esakal | अग्रलेख : झुंडशाहीचे बंड
sakal

बोलून बातमी शोधा

अग्रलेख : झुंडशाहीचे बंड

अमेरिकेच्या इतिहासातील अभूतपूर्व अशा अनर्थाला ही गोष्ट कारणीभूत ठरलीच; पण एका व्यक्तीच्या विक्षिप्तपणाकडे बोट दाखवून मूळ समस्या नजरेआड करता येणार नाही.

अग्रलेख : झुंडशाहीचे बंड

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

व्यक्ती स्वतःला व्यवस्थेपेक्षा मोठी मानू लागली, की कोणत्या थरापर्यंत जाऊ शकते, याचे उदाहरण ट्रम्प यांनी घालून दिले. अमेरिकेच्या इतिहासातील अभूतपूर्व अशा अनर्थाला ही गोष्ट कारणीभूत ठरलीच; पण एका व्यक्तीच्या विक्षिप्तपणाकडे बोट दाखवून मूळ समस्या नजरेआड करता येणार नाही.

बंड म्हटले, की त्यात तीव्र विरोध, उठाव, उद्रेक हे सगळे घटक अंतर्भूत असतात, हे खरे; पण बंडामागे काहीना काही व्यापक ध्येयवाद असतो. तो नसेल तर असे प्रकार म्हणजे निव्वळ झुंडशाही ठरते. अमेरिकेच्या राजधानीत बुधवारी जे काही घडले ते यापेक्षा वेगळे नव्हते. विरोधात गेलेला निवडणुकीचा निकाल मान्य नाही, म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आक्रस्ताळेपणा करतील, आदळआपट करतील, हे त्यांचा स्वभाव लक्षात घेता अपेक्षितच होते. या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप ते सातत्याने करीत होते. किंबहुना अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारातही त्यांनी आधीपासूनच हे म्हणायला सुरुवात केली होती. प्रचारयुद्धात सारे काही क्षम्य म्हणून ते सोडून देता आले असते. पण, निकालानंतरही त्यांनी ज्यो बायडेन गैरमार्गाने निवडून आल्याच्या तक्रारी अमेरिकी व्यवस्थेने दिलेले सर्व मार्ग वापरत केल्या. त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे धाव घेतली, न्यायालयाकडे याचिका दाखल केल्या. ट्विटरसारख्या माध्यमातून सातत्याने राळ उठवली. पण, कुठेच त्यांची डाळ शिजली नाही. आपल्याच पक्षाच्या जॉर्जियातील निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव आणून आवश्‍यक मतांची पूर्तता करण्याची धमकीवजा सूचना त्यांनी केली. पण, त्याला तो अधिकारी बधला नाही. वास्तविक, या टप्प्यावर तरी ट्रम्प यांनी पराभव स्वीकारणे त्यांच्याच नव्हे, तर अमेरिकी लोकशाहीच्या दृष्टीनेही हिताचे ठरले असते. पण, एकदा का विवेकाशी भांडण मांडले, की वेगाने गर्तेत जाऊन आपटण्याशिवाय दुसरे काही घडू शकत नाही. समर्थकांना सातत्याने चिथावणी देणारी भाषणे ते करीत राहिले आणि त्यांच्या समर्थकांनी थेट ‘कॅपिटॉल हिल’वर हल्लाबोल केला. सुदैवाने अमेरिकी काँग्रेसने ज्यो बायडेन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आणि त्यानंतर २० जानेवारीचे सत्तांतर सुरळीत होईल, असे अनिच्छेने का होईना ट्रम्प यांनी जाहीर केले. मात्र, हा निकाल आपल्याला मान्य नाही, हे त्यांचे पालुपद कायम आहे. पुढचा पेच टळला; पण अमेरिकी लोकशाहीची व्हायची ती शोभा झालीच. ‘माझी अमेरिका महान’ असे म्हणणाऱ्या नेत्यामुळे ती झाली, हा आणखी एक विरोधाभास.  

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ट्रम्प यांची कारकीर्द आणि २०२०ची अध्यक्षीय निवडणूक, यांतून या महासत्तेला अनेक धडे शिकायला मिळाले आहेत. व्यक्ती स्वतःला व्यवस्थेपेक्षा मोठी मानू लागली, की कोणत्या थरापर्यंत जाऊ शकते, याचे उदाहरण ट्रम्प यांनी घालून दिले. सवंग लोकप्रिय कार्यक्रम हाती घेऊन ते लाटेवर स्वार झाले आणि ‘अमेरिका फर्स्ट’चा धोशा लावला. आपल्या प्रश्‍नांना जबाबदार ठरविण्यासाठी कुणीतरी ‘शत्रू’ मिळाला, की अनेकांना हायसे वाटते. याचे कारण आपल्या समस्या तीव्र होण्यात आपलीही काही जबाबदारी आहे, या ताणातून मुक्तता होते. अशा तऱ्हेच्या मुक्ततेच्या धारणेला ट्रम्प खतपाणी घालत राहिले आणि ते करताना सर्व संस्था, संकेत, पारंपरिक मूल्ये आणि लोकशाहीत अभिप्रेत असलेली पथ्ये पायदळी तुडवत राहिले. स्थलांतरितांपासून ते जगातील विविध देशांपर्यंत अनेक ‘शत्रू’ त्यांनी शोधून काढले. कोणत्याही प्रगत लोकशाहीत प्रत्येक नियम, कायदा लिखित स्वरूपात नसतो. काही गोष्टी अध्याहृत असतात. ट्रम्प यांनी या पायाभूत गृहीतकांनाच हरताळ फासला.  त्यामुळे ते स्वतः या सगळ्या अरिष्टाला कारणीभूत आहेत, यात शंकाच नाही. पण, ट्रम्प नावाचा एक विक्षिप्त माणूस या सगळ्याला कारणीभूत आहे, असे म्हणून त्यांच्या पक्षाला, समर्थकांना यातून स्वतःची सुटका करून घेता येणार नाही. सत्ता आणि त्यातून उफाळणाऱ्या अहंकाराचा ट्रम्प हा चेहरा आहे. पण, एखाद्या पोकळीत तो अचानक पुढे आला, असे घडत नसते. गेल्या किमान तीन दशकांपासून अमेरिकी राजकारणाचा स्तर घसरतो आहे. रिपब्लिकन पक्षात काही मवाळ व उदारमतवादी असले तरी फार मोठा घटक प्रतिगामी म्हणावा अशा कार्यक्रमाचा पुरस्कर्ता आहे. कमालीची आक्रमकता, गन कंट्रोल कायद्यांना विरोध, गर्भपाताला विरोध, अशी त्यांची भूमिका असते. धार्मिक सिद्धांतांशी मेळ खाणारा नसल्याने डार्विनचा उत्क्रांतिवाद महाविद्यालयांमधून शिकवला जाऊ नये, अशी भूमिका घेणाऱ्यांचा भरणा प्रामुख्याने याच पक्षात आहे. तेव्हा अशा पर्यावरणातून वेगळे काय उगवणार? त्या पक्षातील काही सुजाण व्यक्तींनी पुढे येऊन पक्षांतर्गत पातळीवर मंथन घडविले तर भविष्यात कदाचित वेगळे चित्र दिसेल. ज्यो बायडेन यांच्यापुढेही देशापुढच्या विविध समस्यांबरोबरच अमेरिकेची प्रतिमा सावरण्याचे आव्हान आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 आशिया-आफ्रिकेतील अनेक देशांमध्येही निवडणूक निकालानंतर शांततेत सत्तांतर होते. यातल्या अनेक देशांना अमेरिकी नेते ऊठसूट लोकशाहीचे धडे देत असतात. आपल्याला तो नैतिक अधिकार आहे, हे या नेत्यांनी गृहीत धरलेले असते. ‘कॅपिटॉल हिल’ येथे म्हणजे कायदेमंडळाच्या वास्तूत घुसून हिंसक निदर्शने करणाऱ्या जमावाने आणि त्यांना चिथावणाऱ्या ट्रम्प यांनी त्या अमेरिकी अहंतेला जबर तडाखा दिला आहे,असे म्हणता येईल. या सगळ्यातून अमेरिकी सत्ताधारीच नव्हे तर एकूण राजकीय वर्ग काय बोध घेणार, हा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. त्याचे उत्तर नव्या सरकारच्या कामगिरीतून मिळण्याची अपेक्षा आहेच; पण अमेरिकेच्या एकूण राजकीय वर्तनव्यवहारावरही ते अवलंबून असेल.

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

loading image