अग्रलेख : बदलाची झुळूक!

Congress
Congress

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे नेतृत्व आणि विशेषत: कार्यपद्धती यांच्यावर गेल्या ऑगस्टमध्ये काँग्रेसच्या २३ ज्येष्ठ नेत्यांनी प्रश्नचिन्ह उभे केल्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीत अपेक्षेप्रमाणेच ‘गांधीनामाचा गजर!’ झाला होता. त्यामुळे या नेत्यांनी उभ्या केलेल्या प्रश्नचिन्हाचे रूपांतर पूर्णविरामात तर झाले नाही, असे वाटू लागले होते. मात्र, बिहार विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाला आलेल्या दारुण अपयशानंतर अखेर सोनिया, राहुल तसेच प्रियांका या गांधी कुटुंबीयांनी ‘बंडखोरां’शी संवाद साधला आहे! काँग्रेसच्या गेल्या पाच-सहा दशकांच्या वाटचालीत या घराण्याविरोधात साधा सवाल उपस्थित करणाऱ्यांना थेट बाहेरचा रस्ताच दाखवल्याची उदाहरणे आहेत.

विश्वनाथप्रताप सिंह यांनी ‘बोफोर्स’ प्रकरणातील काही कच्चे दुवे दाखवताच, त्यांना पक्षातून हद्दपार केले गेले. त्यानंतर एका तपाने शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्या विदेशी मुळाचा प्रश्न ऐरणीवर आणताच, त्यांचीही तडकाफडकी काँग्रेसमधून हकालपट्टी झाली. या पार्श्वभूमीवर सोनियांनी ‘बंडखोरां’समवेत बैठक घेणे, हे त्यांना प्रखर वास्तवाची जाणीव झाली असल्याचे निदर्शक म्हणावे लागेल. बैठकीतून थेट काही निष्पन्न झाले नसले, तरी काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष असावा आणि मुख्य म्हणजे तो लोकशाही पद्धतीने निवडला गेलेला असावा, यावर एकमत झाल्याचे दिसते. ऑगस्टमध्ये काँग्रेसमधील हे बंडाचे वारे फिरू लागल्यानंतर दोन्ही गटांना एका व्यासपीठावर आणू शकतील, असे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन झाले. त्यामुळे पक्षातील या दोन प्रवाहांमधील संवादाला तिलांजली मिळाली होती.

मात्र, गेल्या मार्चमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बंडखोरीनंतर मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होणे भाग पडलेले ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी पक्षातील ही दरी कमी करण्यासाठी घेतलेला पुढाकार आणि त्यास प्रियांका यांची साथ, यामुळे अखेर हा संवाद झाला. 

लोकशाही राज्यव्यवस्थेत असलेले विरोधी पक्षाचे प्रबळ स्थान टिकण्यासाठी काँग्रेस मजबूत होणे आवश्‍यक आहे. २०१९मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या आगे-मागे झालेल्या सुमारे डझनभर विधानसभा निवडणुकांपैकी बिहारचा अपवाद वगळता अन्य कोणतेही राज्य भारतीय जनता पक्षाला जिंकता आलेले नाही. लोकसभा निवडणुकीत राजधानी दिल्लीतील सातही जागा जिंकणाऱ्या भाजपला नंतरच्या अवघ्या दहा महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत ‘आम आदमी पक्षा’ने जबरदस्त फटका दिला होता. शिवाय, दिल्लीनंतर महाराष्ट्र तसेच हरियाना आणि झारखंड येथे झालेल्या विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या मतांमध्ये मोठी घट झाली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देशाचे नेतृत्व नरेंद्र मोदी यांच्या हाती सोपवण्यास जनता तयार असली तरी राज्या-राज्यांत ‘राष्ट्रवाद, तुकडे-तुकडे गॅंग, पाकिस्तानचा बागुलबुवा’ हे भाजपचे ‘नॅरेटिव्ह’ आता फारसा प्रभाव पाडू  शकत नाही,याचा  हा पुरावा आहे. त्यामुळे काँग्रेस पुन्हा कंबर कसून उभी राहिल्यास भाजपला हा एकेकाळचा देशव्यापी पक्ष जोमाने टक्कर देऊ शकतो. मात्र, त्यासाठी गांधी कुटुंबीयांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे करणारे कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद, पृथ्वीराज चव्हाण असे स्वत: निवडून येण्याची शाश्वती नसलेले आणि मुख्य म्हणजे तळागाळात जनाधार नसलेले नेते कितपत उपयुक्त ठरतील, याचाही विचार तितक्‍याच गांभीर्याने व्हायला हवा.

मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, छत्तीसगड आणि काही प्रमाणात आंध्र तसेच तेलंगण अशा काही राज्यांत अजूनही काँग्रेसचा प्रभाव असला तरी निवडणुकीनंतरच्या राजकारणात काँग्रेस गेल्या पाच-सात वर्षांत सातत्याने अपयशी ठरत आहे. मध्य प्रदेशात गमवावी लागलेली सत्ता हे त्याचे एक ठळक उदाहरण. सत्ताकारणात पडद्याआडची जुळवाजुळव ही निवडणुकीच्या राजकारणापेक्षा अनेकदा महत्त्वाची ठरत असते. त्यात अपयशी ठरल्यामुळे सर्वांत मोठा पक्ष म्हणून निवडून आल्यावरही गोव्यात काँग्रेसला सत्ता मिळू शकली नव्हती. ही जुळवाजुळव करण्यात पटाईत असलेला अहमद पटेल यांच्यासारखा धूर्त नेता आता नसताना ती जबाबदारी कमलनाथ वा अशोक गेहलोत यांच्यासारख्या जुन्या-जाणत्यांकडे सोपवायची तयारीही गांधी कुटुंबीयांना दाखवावी लागेल. लोकशाही मार्गाने अध्यक्षपदाची निवडणूक झालीच तरीही त्यात राहुल हेच निवडून येतील, असे सध्याचे वातावरण आहे. त्यामुळे त्यानंतर राहुल यांना खऱ्या अर्थाने पूर्णवेळ आणि पारदर्शक पद्धतीने कारभार करावा लागणार आहे. त्यास त्यांची स्वत:ची तयारी नसेल, तर त्यांनी स्वेच्छेने अन्य तडफदार तसेच झडझडून काम करणाऱ्या नेत्याच्या हाती पक्षाची धुरा देऊन मोकळे व्हावे. एकमात्र खरे!

सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीनंतर लगेचच हैदराबाद महापालिकेतील अपयशाची जबाबदारी स्वीकारून तेथील काँग्रेस अध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. तसेच, मुंबई काँग्रेसलाही भाई जगताप यांच्या रूपाने नवा अध्यक्ष मिळाला आहे. आसाम आणि केरळ येथे होऊ घातलेल्या निवडणुका लक्षात घेऊन तेथील जबाबदारीही निश्‍चित करण्यात आली आहे. ही सारी चिन्हे काँग्रेसमध्ये किमान बदलाची झुळूक तरी आल्याचेच सांगत आहेत. त्या झुळकीचे वादळवाऱ्यात रूपांतर झाले, तरच पक्षाला भवितव्य आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com