अग्रलेख : अभावपर्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

drama

‘महाराष्ट्रीय कलोपासक’ आयोजित या स्पर्धेसाठी महाविद्यालयांमधले तरुणविश्व आतूर असते. त्यांचा उत्साह ओसंडून वाहतो.

अग्रलेख : अभावपर्व

काही वेळा असे घडते, की घटना अगदी छोटीशीच असते आणि तिचा व्याप स्थानिक असतो; पण समाजातील एखाद्या कमतरतेवर सर्चलाईटसारखा झोत टाकून जाते आणि अंतर्मुख करते. पुण्यातील प्रतिष्ठेच्या पुरुषोत्तम करंडक आंतरहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेतील परीक्षकांनी दर्जाचे कारण सांगून कोणालाही करंडक न देण्याचा जो कठोर निर्णय घेतला, ते याचे एक उदाहरण ठरू शकते. त्याविषयी मतमतांतरे होणार. तशी ती झालीही पाहिजेत; परंतु त्यामुळे एकूणच नाट्य,चित्रपट, मालिकादी मनोरंजन क्षेत्रातील दर्जाचा प्रश्न ठळकपणे पुढे आला आहे. एकीकडे विविध क्षेत्रांतील मापदंड पातळ, विसविशीत करण्याचा प्रवाह जोरात असताना पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या परीक्षकांनी एकही संघ करंडकासाठी पात्र नसल्याचे सांगून किमान दर्ल्यार्जा हवाच, असा आग्रह धरला. ५७ वर्षांच्या इतिहासात हे प्रथमच घडले. एकंदर ५१ एकांकिका सादर झाल्या. एकही एकांकिका करंडक जिंकू शकली नाही किंवा वैयक्तिक अभिनयासाठीची पारितोषिकेही कुणाला मिळू शकली नाहीत. रोख रकमेचे पुरस्कार तेवढे दिले गेले.

‘महाराष्ट्रीय कलोपासक’ आयोजित या स्पर्धेसाठी महाविद्यालयांमधले तरुणविश्व आतूर असते. त्यांचा उत्साह ओसंडून वाहतो. कित्येक हौशी मुले व मुली अक्षरश: जिवाचे रान करतात. आपण काहीतरी सर्जनशील कृती करतो आहोत, ही भावनाच किती सुखद असते! ‘पुरुषोत्तम’ ने ते सुख होतकरु कलावंतांना अर्धशतकाहून अधिक काळ दिले आहे. परीक्षकांच्या निकालानंतर मात्र अवघे तरुण नाट्यविश्व निराश झाले. तसे होणे स्वाभाविकही म्हटले पाहिजे. महिनोनमहिने आपण जे कष्ट केले, ते स्पर्धा जिंकण्याइतके दर्जेदार नव्हते, ही भावना निराश करणारीच असते. परीक्षकांच्या या कठोर निर्णयाविरुद्ध समाजमाध्यमांवर सध्या आगपाखड सुरु आहे. अनेक नामवंत कलावंतांनीही असा हिरमोड केल्याबद्दल आयोजकांचे जाहीर वाभाडे काढले आहेत. असे का घडले असावे? एकांकिका आणि अभिनयकलेचा दर्जा एकाएकी इतका कसा घसरला? खरोखर दर्जा घसरला की परीक्षक वा आयोजकांचा हा हेकटपणा समजावा? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. रंगकर्मी आणि कलाक्षेत्रातील सुबुद्ध त्याची उत्तरे येत्या काळात शोधतीलही. परंतु, इथे मुद्दा केवळ पुरुषोत्तम करंडकाचा नाही. योग्यतेची किंवा ही दर्जाची घसरण सर्वव्यापी किंवा सर्वदूर दिसते आहे का, हा खरा कळीचा प्रश्न आहे.

योग्यतेचा अभाव ही पिढ्यानपिढ्या सहज जाणवणारी चिरंतन गोष्ट आहे. ‘आमच्या काळी सारे थोर होते, गेले ते दिवस…’ हे वाक्य महाराष्ट्रात दंडकारण्य होते, त्या काळातही कदाचित उच्चारले गेले असेल! ‘वडीलां’च्या पिढीला ‘पुढीलां’चे कर्तृत्व नेहमीच थिटे वाटते. पूर्वसूरींनी करुन ठेवलेले डोंगराएवढे काम पुढल्या पिढीसमोर आदर्शवत म्हणून येते. पण चांगले करायचे, म्हणजे अमूक अमूकसारखेच करायचे, त्यापेक्षा वेगळे म्हणजे गुणवत्ताच नाही, हाच मूल्यविवेक मानणे कितपत सयुक्तिक, हाही प्रश्‍न उपस्थित होऊ शकतो. नव्या पिढीचे कर्तृत्व मोजायची मोजपट्टी जुनीच असते, हाच त्याचा अर्थ.

जुन्या-नव्यांचे हे भांडण ‘जनरेशन गॅप’ या संज्ञेखाली सहज दडपून टाकता येते. हल्ली पूर्वीसारखी गुणवत्ता दिसत नाही, हे वाक्य भावगीतांपासून भाजीपाल्यापर्यंत आणि राजकारणापासून रॉकेट-विज्ञानापर्यंत कुठल्याही क्षेत्रात उच्चारले जाऊ शकते, हे खरेच. पण तरीही दर्जाची घसरण हा खरोखरच जर सर्वदूर वाढणारा प्रवाह असेल तर मात्र थोडे थांबून त्यांची कारणे शोधली पाहिजेत. साहित्यापासून समाजकारणापर्यंत सर्वत्र ही घसरण दाखवता येते. या क्षेत्रांचा दर्जा घसरला की चढला, याची उठाठेव करणारी माध्यमेही त्यास अपवाद नाहीत. किंबहुना, हल्लीची पत्रकारिता किती खालावली आहे, याची शेकडो उदाहरणे माध्यमेच देतात! कलाक्षेत्र हे तर बहुतांसाठी तोंडीलावणे असते. तिथे मनोरंजनाची मोजपट्टी घेऊन बसले की गुणवत्तेचा आग्रह आपोआप खाली येतो, आणि कामच सोप्पे होते.

टीआरपीचा आकडा तोंडावर फेकला की दर्जा, गुणवत्ता, पात्रता असले शब्द फिजूल ठरतात. त्याचे ढळढळीत उदाहरण म्हणून टीव्हीवरल्या मालिकांकडे बोट दाखवता येईल. अभिनयाच्या नावाखाली तेथे जे काही चालते, ते प्रेक्षक म्हणून आपण चालवून घेतो, आणि आपल्याला चालते म्हणून कलावंतही चालवून घेतात. दोन घटका करमणूक आणि त्या मिषाने चालणारा रोकडा व्यवहार याच्यापलिकडे बघण्याच्या ऊर्मी या ‘चलता है’ दृष्टिकोनामुळे पूर्ण नष्ट होतात. हीच प्रक्रिया अन्य क्षेत्रातही होताना दिसते. कुठल्याही क्षेत्रात दर्जा राखण्यासाठी काटेकोर राहाण्याची निश्चितच गरज असते. कलाक्षेत्रासारख्या सर्जनशील क्षेत्रात तर अधिक सजग राहावे लागते. पूर्वीच्या काळी साधना पूर्ण झाल्याचे गुरुने सांगितल्याशिवाय शिष्याला गायनाचा जाहीर कार्यक्रमही करता येत नसे.

भरतनाट्यमचेही अरंगेत्रम झाल्याशिवाय नृत्यकला प्रेक्षकांसमोर सादर करण्याची अनुमती नसे. तिथे साधनेला महत्त्च अधिक होते. दिवंगत ब्रिटिश समाजवेत्ते मायकेल यंग यांनी १९५८ मध्ये ‘राइज ऑफ मेरिटोक्रसी’, म्हणजेच ‘गुणसत्तेचा उदय’ हा ग्रंथ प्रसिद्ध केला. येणारा काळ हा गुणवत्ताशाहीचा असून त्यात गुणाढ्यांची चलती असेल, आणि अल्पगुणींचे दमन सुरु होईल, अशी काहीशी उपहासगर्भ मांडणी त्यामध्ये होती. या ‘गुणसत्ते’चा परिपाक सध्या दिसतो आहे का, हा प्रश्न समाजशास्त्रींनी तपासून पहावा. पुरुषोत्तम करंडक मिळाला नाही, याने हिरमुसून जाण्यापेक्षा तरुण कलावंतांनी पात्रतेसंदर्भात एक काटेकोर मोजपट्टी मिळाल्याचा आनंद अधिक मानावा. परीक्षकांचा निर्णय फारसा चुकीचा नव्हता, हे कळले तर त्यांना क्षितिजावरचे यशाचे इंद्रधनुष्य अधिक स्पष्ट दिसू लागेल.

Web Title: Editorial Article Maharashtra Art One Act Play Drama Competition Colleges Student

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..