esakal | अग्रलेख : काँग्रेसकथा...
sakal

बोलून बातमी शोधा

अग्रलेख : काँग्रेसकथा...

एकेकाळी देशावर सत्ता गाजवणारा, जनमानसात पाळेमुळे रुजलेला हा राजकीय पक्ष अवघ्या सहा वर्षांत आपली पुरती रया घालवून बसावा, अपयशाची मालिका थांबवण्याची ऊर्मीही त्याच्यात उरू नये, हे लोकशाही व्यवस्थेसाठी काही चांगले लक्षण नाही.

अग्रलेख : काँग्रेसकथा...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

वारंवार नापास होणाऱ्या विद्यार्थ्याला पुढे पुढे परीक्षेचे आणि निकालाच्या दिवसाचे काहीच वाटेनासे व्हावे, तशी काहीशी अवस्था सध्या काँग्रेस पक्षाची झालेली दिसते. या विद्यार्थ्याला ना अभ्यासात रस उरला आहे, ना परीक्षेत, ना निकालात आणि ना भविष्यातील उत्कर्षात. एकेकाळी देशावर सत्ता गाजवणारा, जनमानसात पाळेमुळे रुजलेला हा राजकीय पक्ष अवघ्या सहा वर्षांत आपली पुरती रया घालवून बसावा, अपयशाची मालिका थांबवण्याची ऊर्मीही त्याच्यात उरू नये, हे लोकशाही व्यवस्थेसाठी काही चांगले लक्षण नाही. लोकशाहीत प्रबळ विरोधी पक्षाचे महत्त्व वेगळे सांगायची गरज पडू नये. एका राष्ट्रीय पक्षाची दिसामासाने लक्तरे निघावीत आणि त्यातील श्रेष्ठींना त्याचे काही वाटू नये, हीच खरी शोकांतिका ठरते. ती त्या पक्षाचीच नव्हे, तर लोकशाही व्यवस्थेचीही करुण कहाणी ठरते.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काँग्रेस पक्षाचा जीर्णोद्धार कधी होणार, या चिंतेने अनेक राजकीय पंडित, विरोधी पक्षांतील सहकारी नेते आणि खुद्द काँग्रेसचे कार्यकर्ते सचिंत झालेले दिसत असले; तरी काँग्रेस पक्षश्रेष्ठींची झोप अजूनही पुरी झालेली दिसत नाही, ही बाब सर्वांत अनाकलनीय आहे. नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत आणि अन्य पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसची दैना उडाली. भारतीय जनता पक्षाच्या भरीव यशापेक्षा काँग्रेसचे पतन अधिक नजरेत भरण्याजोगे ठरले. या पराभवानंतर उपचाराखातर का होईना, काँग्रेसमध्ये आत्मचिंतनसदृश काहीतरी घडेल, अशी अपेक्षा होती. पण, नेमके उलटे चित्र दिसते. माध्यमांमध्ये ठळकपणे गाजताहेत ते पक्षातील नेत्यांनी एकमेकांवर केलेले हेत्त्वारोप आणि चिंतनशीलतेचा संपूर्ण अभाव हेच. याला आत्मवंचना म्हणणेच योग्य. काँग्रेसचे खासदार आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी, ‘लोकांना आमच्याकडून काही अपेक्षाच उरलेल्या नाहीत आणि बिहारमधील पराभवाची घटना पक्षश्रेष्ठींना सामान्य वाटत असली पाहिजे,’ अशा शेलक्‍या शब्दांत घरचा आहेर दिला. त्यानंतर काँग्रेसी नेत्यांनी पक्षश्रेष्ठींना अप्रत्यक्ष बोल लावणाऱ्या सिब्बलादी नेत्यांना फटकारून श्रेष्ठीनिष्ठादेखील सिद्ध केली. पराभवाच्या चिंतनासाठी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी सल्लागारांची ऑनलाइन बैठक मंगळवारी बोलावली होती. परंतु, या बैठकीला त्या स्वत:च अनुपस्थित राहिल्या. सल्लागारदेखील धड जमले नाहीत. पक्षाध्यक्षपदाची सूत्रे ज्यांच्या हाती जावीत, यासाठी काँग्रेसमधील काही तरुण तुर्क सदैव सक्रिय असतात; त्या राहुल गांधींनी निवडणुकीच्या काळातही फारसे गांभीर्य दाखविले नाही. सगळे पक्ष जेव्हा बिहारमध्ये झडझडून कामाला लागले होते, तेव्हा राहुल आपल्या बहिणीच्या-प्रियांका गांधी यांच्या हिमाचल प्रदेशातील शेतघरात विश्रांतीला जाऊन बसले. राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव यांनी प्रचारात रान उठविले, त्याचे भरभरून दानदेखील मतांच्या स्वरूपात त्यांना मिळाले. त्याचवेळी त्यांच्यासोबत गठबंधनात असलेल्या राहुल गांधी यांनी जेमतेम सात-आठ प्रचार सभा उरकल्यासारख्या घेतल्या. हे सारे कशाचे द्योतक आहे?

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दुर्बल होत गेलेला रुग्णाईत अनवधानाने दिसेल तेथे आधाराचा हात शोधत असतो, तशी ही अवस्था. स्वबळावर निवडणुका जिंकता येणे अशक्‍य झाल्यावर अन्य समविचारी पक्षांची मोट बांधून राजकारण साधणे, ही लोकशाहीची सर्वमान्य रीत झाली. परंतु, ही क्षमता तरी काँग्रेसकडे उरली आहे काय? हा खरा प्रश्न आहे. राष्ट्रापुढील समस्या दिवसेंदिवस उग्र रूप घेत असताना काँग्रेसमधील वैचारिक गोंधळ आणि धोरणात्मक अस्पष्टता त्यात भरच घालणाऱ्या बाबी ठरतात, हे खरे दुखणे आहे. याही निवडणुकीत नेहमीप्रमाणे काँग्रेसच्या अपयशाचे खापर गांधी परिवार आणि विशेषत: राहुल यांच्या माथी फोडले गेले. ‘काँग्रेसचे कुठे चुकते आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे,’ असे सिब्बल म्हणाले. त्यांचा रोख कुठे होता, हे सगळ्यांना कळले. सिब्बल यांच्यासारखी परखड मते नोंदविणारे आणखी किमान २३ नेते काँग्रेसमध्ये आहेत; त्यांच्या मताला पक्षश्रेष्ठी किंमत देत नाहीत, हेही सत्यच आहे. पण, असे किती दिवस चालणार? गांधी परिवार या वरदानाचे आता शापात रूपांतर झाले आहे, असे काँग्रेसजनांना वाटू लागले असेल, तर तसे स्पष्टपणे नोंदवून त्यांनी नव्याने सुरुवात करणे श्रेयस्कर ठरेल. ही बाब कमालीची वेदनादायक अणि अवघड आहे, हे मान्य. पण, दुखणे हटवायचे असेल, तर काही जालीम उपचारांशिवाय तरणोपायही नाही. बिहारच्या पराभवानंतर काँग्रेस पक्षात जे अंतर्स्फोट घडत आहेत, त्यातून लक्षात येण्याजोग्या ठळक बाबी म्हणजे, या पक्षाने लढण्याची ऊर्मीच गमावली आहे आणि भविष्यात कुठलाही अन्य समविचारी पक्ष काँग्रेसला सोबत घेताना दहादा विचार करेल, अशा अवस्थेप्रत हा पक्ष आला आहे. या पक्षासाठी पुढला मार्ग अधिक खडतर होत चालला आहे. विद्यार्थ्याने पुन्हा नव्याने अभ्यासाच्या वह्या उघडण्याची नितांत गरज आहे. अन्यथा, अवघा देश काँग्रेसमुक्त करण्यासाठी प्रतिज्ञाबद्ध असलेल्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला काहीच करावे लागणार नाही. ते काम काँग्रेस स्वत:च करेल.