esakal | अग्रलेख :  रावसाहेबी तर्कट
sakal

बोलून बातमी शोधा

अग्रलेख :  रावसाहेबी तर्कट

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असताना कोणतेही ताळतंत्र न ठेवता आडताड बोलण्याच्या आपल्या स्वभावामुळे त्यांनी अनेकदा वाद ओढवून घेतले होते आणि त्यानंतर त्यांना माफीनामाही सादर करावा लागला होता.

अग्रलेख :  रावसाहेबी तर्कट

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

केंद्रीय राज्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते रावसाहेब दानवे हे आपल्या वक्तव्यांनी सनसनाटी निर्माण करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. अशा वक्तव्यांमुळे ते अनेकदा अडचणीतही आले आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असताना कोणतेही ताळतंत्र न ठेवता आडताड बोलण्याच्या आपल्या स्वभावामुळे त्यांनी अनेकदा वाद ओढवून घेतले होते आणि त्यानंतर त्यांना माफीनामाही सादर करावा लागला होता. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने दुसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकल्यावर त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली. तेव्हा आता तरी हे रावसाहेब आपल्या जिभेला काही आवर घालतील, असे वाटत होते. मात्र, तसे झालेले त्यांच्या ताज्या वक्तव्यावरून दिसत नाही. दिल्लीत गेले दोन आठवडे सुरू असलेल्या आंदोलनाला चीन तसेच पाकिस्तान यांची फूस असल्याचे तारे तोडत नव्या वादाला तोंड फोडले आहे. ‘हे त्यांचे वैयक्तिक मत आहे,’ अशी सारवासारव जरी प्रदेशाध्यक्षांनी केली असली; तरी भाजपच्या गेल्या पाच-सात वर्षांतील रणनीतीवर दृष्टिक्षेप टाकला, तर केंद्रातील सरकार व भाजप यांच्याविरोधात जराही कोठे सूर कोठे उमटला की त्याची संभावना राष्ट्रद्रोही अशी करण्याची रीतच बनून गेली आहे, असे दिसते. अशा वाचाळ नेत्यांना ‘सोशल मीडिया’वरील भक्तांची मांदियाळी जोमाने साथ देत असते. खरे तर दानवे यांच्याकडे ग्राहक संरक्षण तसेच अन्न आणि सार्वजनिक वितरण अशी शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित खाती आहेत. शिवाय, आपण स्वत: शेतकरी असल्याचेही रावसाहेब हिरिरीने सांगतात; तरीही राजधानीला शेतकऱ्यांनी घातलेल्या वेढ्यामागे पाकिस्तान तसेच चीन यांचा हात आहे, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. साध्या संवेदनशीलतेलाही ही नेतेमंडळी अशी पारखी का झाली आहेत, असा प्रश्‍न पडतो. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शेतकऱ्यांच्या या आंदोलनातील मूळ प्रश्नांवरून सर्वसामान्य जनतेचे लक्ष विचलित करण्याचाच हा प्रयत्न आहे; सोशल मीडियावरील भक्तांच्या टोळ्याही त्यात सामील आहेत. शेतकऱ्यांचे हे आंदोलन सुरू झाल्यावर यास भक्तगणांनी त्यामागे खलिस्तानवाद्यांचा हात आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न काही जुन्या व्हिडिओंची मोडतोड करून केला होता. हे व्हिडिओ व्हायरलही झाले. त्यानंतर थेट गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकाराची चौकशी करावी, अशीही मागणी झाली. मात्र, सत्य काय ते सर्वांनाच ठाऊक असल्याने शहा यांनी त्यासंबंधात मौन धरणेच पसंत केले. अर्थात, हादेखील भाजपच्या रणनीतीचाच भाग असू शकतो. प्रसारमाध्यमांतून काही पुड्या सोडल्या जात असतील, तर त्यासंबंधात मिठाची गुळणी घेऊन बसायचे आणि हवा असलेला अपेक्षित परिणाम साधला जातो आहे, यात आनंद मानायचा, असे धोरण भाजप नेते आणि समर्थक गेली सहा-सात वर्षे रेटून नेत आहेत. ही आणि अशीच रणनीती इंदिरा गांधी यांचीही होती आणि निषेधाचा सूर उमटू लागताच त्यामागे ‘परकी हात’ असल्याचे पुकारे होत असत. पण, त्यांच्या एकाधिकारशाहीवरील टीकेत पुढे असलेल्या भाजपच्या नेत्यांनी आता स्वतःलाही जरा आरशात पाहावे. नुकत्याच पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत मोदी यांनीही विरोधकांचा समाचार घेताना, हे लोक ‘भारतमाता की जय’! अशी घोषणा देत नाहीत, असे सांगून विकासाचे राजकारण राष्ट्रप्रेम आणि देशद्रोह याभोवती नेऊन ठेवले होते. भोळी-भाबडी जनता त्यास बळी पडते, असा भाजप नेत्यांचा गेल्या काही वर्षांतील अनुभव आहे. त्यामुळेच दानवे यांची जीभ निसरडी असली, तरी ‘शेतकरी आंदोलनास चीन-पाक यांची फूस’ हे त्यांचे तर्कट भाजपच्या तर्कशास्त्रास सोयीचे असेच आहे, हे लक्षात घ्यायला हवे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे चीन तसेच पाकिस्तान यांचा हात आहे, हे विधान कोण्या ऐऱ्यागैऱ्याने सोशल मीडियावरून केलेले नाही, तर मोदी यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्याने केले आहे. त्यामुळे खरे तर संरक्षण तसेच गृहमंत्र्यांनी त्याची गांभीर्याने दखल घ्यावी. ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’चे नेते राजू शेट्टी यांनीही याच मुद्द्यावरून थेट मोदी यांना टोला लगावला आहे. चीन तसेच पाकिस्तान यांचा या आंदोलनामागे हात असेल तर तो बाह्य शक्तींवर नियंत्रण ठेवण्यात मोदी यांना आलेल्या अपयशाचाच पुरावा नव्हे काय, हा त्यांचा प्रश्‍न विचार करायला लावणारा आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या शेतकऱ्यांचे आंदोलन अत्यंत तीव्रतेने सुरू असून, अनेक शेतकरी आपली नेहमीची कामधामे सोडून आपले गाऱ्हाणे वेशीवर टांगण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या मागण्या, भूमिका यांविषयी मतभेद जरूर असू शकतात; परंतु सरसकट त्यांच्यावर कुठला शिक्का मारणे चुकीचे आहे. त्यांच्या हेतूंविषयीच शंका घेऊन आंदोलनावर राळ उडविण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी आपली शक्ती शेतकऱ्यांना सरकारी कायद्यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी वापरावी.

loading image