esakal | अग्रलेख : एका चमत्काराची पंचविशी!
sakal

बोलून बातमी शोधा

Ganeshmurti

अलीकडे ‘जनरेशन-झी’ असे लाडके संबोधन लाभले आहे, त्या नव्या सहस्रकात जन्मलेल्या पिढीला कदाचित कल्पना नसेल; पण २५ वर्षांपूर्वी याच दिवशी एक देशव्यापी चमत्कार घडला होता. दिवस उजाडता उजाडताच राजधानी दिल्लीतील एका मंदिरातील गणेशाच्या मूर्तीने भक्ताच्या हातातल्या वाटीतून चक्क दूध प्यायला सुरुवात केली. हा हा म्हणता बातमी पसरली. त्या काळी ना धड टीव्ही वाहिन्यांचा गदारोळ होता, ना मोबाईल फोनचा सुळसुळाट.

अग्रलेख : एका चमत्काराची पंचविशी!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

अलीकडे ‘जनरेशन-झी’ असे लाडके संबोधन लाभले आहे, त्या नव्या सहस्रकात जन्मलेल्या पिढीला कदाचित कल्पना नसेल; पण २५ वर्षांपूर्वी याच दिवशी एक देशव्यापी चमत्कार घडला होता. दिवस उजाडता उजाडताच राजधानी दिल्लीतील एका मंदिरातील गणेशाच्या मूर्तीने भक्ताच्या हातातल्या वाटीतून चक्क दूध प्यायला सुरुवात केली. हा हा म्हणता बातमी पसरली. त्या काळी ना धड टीव्ही वाहिन्यांचा गदारोळ होता, ना मोबाईल फोनचा सुळसुळाट. इंटरनेटचे मायाजाल अगदीच मर्यादित स्वरूपात देशात चंचुप्रवेश करत होते. मग फेसबुक, ट्‌विटरादी सोशल आयुधे तर दूरच राहिली. त्या बिगर फेसबुकयुगातही श्रीगणेशाच्या मूर्तीने दूध प्राशन केल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. पाहता पाहता देशाच्या कोनाकोपऱ्यातून अशाच प्रकारच्या चमत्काराची वृत्ते येऊन थडकू लागली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मंदिरांमध्ये भक्तगणांच्या रांगा लागल्या. मूर्तीच्या मुखाला दुधाचा चमचा वा काठोकाठ भरलेली वाटी लावली की हळूहळू दुधाची पातळी कमी होताना दिसू लागली. भक्तगण सद्‌गदित झाले. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनीदेखील असा अनुभव आल्याचे जाहीररीत्या सांगितले. त्या वर्षीच्या २१ सप्टेंबर  रोजी संपूर्ण देश हातातली कामेधामे सोडून गणपतीच्या मूर्तीसमोर चमचा धरून दिवसभर उभा होता. सीएनएन, बीबीसी या प्रसारण व्यवसायातील दांडग्या संस्थांनीही या ‘चमत्कारा’चे तपशीलवार वृत्तांकन केले. श्रीगजाननाने फक्त भारतातल्याच नव्हे; तर अमेरिका, ब्रिटन, श्रीलंका, अरबस्तानातील मंदिरांमध्येही दुधाचा प्रसाद ग्रहण केल्याच्या शेकडो बातम्या येत होत्या. हा ‘चमत्कार’ पाहून वैज्ञानिक, वैचारिक आणि सुज्ञदेखील सुन्न झाले होते. एका साध्यासुध्या भौतिक विज्ञानातील तथ्याचे रूपांतर इतक्‍या जलद सामूहिक उन्मादात व्हावे?

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केशाकर्षण (कॅपिलरी इफेक्‍ट) ही कुठल्याही भौतिक पृष्ठभागावरील संरचनेमुळे घडून येणारी प्रक्रिया असते. असंख्य अणुरेणूंनी बनलेल्या घनपदार्थाचा पृष्ठभाग द्रवाचा थेंब सूक्ष्मरीत्या शोषून घेतो आणि त्याच पृष्ठभागावर पसरवतो. याच वैज्ञानिक सत्याचा परिणाम म्हणून घरोघरीचे आणि गावोगावीचे गणपती दूध प्यायले. परंतु, एकदा चमत्काराच्या जाणिवेने मनाचा ठाव घेतला की, विज्ञान बाजूला फेकले जाते आणि उरतो तो फक्त उन्माद. त्या सामूहिक उन्मादाची ही (गद्धे )पंचविशी आहे.

त्या कथित चमत्कारातील सत्य बाहेर आल्यानंतर तरी अशा अंध समजुतींच्या घटना कमी होतील, अशी आशा जर कोणाला वाटली असेल तर ती फोल ठरली आहे. त्यामुळेच हा प्रकार एवढ्या तपशिलात पुन्हा सांगण्याची वेळ आली. माहिती प्रसारणाच्या क्षेत्रातील अत्याधुनिक साधनांचा वापरही अनेक थोतांड गोष्टींच्या प्रसारासाठी होताना दिसतो आहे. गेल्या पाव शतकात जगातच मोठे सामाजिक, आर्थिक बदल झाले आहेत. जीवनाचा वेग अपरिमित वाढला आहे. हातात मोबाईल फोन आला आहे. माहितीची देवाणघेवाण, परस्परसंपर्क आणि वृत्तवेधाचा खेळ अवघ्या काही सेकंदांचा उरला आहे. बातमी आणि अफवा पसरण्यासाठी आता मुबलक साधने उपलब्ध आहेत. एकीकडे विज्ञानाच्या क्षेत्रात आपण उत्तुंग कामगिरी करीत आहोत. मंगळयानाची योजना आखणाऱ्या भारताने तर चंद्रावर भारतीय अंतराळवीर पाठवण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. पण, दुसऱ्या बाजूला जनमानसात वैज्ञानिक दृष्टिकोन दृढमूल झाला आहे, असे दिसत नाही. अशा बदललेल्या भारतात विघ्नहर्त्याने अथवा कुठल्याही दैवताने दूध प्राशन केले, तर त्याला चमत्कार मानले जाईल का? या प्रश्नाचे उत्तर मात्र अजूनही ठामपणे ‘नाही’ असे देता येणार नाही. उलटपक्षी, असल्या तथाकथित चमत्कारांचे पेव फुटलेलेच आपल्याला समाज माध्यमांवर पाहायला मिळते.

पंचवीस वर्षांपूर्वी ‘गणपतीबाप्पा दूध प्यायले’ म्हणून देशाच्या कोनाकोपऱ्यात जो सामूहिक उन्माद उसळला, तोच आता समाज माध्यमांवर जवळपास रोज पाहायला मिळतो. एखाद्या घटनेने किंवा अफवेने उग्र भावनिक रूप धारण केले, की त्याचे वणव्यासारखे वर्तन सुरू होते. सारासार विवेक, विज्ञानवाद, शहाणपण वगैरे गायब होते आणि बुद्धी गहाण पडते. आजही जगभरातील अनेक ठिकाणी ‘मास हिस्टेरिया’चे उदाहरण म्हणून भारतातील गणपती दूध प्यायल्याच्या घटनेचे उदाहरण दिले जाते. अर्थात, हे काही एकमेव उदाहरण नाही. सर्वच धर्मांत आणि देशांत असे ‘चमत्कार’ घडतात आणि अनेक जण त्यावर विश्‍वास ठेवतात. ‘स्कायलॅब’ नावाची अंतराळ प्रयोगशाळा कोसळण्याच्या भीतीने उडालेली सामूहिक गाळण, अज्ञात विषाणूची विचित्र लागण, सामूहिक हास्यलाटेची लागण असलेही सामूहिक उन्माद मानवी इतिहासात कुठे कुठे नोंदले गेले आहेत. समूहमनाची ठेवणच अशी असते.

करकरीत विवेकबुद्धीचे अधिष्ठान असलेला संपूर्णत: विज्ञानवादी समाज वा समूह आजतरी कुठेही अस्तित्वात नाही. अर्थात, त्या दिशेने जाण्याचे मानवाचे प्रयत्न जरूर सुरू आहेत. पंचवीस वर्षांपूर्वी संपर्काचे मर्यादित मार्ग असतानाही गणपती दूध प्यायल्याची अफवा वायुवेगाने पसरली. आजतर मोबाईलसारखे सर्वस्पर्शी खेळणे हाती आले आहे. त्याचा उपयोग विवेकमार्गी उन्नयनासाठी करायचा की विवेकशून्य उन्मादासाठी, हे आता नव्या पिढीने ठरवायचे. अर्थात, समाजात शहाणपण रुजवणे, हा मात्र खराखुरा चमत्कारच ठरावा!