'नंतरची लक्तरे! 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 July 2020

कॉंग्रेसमधील काही ज्येष्ठ नेते पायलट यांच्यासारखा तरुण, तडफदार मोहरा आपण गमावू नये, असे प्रयत्न करत असतानाच, गेहलोत यांनी पायलट यांची पक्षातून हकालपट्टी व्हावी, म्हणून विडा उचललेला दिसतो. 

राजस्थानात अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात बंडाचे निशाण फडकवणारे सचिन पायलट आणि त्यांचे 18 सहकारी आमदार यांना उच्च न्यायालयाने येत्या शुक्रवारपर्यंत दिलासा दिला आहे. मात्र, या निमित्ताने गेहलोत यांनी जी मुक्ताफळे उधळली आहेत, ती बघता कॉंग्रेसची लक्तरेच चव्हाट्यावर आली आहेत. पायलट यांनी गेल्या आठवड्यात घेतलेल्या बंडखोरीच्या पवित्र्यानंतर, विधिमंडळ पक्षाची बैठक लांबवून कॉंग्रेसने त्यांना दोन वेळा माघारीची संधी दिली होती. मात्र, या दोन्ही बैठकांना जाणे पायलट आणि त्यांच्या गटाने टाळले. तेव्हा गेहलोत यांनी विधानसभा अध्यक्षांमार्फत "तुमचे विधानसभा सदस्यत्व रद्द का करू नये?' अशा नोटिसा पाठवून, या बंडखोरांवर बडगा उगारला आणि प्रकरण न्यायालयात गेले. मात्र, दरम्यानच्या काळात पायलट हे सातत्याने "आपण कॉंग्रेसमध्येच आहोत आणि आपण भारतीय जनता पक्षात जाणार नाही', असे सांगत होते. त्याचवेळी कॉंग्रेसमधील काही ज्येष्ठ नेते पायलट यांच्यासारखा तरुण, तडफदार मोहरा आपण गमावू नये, असे प्रयत्न करत असतानाच, गेहलोत यांनी पायलट यांची पक्षातून हकालपट्टी व्हावी, म्हणून विडा उचललेला दिसतो. त्यामुळेच आता गेहलोत हे पक्षश्रेष्ठींनाही जुमानत नाहीत काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेहलोत यांना सोमवारी पायलट हे "निकम्मा आणि निकारा' (म्हणजेच बिनकामाचे आणि आळशी) आहेत, असा साक्षात्कार झाला. ती वस्तुस्थिती असेल, तर गेले सव्वा वर्षे त्यांनी पायलट यांना आपल्या मंत्रिमंडळात ठेवलेच कसे, असा प्रश्न उभा राहतो. त्याशिवाय, पायलट हे प्रदेशाध्यक्षपदही भूषवित होते. अशा "निकम्मा आणि निकारा' नेत्याला आपण केवळ मंत्रिपदच नव्हे, तर उपमुख्यमंत्रिपद का दिले होते, हे गूढ आता त्यांना स्वत:लाच उलगडावे लागेल! मात्र, त्यापूर्वी कॉंग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनी गेहलोत यांची कानउघाडणी केल्याचे वृत्त असून, त्यांचे हे वक्तव्य "अनुचित' असल्याचे म्हटले आहे. मात्र, राजस्थानात गेले आठ-दहा दिवस सुरू असलेल्या या राजकीय उलथापालथीमुळे कॉंग्रेसची लक्तरेच चव्हाट्यावर येत आहेत. सध्या देशात कॉंग्रेसच्या हातात असलेल्या काही मोजक्‍याच राज्यांपैकी राजस्थान हे महत्त्वाचे राज्य आहे. 2013मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी राज्य कॉंग्रेसचे होते आणि गेहलोत हेच मुख्यमंत्री होते. मात्र, त्या निवडणुकीत त्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली. कॉंग्रेसचे अवघे 21 आमदार विधानसभेत पोचले. त्यानंतरच्या पाच वर्षांत पायलट यांनी पूर्ण राजस्थान पिंजून काढला आणि 2018मधील निवडणुकीत कॉंग्रेसच्या आमदारसंख्येचे शतक झळकले. मात्र, या कामगिरीनंतरही मुख्यमंत्रिपद न मिळाल्यामुळे पायलट कमालीचे नाराज होते. त्याचीच परिणती अखेर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलण्यात झाली. मात्र, त्यानंतर सोनिया गांधी, राहुल गांधी, तसेच प्रियांका या गांधी कुटुंबातील कोणीही त्यासंबंधात चकार शब्दही जाहीरपणे काढला तर नाहीच; शिवाय आपल्या एकेकाळच्या या जीवलग मित्राला थोपवण्याचे प्रयत्न राहुल गांधी यांनी केल्याचे दिसले नाही. गांधी कुटुंबीयांची पायलट यांच्याबाबतची ही उदासीनता पाहूनच गेहलोत यांना अधिक बळ आलेले दिसते. "लहान मुलासारखा चेहरा' (बेबी फेस्ड) आणि "उत्तम इंग्रजीत बाइट देणे' ही नेतृत्वाची लक्षणे नाहीत', अशा शेलक्‍या शब्दांत गेहलोत हे पायलट यांची संभावना करताहेत. खरे तर ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकावत मध्य प्रदेशाचे राज्य भाजपच्या पारड्यात चार महिन्यांपूर्वीच टाकल्याचा अनुभव लक्षात घेऊन निदान राजस्थानात तरी हायकमांडने तातडीने पावले उचलायला हवी होती.

हेही वाचा : मुरलेले दुखणे

गेल्या महिन्यातील राज्यसभा निवडणुकीपासूनच पायलट हे "असंतोषाचे जनक' ठरणार, असे दिसू लागल्यावर सोनिया गांधी यांनी गेहलोत व पायलट यांची एकत्र बैठक घेऊन काही मार्ग काढायला हवा होता. त्याऐवजी तुलनेने कनिष्ठ नेत्यांवर त्यांनी हा पेच सोडवायची जबाबदारी टाकून निवांत बसणे पसंत केले. आता शुक्रवारी राजस्थान उच्च न्यायालय पायलट आणि अन्य आमदारांच्या बडतर्फीबाबतच्या विधानसभा अध्यक्षांच्या नोटिसांवर काय निकाल देणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. अर्थात, निकाल कोणाच्याही म्हणजे पायलट वा गेहलोत यांच्या बाजूने लागला, तरी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार, हे उघड आहे. तोपावेतो गेहलोत यांना विधानसभेची बैठक बोलावून विश्वारसदर्शक ठराव मंजूर करून घेता येईल काय, हेही तूर्तास अनिश्‍चितच आहे. मात्र, "आपण कॉंग्रेसमध्येच आहोत!' असे सांगणाऱ्या पायलट यांनी विश्वासदर्शक ठरावाला पाठिंबा दिला, तर पायलट यांची पक्षातून हकालपट्टी व्हावी, यासाठी सुरू असलेल्या गेहलोत यांच्या प्रयत्नांना धक्का बसेल. मात्र, "कोरोना'च्या या संकटातही गेला संपूर्ण आठवडा कॉंग्रेसचे दोन्ही गटांतील आमदार या ना त्या रिसॉर्टवर अंताक्षरी खेळत आणि पार्ट्या झोडत असल्याने कॉंग्रेसची मान अधिकच खाली गेली आहे. गांधी कुटुंबीय आपले मौन सोडणार तरी कधी, याचीच आज अस्वस्थ राजस्थान वाट बघत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article about Rajasthan Political Crisis