esakal | अमेरिकी तंबूत रशियन उंट
sakal

बोलून बातमी शोधा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन

यंदा होणाऱ्या अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाच्या हस्तक्षेपाचा धोका असल्याचा संशय खुद्द ‘एफबीआय’ने व्यक्त केला आहे. ‘एफबीआय’चे संचालक ख्रिस्तोफर रे यांनी हा इशारा दिला असून, संभाव्य रशियन हस्तक्षेप रोखण्यासाठी विशेष अधिकारी नेमत असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. ही बाब गंभीर आहे.

अमेरिकी तंबूत रशियन उंट

sakal_logo
By
अनंत गाडगीळ

२०१६ च्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाने कसा गुप्तपणे हस्तक्षेप केला, याबाबतची माहिती गेल्या काही महिन्यांपासून उजेडात येऊ लागली आहे. यंदाच्या अध्यक्षीय निवडणुकीतही हा धोका आहे.

यंदा होणाऱ्या अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाच्या हस्तक्षेपाचा धोका असल्याचा संशय खुद्द ‘एफबीआय’ने व्यक्त केला आहे. ‘एफबीआय’चे संचालक ख्रिस्तोफर रे यांनी हा इशारा दिला असून, संभाव्य रशियन हस्तक्षेप रोखण्यासाठी विशेष अधिकारी नेमत असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. ही बाब गंभीर आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

२०१६च्या निवडणुकीतील या प्रकारच्या आरोपांची चर्चा विरली नसतानाच आता आगामी निवडणुकीतही तोच प्रकार घडण्याची शक्‍यता आहे, असा याचा स्पष्ट अर्थ. त्यामुळे आता अमेरिकी गुप्तचर व तपास यंत्रणा जागरूक झाल्या आहेत. 

एकीकडे राष्ट्रवादाच्या गर्जना करीत वातावरण आपल्याला अनुकूल कसे होईल, यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची धडपड सुरू आहे. त्याचवेळी अनेक माध्यमे ट्रम्प यांच्या गेल्यावेळच्या निवडणुकीत रशियाने कशी लुडबूड केली, याच्या कहाण्या चव्हाट्यावर आणत आहेत. ‘अमेरिकेला महान बनवू’, असा राष्ट्रवादी सूर प्रचारात लावणाऱ्या ट्रम्प यांना अमेरिकेच्या निवडणुकीत दुसऱ्या देशाची लुडबूड कशी काय खपते, असा प्रश्‍न साहजिकच विचारला जाणार. तसा तो उपस्थित होतही आहे.

सुरवातीला असे काही झालेच नाही, असा आव त्यांनी आणला होता. नंतर त्यांनी काही गोष्टी घडल्याचे कबूल केले. आता महाभियोगाला सामोरे जाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहेच; परंतु हे एकूणच प्रकरण गंभीर आहे. केवळ अमेरिकेतच नव्हे तर जगातील अनेक देशांवर ज्या सत्ताधीशाच्या धोरणांचा परिणाम होत असतो, तेथील निवडणूक प्रक्रिया आणि व्यवस्था एवढी धोकाप्रवण असावी, हे धक्कादायक आहे.

त्यामुळेच `अगा जे घडलेचि नाही,’ असे दाखवण्याचा प्रयत्न ट्रम्प समर्थक करीत असले तरी जे तपशील समोर आले आहेत, ते या दाव्याला सुरूंग लावणारे आहेत.
ट्रम्प निवडून आल्यापासूनच रशियाने निवडणूक प्रक्रियेत छुपा हस्तक्षेप केल्याचा संशय अमेरिकी राजकीय वर्तुळात व्यक्त होत होता. हिलरी क्‍लिंटन यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाचे अधिकृत संकेतस्थळच ‘हॅक’ झाल्याची चर्चाही त्या वेळी कुजबुजीच्या रूपात होती. मात्र मारिया बुरीनासारख्या काही रशियन गुप्तहेरांना अमेरिकेत अटक होताच रशियाचा हस्तक्षेप हळूहळू उघड होऊ लागला. शिवाय गेल्या वर्षभरात ‘वॉशिंग्टन पोस्ट’ चे ज्येष्ठ पत्रकार बॉब वूडवर्ड यांचे ‘फिअर’ आणि क्रेग उंगर यांचे ‘हाउस ऑफ ट्रम्प, हाउस ऑफ पुतिन’ यासारखी पुस्तके प्रसिद्ध झाली आणि रशियाच्या भूमिकेवर लख्ख प्रकाश पडला. ट्रम्प आणि रशियाचे संबंध केवळ त्यांच्या बांधकाम व्यवसायापुरते मर्यादित आहेत, असा अमेरिकी जनतेचा समज होता.

मात्र एकापाठोपाठ गोष्टी बाहेर येऊ लागताच त्याला समजाला तडा जाऊ लागला. निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी रशियातील एक नागरिक कॉन्स्टनटीन रायकोत यांनी, ‘ट्रम्प यांच्या विजयाला आमचा दोघांचा हातभार आहे,’ असे समाजमाध्यमांवर जाहीर केले. रायकोव कोणी सर्वसामान्य नागरिक नव्हते. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या ‘किचन कॉबिनेट’चे ते जणू सदस्यच. यातील दुसरी व्यक्ती म्हणजे रशियातील करोडपती आरतेम क्‍लीशीन.वास्तविक २०१५च्या जूनमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार असल्याचे ट्रम्प यांनी अधिकृतपणे जाहीर केले होते; पण त्याच्या दोन-तीन वर्षे अगोदरच ट्रम्प यांच्या निवडणुकीची तयारी रशियाने पडद्यामागून सुरू केली होती.

रशियाच्या गुप्तचर खात्याशी संबंधित अलेक्‍झांडर वॉरशिन व मारिया बुतीना यांना रशियाने अगोदरच अमेरिकेत पाठविले होते. अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षात कार्यकर्ते म्हणून शिरकाव करून रशियनधार्जिणे धोरण प्रचारात राबवायचे, अशी जबाबदारी या दोघांवर पुतिन यांनीच सोपविली होती, असे म्हणतात. ट्रम्प यांच्या प्रचाराचा अर्धा भार त्यांचे जावई जेराड कुशनर यांनी सांभाळला होता. कुशनर यांनी वादग्रस्त इंग्लिश कंपनी ‘केंब्रिज ॲनालिटिका’ला गुप्तपणे प्रचारपूर्व सर्वेक्षणासाठी नेमले. ट्रम्प यांची वाखाणणी करणाऱ्या बातम्या पसरविणे, प्रत्येक मतदाराची माहिती गोळा करणे, रोज ४० ते ५० हजार जाहिराती वेगवेगळ्या रूपात प्रसिद्ध करणे, अशी कामे ही केंब्रिज कंपनी करीत होती. एक गोष्ट नक्की की ‘केंब्रिज’ने अप्रत्यक्षपणे इतका प्रचंड धुरळा प्रचारात उडवून दिला, की शेवटी प्रत्येकी दहा मतदारांपैकी पाच-सहा मतदारांची ट्रम्प यांना पसंती, तर क्‍लिंटन यांना केवळ एक-दोन मतदारांचीच पसंती अशी परिस्थिती निर्माण झाली. निवडणुकीत वेगवेगळे अंतःप्रवाह कशारीतीने कार्यरत असतात, हेच यातून प्रतीत होते.  

रशियन हॅकरचे काम
ट्रम्प यांच्या विजयाच्या काही आठवड्यांनंतर रशियन हस्तक्षेपाच्या बातम्या उघड होऊ लागल्या, त्यासोबत केंब्रिज कंपनीच्या कारवायाही बाहेर येऊ लागल्या. या कंपनीचे कर्मचारी प्रा. अलेक्‍झॅडर कोशन यांनी त्यांच्या संगणक जाळ्याची अशी व्यवस्था केली होती, की रशियन लोकांना त्यामधील माहिती गुप्तपणे पाहता येईल.

यशाच्या धुंदीत कंपनीचा मुख्याधिकारी अलेक्‍झांडर निकस पत्रकाराजवळ बोलून गेला, की प्रचारात ट्रम्प-विरोधकांना लाच द्यायची, वेळप्रसंगी स्त्रियांशी संगत करायला लावायची, त्याचे गुप्तपणे चित्रीकरण करायचे अशी योजना आखण्यात आली होती.

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत ट्रम्प कंपनीच्या रशियातील बांधकाम प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी सेरगाई मिलियान यांनी प्रसिद्ध अमेरिकी पत्रकार जॉर्ज स्टेपनोपोलस यांना एक रशियन ऊर्जा कंपनीचे जनसंपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती स्वीकारणार काय, अशी विचारणा केली. पगार किती तर महिना चक्क २१ लाख रुपये. खरे काम काय तर ट्रम्प यांची निवडणूक हाताळायची! भरीस भर हिलरी क्‍लिंटन यांना आलेले शेकडो ई-मेल अचानक गायब झाले. क्‍लिंटन यांच्या डेमोक्रेटिक पक्षाच्या राष्ट्रीय समितीच्या संकेतस्थळातून हजारो संगणक फाइल नष्ट झाल्या. ‘एफबीआय’ व गुप्तचर खात्याने शोध घेण्याचा कसून प्रयत्न केला. संगणक क्षेत्रातील तज्ज्ञ बोलावले व अखेरीस हे रशियन हॅकरचेच काम असल्याचे अनुमान काढण्यात आले.

ट्रम्प यांच्या प्रचारदरम्यानचे परराष्ट्र धोरणविषयक सल्लागार व ‘पेंटेगॉन’चे माजी प्रवक्ते जे गॉर्डन व रशियाचे अमेरिकेतील तत्कालीन राजदूत सरेगी किसलयाक या दोघांमध्ये गुप्त बैठका झाल्याचेही कालांतराने बाहेर आले. जन्माने रशियन, पण अमेरिकेत स्थायिक असलेले एक बडे प्रस्थ सायमन कूक्‍स यांनी, तर ट्रम्प यांच्या निवडणूक निधीला विविध पद्धतीने दीड कोटी रुपयांचा वैयक्तिक निधी दिला होता.

डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या तीन दिवस अगोदर त्यांच्याच संगणकातून ‘हॅक’ केलेले वीस हजार ई-मेल ‘विकिलिक्‍स’ने उघड करीत एक धक्का दिला. निवडणूकपूर्व काळात तर अलेक्‍झांडर कोगन या संगणकतज्ज्ञाने पाच कोटी मतदारांची माहिती ‘फेसबुक’द्वारा संकलित केली. उद्देश हा की यातील कोण मतदार ट्रम्प यांच्याविरोधी जाण्याची शक्‍यता आहे हे हुडकून काढणे. अमेरिकेतील लोकशाही प्रक्रिया जनमानसात कमकुवत करायची व हिलरी क्‍लिंटन यांच्या प्रतिमेभोवती संशयाचे जाळे उभे करायचे, असा प्रयत्न केला गेला. त्यासाठी छुपी यंत्रणा उभारण्याचे आदेश खुद्द रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनीच दिले, या निष्कर्षाला आपण आलो असल्याचा अहवाल अमेरिकेची गुप्तचर संघटना- ‘सीआयए’, राष्ट्रीय गुन्हे शोध संघटना- ‘एफबीआय’ व राष्ट्रीय सुरक्षा मंडल यांनी एकत्रितपणे दिला. डेमोक्रॅटिक पक्षाच्या संपूर्ण संगणक जाळ्यावर रशियन हेरांनी पाळत ठेवली होती, असाही निष्कर्ष या संघटनांनी काढला. 

अमेरिकी अध्यक्षपदाची २०१६ची निवडणूक अमेरिकी लोकांनी हाताळली की रशियन राज्यकर्त्यांनी गुप्तपणे हाताळली? रशियाचा हस्तक्षेप ट्रम्प यांना माहीत होता की नकळत होता, यांसारख्या प्रश्‍नांची उत्तरे मिळायला हवीत. अमेरिकी महासत्ता तिसऱ्या जगातील छोट्या-मोठ्या देशांत लुडबूड करते,याविषयीचा तपशील अनेकदा बाहेर आला होता; परंतु खुद्द महासत्तेच्या निवडणुकीत दुसऱ्या देशाने ती भूमिका पार पाडणे हे धक्कादायक आहे. अमेरिकी लोकशाहीपुढे असलेले आव्हानच त्यामुळे समोर येते.

loading image