अग्रलेख :  सुगीतील समभाग

अग्रलेख :  सुगीतील समभाग

शेअर बाजार हा तात्कालीक परिस्थितीवर अल्पकाळ प्रतिक्रिया देतो आणि नंतर भविष्याचा वेध घेत असतो. या दोन्हींची कारणे समजावून घेण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि अर्थमंत्र्यांनी दिलेला बूस्टर डोस हे दोन्ही घटक या बाबतीत परिणामकारक ठरलेले दिसत आहेत. सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी मात्र सावधपणेच पावले टाकली पाहिजेत.

कोरोना महासाथीच्या काळात सततच्या लॉकडाउनमुळे साऱ्या उद्योग क्षेत्राला फटका बसलेला असताना, अर्थव्यवस्थेला ग्रहण लागलेले असताना एकच ठिकाण सकारात्मकतेकडे वाटचाल करताना दिसत होते आणि ते म्हणजे आपला शेअर बाजार. एरवी कोणत्याही किरकोळ कारणाने घसरणारा हा बाजार कोरोनाचे मोठाले संकट समोर असतानाही फारच लवकर किंवा झपाट्याने सुधारला. अवघ्या १० महिन्यांत ९० टक्क्यांची वाढ दाखवून या बाजाराने सर्वांनाच चकीत केले. हे का झाले, याचे गूढ उकलायच्या आतच नव्या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प सादर झाला आणि ‘न भूतो, न भविष्यती’ अशी तब्बल पाच टक्के वाढीची खणखणीत सलामी या बाजाराने अर्थसंकल्पाच्या दिवशीच दिली. त्यानंतरचे तीन दिवसही बाजार नवनव्या भराऱ्या मारताना दिसला. यादरम्यान ‘सेन्सेक्स’ने ५० हजार अंशांची ऐतिहासिक बंद पातळी गाठून गुंतवणूकदारांना मालामाल केले. त्यामागची कारणे विचारात घेणे गरजेचे आहे. 

आपल्या अर्थव्यवस्थेचा एक ‘बॅरोमीटर’ म्हणून शेअर बाजाराकडे पाहिले जाते. याचा अर्थ अर्थव्यवस्थेच्या अन्य परिमाणांकडे दुर्लक्ष करता येत नाही किंवा दुय्यम म्हणूनही लेखता येत नाही. मग ती देशाची वित्तीय तूट असो, एकूण देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) असो, चलनवाढीचा दर असो किंवा व्याजदरांचा परिणाम असो. वस्तुतः अर्थसंकल्पापूर्वीच शेअर बाजाराने तेजीची कास धरली होती, प्रत्यक्ष अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर त्याला बळ मिळाले इतकेच. कारण शेअर बाजार हा तात्कालीक परिस्थितीवर अल्पकाळ प्रतिक्रिया देतो आणि नंतर भविष्याचा वेध घेत असतो. आधी कोरोनाचे संकट असले तरी लस निघण्याची शक्यता होतीच, तशी ती आलीही. थोडक्यात, या संकटाचे वादळ बाजारावर फार काळ घोंघावू शकणार नाही, हे आधीच स्पष्ट झाले होते. त्यातच अर्थसंकल्पातून बाजाराला तेजीचा खास डोस मिळाला!  वित्तीय तुटीची कोणतीही चिंता न करता अर्थमंत्र्यांनी धाडसी अर्थसंकल्प सादर केला. एकीकडे वित्तीय तूट वाढल्यास देशाच्या पतमानांकनावर विपरीत परिणाम होण्याची टांगती तलवार, तर दुसरीकडे सर्वच क्षेत्रांकडून अपेक्षांचे ओझे अशा विचित्र परिस्थितीत मांडलेला हा अर्थसंकल्प होता. यातील काही गोष्टींवर नजर टाकली तर बाजाराला बळ का मिळाले, हे सहज समजू शकेल. प्रथमतः वित्तीय तुटीची तमा न बाळगता अर्थमंत्र्यांनी सरसकट पैशाची खिरापत न वाटता, आवश्यक त्या क्षेत्रांना उभारी देण्यासाठी ठोस उपाय योजले आणि महत्त्वाचे म्हणजे भांडवली खर्चावर भर दिला. यातून ‘ॲसेट’ तयार होण्याची प्रक्रिया सुरू होईल, ज्याचा सकारात्मक परिणाम दीर्घकाळात दिसून येईल. ‘जीडीपी’ची वाढ कशी होते आणि होणार हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. २०२०-२१ चा विचार केला तर रिअल टर्ममध्ये ती उणे ७ टक्के आणि चलनवाढ धरून उणे ४ टक्के होती, परंतु, मार्च २०२२ कडे नजर टाकली तर रिअल टर्ममध्ये हीच वाढ ११ टक्के गृहीत धरली जात आहे, नॉर्मल टर्ममध्ये ती १५ टक्क्यांवर जाते. हा अंदाज आर्थिक पाहणी अहवालातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही वर्तविला आहे. विशेष म्हणजे या अंदाजाबद्दल आज कोणीही शंका घेत नाही. अशी वाढ जर खरोखरच होणार असेल तर शेअर बाजारात नोंदणी झालेल्या कंपन्यांच्या नफ्यातही वाढ होऊ शकते. त्याचा परिणाम त्यांच्या शेअरभावावर होऊ शकतो. याचबरोबरीने सरकारच्या करसंकलनात वाढ होत असल्याचे गेल्या दोन-तीन महिन्यांतून जाणवत आहे. बँकांपुढील थकीत कर्जांचा (एनपीए) प्रश्न मिटविण्यासाठी सरकार ‘ॲसेट रिस्ट्रक्चरिंग’साठी वेगळी यंत्रणा उभी करणार आहे. अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या बँकिंग क्षेत्राला नवसंजीवनी मिळणाऱ्या या घोषणेचा परिणामही शेअर बाजाराने नुकताच पाहिला आहे. गुरुवारी ‘बँक निफ्टी’ने ३५ हजार अंशांची पातळी गाठून जोरदार सलामी ठोकली आहे. याचबरोबरीने दोन बँका आणि एका सरकारी विमा कंपनीचे खासगीकरण आणि निर्गुंतवणुकीचा धमाका उडवून सरकार आपली तिजोरी भरणार आहे, त्यासाठी नव्या कराचा बोजा लादण्याचा मार्ग निवडला गेला नाही, हेही उल्लेखनीय आहे. बाजाराला बळ द्यायला हे सारे ‘बुस्टर डोस’ कारणीभूत ठरले.

आता प्रश्न राहतो तो शेअर बाजाराचा वाढलेला आलेख टिकणार का? हा फुगवटा तर नाही ना?  शेअरच्या भावातील वाढ ‘ओव्हरव्हॅल्युएशन’ म्हणावी अशी आहे. तरीही कमी व्याजदराचा काळ लक्षात घेता, भविष्यात आर्थिक विकासाला, प्रगतीला मोठा वाव आहे, हेही ध्यानात घेतले पाहिजे. कारण अमेरिकेसह बाहेरच्या देशांत व्याजदर खूप कमी आहेत. डॉलरही कमकुवत होत आहे, त्यामुळे विकसित देशांकडून विकसनशील देशांकडे पैसा येणार आहे. भारतही त्याचा एक मोठा लाभार्थी असणार, हे नक्की. अशावेळी पुढच्या ५-१० वर्षांचा विचार करता अनेक चांगल्या कंपन्यांची कामगिरी सुधारणार आहे. त्याचा फायदा त्याच्या शेअरधारकांना होणार, हे उघड आहे.  चढ-उतार हा बाजाराचा स्थायी भाव आहे, ते घडतच राहणार. फक्त त्याच्या मूळ कारणांकडे डोळसपणे पाहणे आवश्यक आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे... घेताघेता नक्की कोणते शेअर घ्यावेत, हा प्रश्न तज्ज्ञांची मदत घेऊन सोडविला पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com