esakal | अग्रलेख : ‘अमेझॉन’च्या जंगलातील सिंह!
sakal

बोलून बातमी शोधा

MGM

अग्रलेख : ‘अमेझॉन’च्या जंगलातील सिंह!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

‘एमजीएम’चा घास घेण्यासाठी ‘सोनी’, ‘ॲपल’ टीव्ही आदी प्रबळ कंपन्यांनी प्रयत्नही केले; पण बाजी मारली ‘अमेझॉन’ने. या व्यवहारात मनोरंजनाचा भविष्यकाळ बीजरुपाने दडलेला आहे. आशय ही बहुमोल चीज आहे. त्याची किंमत ग्राहक म्हणून आपल्याला मोजावी लागेल.

इंग्रजी चित्रपट सुरु होण्यापूर्वी ‘मेट्रो गोल्डविन मेयर स्टुडिओ’च्या बोधचिन्हातला तो सुविख्यात सिंह गर्जना करु लागे आणि थिएटरातला गोंधळ, कुजबूज वगैरे बंद होई. तो क्षण कित्येक रसिक पिढ्यांना मनात कोरला गेला असेल. मेट्रो गोल्डविन मेयर ऊर्फ एमजीएम स्टुडिओचा हॉलिवुडच्या चंदेरी दुनियेतला दबदबा, तो वनराज जणू साऱ्या जगाला ओरडून सांगत असे. कालौघात हॉलिवुडमधल्या चित्रनिर्मितीतील स्टुडिओ पद्धती नष्टप्राय होत गेली. काळाची पावले ओळखून स्टुडिओंनी आपले रंगरुप आणि चरित्र बदलले. ‘एमजीएम’चेही तेच झाले. तोच ऐतिहासिक ‘ग्लॅमरसिंह’, गेल्या मंगळवारी ‘अमेझॉन’ या महाबलाढ्य ओटीटी (ओव्हर द टॉप) कंपनीने चक्क साडेआठशे कोटी डॉलर किंमतीला विकत घेऊन टाकला.

‘अमेझॉन’चा संस्थापक आणि जगाच्या इ-व्यापाराची दिशा बदलून टाकणारा द्रष्टा उद्योजक जेफ बेझोस याने जाता जाता ‘एमजीएम’चा वनराज आपल्या आभासी प्राणीसंग्रहालयात नेऊन ठेवला. वास्तविक संस्थापक जेफ बेझोसने आता अमेझॉनचे प्रमुखपद सोडल्यात जमा आहे. येत्या पाच जुलैला एण्डी जॅस्सी हे ‘अमेझॉन’च्या प्रमुखपदाची सूत्रे अधिकृतरीत्या हाती घेतील, पण जाता जाता बेझोसने एक कीर्तीवान सिंह गट्टम केला, अशीच इतिहासात नोंद होईल. एमजीएम आणि अमेझॉन यांच्यातील या महा-व्यवहाराचे एवढे काय महत्त्व? असा प्रश्न कोणालाही पडेल. परंतु, या व्यवहारात मनोरंजनाचा भविष्यकाळ बीजरुपाने दडलेला आहे, हे लक्षात घ्यायला हवे. आशय ही बहुमोल चीज आहे. त्याची किंमत ग्राहक म्हणून आपल्यालाच मोजावी लागणार आहे.

एकेकाळी पुस्तके ही ज्ञान आणि मनोरंजनाची भूक भागवत होती. त्याची जागा नंतर रेडिओ- टीव्हीने घेतली. आता ओटीटी आणि अन्य माध्यमे शिरजोर होताना दिसतात. या स्थित्यंतरांत एक मूलभूत गोष्ट अढळ राहिली, ती म्हणजे कंटेंट-आशय. ‘कंटेंट इज न्यू ऑइल…म्हणजेच आशय हे नवे नैसर्गिक तेल आहे’ अशा अर्थाचा एक सुविचार आंतरराष्ट्रीय व्यवहारांच्या ऊहापोहात नेहमी वापरला जातो. ‘एमजीएम’ ही अशीच मनोरंजनरुपी तेलसाठा अजूनही शिल्लक असलेली एक जुनी विहीर आहे. या ऐतिहासिक स्टुडिओवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली असली, तरी चार हजाराहून अधिक चित्रपट आणि तब्बल १७ हजार तासांच्या मनोरंजनपर कार्यक्रमांचा बहुमोल खजिनाही आहे. प्रसिध्द गुप्तहेर जेम्स बॉण्डचे चित्रपट, सिल्वेस्टर स्टॅलनची ‘रॉकी’ चित्रपट मालिका, ‘सायलेन्स ऑफ द लॅम्ब्ज’, ‘रेजिंग बुल’, ‘ट्वेल्व अंग्री मेन’ किंवा ‘फार्गो’, ‘हॅडमेड्स टेल’सारख्या ओटीटी मालिका अशा चित्रकृतींचा खजिना ‘एमजीएम’च्या पेटाऱ्यात आहे. ‘अमेझॉन’ने त्याची ताकद ओळखली. दोन दशकांपूर्वी पुस्तके ऑनलाइन विकण्याचा नेमस्त व्यवसाय करणाऱ्या जेफ बेझोस नामक तरुणाने पुढे विक्रीची व्याप्ती वाढवली. आता ‘अमेझॉन’वर पायजम्याच्या नाडीपासून आलिशान मोटारीपर्यंत काहीही विक्रीस उपलब्ध आहे, हे आपण सारे जाणतोच. ‘एमजीएम’ गिळंकृत केल्यामुळे ‘ओटीटी’च्या क्षेत्रातही ‘अमेझॉन’ने आता आपली नखे घट्ट रोवली आहेत, असे म्हणायला हवे. या क्षेत्रात नेटफ्लिक्स, डिस्नी, सोनी एंटरटेन्ममेंटसारखे आणखी बरेच तालेवार खेळाडूही आपापले वर्चस्व राखून आहेत. ॲपल टीव्हीनेही आता ‘ओटीटी’ मंचाच्या खेळात उडी घेतली आहे. ही स्पर्धा आहे, आशया (कंटेंट) साठी. ज्याच्यापाशी विक्रीयोग्य आशयाचा साठा, त्याच्याकडे जणू त्रैलोक्याचे स्वामित्त्व चालून येते. त्यासाठी या महाबलाढ्य कंपन्या वाटेल तेवढा पैसा ओततात, स्वत: चित्रनिर्मिती, मालिकांची निर्मितीही करतात. अशा स्पर्धात्मक वातावरणात ‘एमजीएम’चा सिंह ‘अमेझॉन’ने पिंजऱ्यात पकडला. त्यामुळे या खेळाचे नियम काहीसे बदलून गेले.

अर्थात, साडेआठ अब्ज डॉलर टाकले की स्टुडिओच्या चाव्या हातात आल्या, इतके हे प्रकरण सोपे नाही. ‘एमजीएम’च्या मालकीच्या अनेक जुन्या अभिजात चित्रपटांना याअगोदरच इंटरनेटवर पाय फुटले आहेत. याशिवाय पायरसी, बेकायदा प्रदर्शन अशा अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत ‘अमेझॉन’ला आपला मालकी हक्क प्रस्थापित करावा लागणार आहे. नव्या स्पर्धात्मक जगात ‘बळी तो कान पिळी’ हाच आदिम नियम लागू असतो. त्यानुसार कर्जबाजारी ‘एमजीएम’चा घास घेण्यासाठी सोनी, ॲपल टीव्ही आदी प्रबळ कंपन्यांनी प्रयत्नही केले; पण बाजी मारली ‘अमेझॉन’ने. एकूण साडेसहाशे कोटी डॉलरचा हा व्यवहार आहे. पण ‘एमजीएम’च्या डोक्यावर सुमारे सव्वादोनशे कोटी डॉलरचे कर्ज होते, तेदेखील अमेझॉनने शिरावर घेण्याचे ठरवले, म्हणून हा व्यवहार पार पडला. या व्यवहारामुळे ग्राहक म्हणून आपल्याला लाभ काय? हाही विचारात घेण्याजोगा प्रश्न आहे.

‘एमजीएम’चा खजिना आता ‘अमेझॉन’कडे आला, म्हणजे घरबसल्या आपल्याला भारी भारी चित्रपट आणि मालिका बघायला मिळणार, असे ‘प्राइम व्हिडिओ’च्या ग्राहकांना वाटत असेल तर…तिथे थोडी अडचण आहे! कारण या खजिन्याचा नेमका उपयोग कसा करायचा,हे ‘अमेझॉन’ने अजूनही गुलदस्त्यातच ठेवले आहे. याचा अर्थ इतकाच की भविष्यात या प्रत्येक मनोरंजक गोष्टीसाठी ग्राहकांना वेगवेगळे पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. कारण ‘अमेझॉन’ने केलेली ही भलीमोठी गुंतवणूक शेवटी ग्राहक म्हणून आपल्याच खिशातून वसूल केली जाणार, हे उघड आहे. ‘एमजीएम’चा तो प्रसिद्ध सिंह अमेझॉनच्या जंगलात अदृश्य झाला, त्याच्या आठवणी तेवढ्या फुकट आहेत.

loading image