अग्रलेख : विज्ञानाचे होवो सार्थक

अग्रलेख : विज्ञानाचे होवो सार्थक

कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लशीला मंजुरी मिळाल्याने सर्वसामान्यांना हायसे वाटले; मात्र लसीकरणाचे स्वरूप आणि वेळापत्रक ठरविताना वैज्ञानिक निकषांना महत्त्व द्यायला हवे. त्यावरून सवंग वक्तव्ये टाळणे श्रेयस्कर.

काळरात्रीप्रमाणे भासत राहिलेले वर्ष अखेर उलटले आणि नव्या वर्षाच्या पहिल्या दोन दिवसांतच लशीची प्रतीक्षाही संपली आहे. अपार उत्सुकतेने अवघे भारतवर्ष कोरोना विषाणूशी सुरू असलेल्या जीवघेण्या लढाईत प्रतिबंधक लशीची प्रतीक्षा करत होते. जगभरात काही ठिकाणी असे लसीकरण सुरूही झाले होते. त्यामुळे तर भारतवासीय अधिकच आतुर झाले होते. आता भारतवासीयांना नववर्षाच्या पहिल्या आठवड्यातच एक नव्हे, तर दोन लशी उपलब्ध असल्याची सुवार्ता आली आहे. त्यातही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब म्हणजे अपवादात्मक परिस्थितीत वापरण्याची परवानगी मिळालेली पहिली लस ही पुण्यातील प्रख्यात ‘सीरम इन्स्टिट्यूट’ची आहे. नववर्षाची पहिली खूषखबर घेऊन आलेल्या या लशीचे बारसे ‘कोव्हिशिल्ड’ असे तिच्या जन्मापूर्वीच करण्यात आले होते. अर्थात, या लशीचे मूळ रूप हे थेट ऑक्‍सफर्ड येथून अवतरलेले आहे. शुक्रवारी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी या लशीची शिफारस केल्याची घोषणा सरकारच्या तज्ज्ञ समितीने केली आणि नंतरच्या २४ तासांतच लसवितरणाच्या आगामी मोहिमेची चाचणीही देशभरात यशस्वी झाली. ही चाचणी सुरू असतानाच, शनिवारी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या (सीडीएससीओ) तज्ज्ञ समितीची बैठक होऊन, तीत भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्‍सिन’लाही मंजुरी देण्यात आली आहे. त्यातच राज्याबरोबरच देशातही लसीकरणाची सराव फेरीही यशस्वी झाल्याने वर्तमान हे नक्कीच सुखद आहे. ‘सीरम’ तसेच ‘भारत बायोटेक’ या कंपन्यांमधील तज्ज्ञांनी गेले काही महिने अथक परिश्रम करून हे सौख्य आपल्या पदरात घातले आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करायलाच हवे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मात्र, रोगप्रतिबंधाचा हा विज्ञानमार्ग आहे, याचे भान ठेवूनच त्यासंबंधीच्या सर्व प्रक्रियांकडे पाहायला हवे. प्रयोग, पडताळणी याच पद्धतीने विज्ञान पुढे जाते. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याचा प्रघात पडला आहे. खरे तर ‘कोविड-१९’ या विषाणूवर मात करणारी ही लस हा औषधशास्त्रातील तज्ज्ञांचा विजय आहे. त्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघण्याऐवजी ऑस्ट्रेलियातून उच्च शिक्षण घेऊन भारतीय राजकारणाच्या उत्तर प्रदेशी रंगमंचावर अवतीर्ण झालेले अखिलेश यादव यांनी या लशीची संभावना ‘भाजपची लस’ अशी करण्यात धन्यता मानली! शिवाय, ‘ही लस आपण घेणार नाही,’ असेही जाहीर करून ते मोकळे झाले. हा खरे तर या लसनिर्मितीसाठी झटलेल्या तज्ज्ञांचा धडधडीत अपमानच आहे. त्यापलीकडची बाब म्हणजे, या लशीच्या वाटपावरून सुरू झालेले राजकारण. खरे तर बिहार विधानसभेच्या प्रचार मोहिमेतच भारतीय जनता पक्षाने आपल्या जाहीरनाम्यातच बिहारी जनतेला ही लस मोफत देण्याचे आश्वासन दिले होते आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्याचे समर्थनही केले होते. त्यानंतर उठलेल्या वादळानंतरही भाजपची खुमखुमी जिरलेली नाही, हेच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दाखवून दिले. शनिवारी त्यांनी प्रथम ‘देशभर मोफत लसीकरण करू,’ अशी घोषणा करून आणखी एक वाद अंगावर ओढवून घेतला. खरे तर ही इतकी महत्त्वाची घोषणा थेट पंतप्रधानांऐवजी आरोग्यमंत्र्यांनी कशी काय केली, असाच प्रश्न त्यामुळे निर्माण झाला होता. मात्र, अपेक्षेप्रमाणेच डॉ. हर्षवर्धन यांना खुलासा करावा लागला आणि त्यांनी पहिल्या टप्प्यात तीन कोटी लोकांना लस मोफत दिली जाईल, तसेच त्यात एक कोटी हे आरोग्य कर्मचारी तर दोन कोटी कोरोनायोद्धे असतील, अशी मखलाशी करण्याचा प्रयत्न केला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या लशीलाही धार्मिक रंग देत ‘लसीकरणासाठी मकर संक्रांती’चा मुहूर्त जाहीर केला. हे सारे गेले दहा महिने आपल्या प्राणांची बाजी लावून कोरोनाबाधितांवर उपचार करणारे डॉक्‍टर तसेच आरोग्य कर्मचारी यांचा अपमान करणारे आहे. तसेच, आपल्या देशात विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनाचा किती अभाव आहे, यावरच बोट ठेवणारे आहे. त्यामुळे एकीकडे ही लस उपलब्ध झाली, याचे स्वागत करतानाच, या क्षुद्र पक्षीय तसेच धार्मिक राजकारणाचा तीव्र निषेधही करणे आवश्‍यक आहे.

मात्र, आता या साऱ्या राजकारणापलीकडे जाऊन लसीकरणाचा कार्यक्रम यशस्वी कसा करता येईल, याचाच विचार सर्वपक्षीय राजकारणी, सत्ताधारी तसेच प्रशासकीय यंत्रणांना करावा लागणार आहे. १३५ कोटींच्या देशात हे काम सोपे नाही. शिवाय, या लशीच्या चाचण्या झाल्या तेव्हा काहींना त्याची ॲलर्जी आल्याचेही लक्षात आले. ही लस एकदा नव्हे तर दोनदा घ्यायची असते, असे आत्तापर्यंत सांगितले जात होते. आता प्रत्यक्ष लस उपलब्ध झाल्यावर तरी त्याबाबत संपूर्ण पारदर्शक पद्धतीनेच लसीकरणाची मोहीम राबवावी लागणार आहे. शिवाय, आता लस आलीच आहे तर मास्क, शारीरिक अंतर आणि हात धुणे, ही तीन पथ्ये पाळण्याबाबतही ढिलाई होता कामा नये. आता ही जबाबदारी आपलीही आहे, अशी भावना नागरिकांच्या मनात खऱ्या अर्थाने जागृत झाली; तरच औषधनिर्माण शास्त्रज्ञांच्या या परिश्रमाचे खऱ्या अर्थाने सार्थक झाले, असे म्हणता येईल.

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com