अग्रलेख : ...फिर से दिया जलाएं!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 November 2020

आजच्या लक्ष्मीपूजनाच्या वेळी आठवण ठेवावी लागणार आहे, ती अशा दीप मावळलेल्या घरांची आणि आपल्या घरात दिव्यांची आरास करताना, ‘आओ, फिर से दिया जलाएं’ म्हणत त्यांच्याही घरात आशेचा दीप तेवत राहील, याची काळजी घेण्याची.

यंदाची दिवाळी ही शतकानुशतकातील आगळीवेगळी दिवाळी आहे. यंदा हे तेजाचे प्रकाशपर्व कोरोनाच्या मळभाखाली काहीसे झाकोळले गेले आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गेल्या मार्चमध्ये देशभरात जारी करणे भाग पडलेल्या ठाणबंदीच्या बेड्यांतून आता काहीशी मुक्तता झाली असली आणि बऱ्याचशा प्रमाणात दैनंदिन व्यवहार सुरूही झाले असले, तरी अंतर्मनावरील कोरोनाची काळोखी कायमच आहे. दीपावलीत घराघरांत लक्षावधी दीप उजळले जातात. पण, या आठ महिन्यांत अनेक घरांतील दीप मालवले गेले आहेत. त्यामुळे आजच्या लक्ष्मीपूजनाच्या वेळी आठवण ठेवावी लागणार आहे, ती अशा दीप मावळलेल्या घरांची आणि आपल्या घरात दिव्यांची आरास करताना, ‘आओ, फिर से दिया जलाएं’ म्हणत त्यांच्याही घरात आशेचा दीप तेवत राहील, याची काळजी घेण्याची. त्यामुळेच लक्ष्मीपूजन आज असले, तरी कोरोनाकाळात नानाविध आपत्तींना सामोरे जावे लागलेल्या घराघरांत आशेचा किमान एक किरण तरी यावा; म्हणूनच धनत्रयोदशीचा मुहूर्त साधत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेचा तिसरा टप्पा जाहीर केला आहे. आज कोरोनाकाळातील सारे निर्बंध बाजूला सारून अनेक बाजारपेठा गर्दीने फुलून गेलेल्या दिसत आहेत. मात्र, गुढीपाडव्यापासून थेट गणेशोत्सवापर्यंत या बाजारपेठांना ठाणबंदीमुळे टाळेच होते. मोठ्या कंपन्यांमधील उत्पादनाला ब्रेक लागला होता. छोटे उद्योगधंदे तर बंदच पडले होते. या साऱ्याची अपरिहार्य परिणती अर्थातच अनेकांचे रोजगार जाण्यात झाली होती. अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या नव्या पॅकेजमुळे वेगवेगळ्या २६ क्षेत्रांत रोजगारनिर्मितीला प्रोत्साहन मिळू शकते. कोरोनाकाळात बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळलेल्या हातांना पुन्हा कामही मिळणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह योजनेशी संलग्न आस्थापनांमध्ये १५ हजारांपर्यंत वेतन असलेल्या नव्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल, असा अर्थमंत्र्यांचा दावा आहे. दिवाळीच्या ऐन तोंडावर जाहीर झालेल्या केंद्र सरकारच्या या पॅकेजची व्याप्ती अपेक्षेपेक्षा मोठी आहे. त्यात कोरोना प्रतिबंधक लस संशोधनासाठी ९०० कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे; त्याचबरोबर ग्रामीण रोजगारवाढीसाठीही अतिरिक्त १० हजार कोटी उपलब्ध करून दिले आहेत. कोरोनाने आणलेले मळभ किमान काही प्रमाणात दूर होण्यास यामुळे निश्‍चितच हातभार लागू शकतो.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आपल्या देशात दीपावलीचा हा सण साजरा होऊ लागला, त्यास काही हजार वर्षांचा कालावधी लोटला आहे. पुराणांमध्ये सणांच्या या राजाचे नाते कुठे प्रभू रामचंद्र रावणाचा वध करून अयोध्येत परतले, तेव्हाच्या दीपोत्सवाशी जोडले गेले आहे. तर, कुठे कृष्णाने केलेल्या नरकासुराच्या वधाशी या सणाचे माहात्म्य गुंतविण्यात आले आहे. एक खरे की राम, कृष्ण, लक्ष्मी, यम, हनुमान अशा आपल्या संस्कृतीतील विविध देवदेवतांचे पूजन आपण या पाच दिवसांत करत असतो. त्यापलीकडली बाब म्हणजे, प्रांतागणिक दिवाळीचे रीतिरिवाज बदलतात. कोठे वसुबारसेच्या दिवशी गोमातेची पूजा होते, तर कोठे थेट वाघबारसच साजरी होते. या विविधतेतील एकतेचा खरा अर्थ आहे तो सर्वसमावेशकतेचा. विविध जाती-धर्म, दर १२ कोसांवर बदलणारी भाषा आणि तेथील प्रथापरंपरा या साऱ्यांना सामावून घेणारा हा महोत्सव आहे, हेच खरे. त्यामुळे लाखोंची जायदाद असलेली घरे उत्साहाने हा सण साजरा करतात, यात नवल नाही! पण, ज्यांच्या डोक्‍यावरच छप्पर नाही, अशी कुटुंबेही काही तरी गोडाधोडाचे करता येईल का आणि अंगाला नवी कापडे लागतील का, याचाच विचार करतात. तेव्हा यंदाच्या या सर्वसमावेशक आणि सार्वजनिक महोत्सवात अशा वर्गाचा विचार प्राधान्याने करायला हवा. ते करताना कोरोनाकाळातील नियमावलीची सूत्रे जिवापाड जपायला हवीत. गणेशोत्सवात ठाणबंदीचे नियम शिथिल झाले आणि लगोलग बाधितही वाढत गेले. त्यामुळेच, या उत्सवात कोरोनाबाबत योग्य ती काळजी आपल्याला घ्यावी लागेल; अन्यथा पुनश्‍च एकवार घरांतच बसून राहण्याची वेळ येऊ शकते. ते आपल्याला व्यक्तिश:च नव्हे, तर कौटुंबिक तसेच सामाजिक आणि आर्थिक पातळीवरदेखील न परवडणारे आहे. याचे कारण म्हणजे, निर्मला सीतारामन यांनी नवे पॅकेज जाहीर केले, त्याच दिवशी रिझर्व्ह बॅंकेने भारताच्या इतिहासात प्रथमच तांत्रिकदृष्ट्या आर्थिक मंदी नोंदवली गेल्याचा धक्कादायक निष्कर्ष जाहीर केला आहे. त्यामुळेच, एकीकडे मंदीच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी अटीतटीची झुंज असतानाच, कोरोनाचे संकट आणणे आपल्याला आणखी चार पावले मागे घेऊन जाणारे आहे. म्हणूनच, सुरक्षित अंतर व मास्कचा वापर, हे सूत्र अंगीकारलेच पाहिजे. यंदाची ही दिवाळी त्यामुळेच कविहृदयाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंक्तींची आठवण करून देते. ते म्हणाले होते : ‘वर्तमानकाल के मोहजाल में, आनेवाला कल न भुलाएं... आओ, फिर से दिया जलाएं!’

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article about this year Diwali is the most unique Diwali of the century