esakal | अग्रलेख : स्वयंचित!
sakal

बोलून बातमी शोधा

अग्रलेख : स्वयंचित!

क्रिकेटसह सर्वच क्षेत्रांत अचूक टायमिंगला अत्यंत महत्त्व असते. धोनीचे ते एका बाबतीत चुकले. त्यामुळे शक्‍य असूनही स्वयंचित होणे त्याला टाळता आले नाही.

अग्रलेख : स्वयंचित!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जगभरातील नामांकित यष्टिरक्षक आणि आपल्या सुप्रसिद्ध ‘हेलिकॉप्टर शॉट’च्या जोरावर लाखो क्रिकेटपटूंच्या मनात घर करून बसलेला महेंद्रसिंह धोनी अखेर स्वत:च्याच एका चुकीमुळे ‘स्वयंचित’ झाला आहे! साऱ्या देशावर मोहिनी घालणाऱ्या क्रिकेट या खेळातील धोनी हा सर्वांत लोकप्रिय कर्णधार. भारताला एक नव्हे तर दोन विश्‍वचषक जिंकून देणाऱ्या या महान खेळाडूस गेल्या विश्‍वचषक स्पर्धेतील उपांत्य सामन्यात एक धाव पूर्ण करता आली नाही आणि तो धावबाद होताच, सामन्याचे पारडे फिरले. अर्थात, ती धाव धोनी पूर्ण करू शकला असता, तरी तो सामना जिंकून भारत अंतिम फेरीत पोचला असता काय, हा वादाचा विषय. तरीही धोनीची ती चूक त्याच्या कारकिर्दीला विराम देणारी ठरू शकेल, असे ना त्याच्या मनात आले असणार वा त्याच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या लक्षावधी क्रिकेटप्रेमींच्याही. अर्थात, त्या सामन्यात त्या कळीच्या क्षणी धोनी बाद झाला नसता, तरीही तो सामना आपण हातातून गमावल्यातच जमा होता; कारण तोपावेतो आपण त्या सामन्याची सारी सूत्रे हातातून गमावली होती. तरीही त्याचे खापर धोनीच्या संथ फलंदाजीवर फोडले गेले. वयोमान तसेच असंख्य सामन्यांत यष्टिरक्षण करताना शरीराची रोजच्या रोज होणारी परीक्षा याचा परिणाम त्याच्या खेळावर झाल्याचे स्पष्ट दिसत होते. अर्थात, धोनीने ही बाब लक्षात घेऊन कसोटी क्रिकेटमधून आपली निवृत्ती त्यापूर्वीच जाहीर केली होती. मात्र, विश्‍वचषक स्पर्धेच्या त्या सामन्यातील अपयशानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, तसेच निवड समिती यांनी धोनी या नावावर फुली मारली आणि आता तर या मंडळाने त्याला यंदाच्या करारात कोणत्याही श्रेणीत स्थान दिलेले नाही. खरे तर आपले वाढते वय तसेच शरीराची न मिळणारी साथ लक्षात घेऊन, गेल्या वर्षीच्या त्या विश्‍वचषक स्पर्धेआधीच त्याने निवृत्ती जाहीर करायला हवी होती. तसे होते, तर क्रिकेटप्रेमींच्या मनातील त्याची प्रतिमा ही अधिक उजळून निघाली असती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

धोनीने भारतीय क्रिकेटला आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत नेमके काय दिले, याचा विचार करताना साहजिकच कपिल देव या भारताच्या आणखी एका अष्टपैलू क्रिकेटपटूचे स्मरण होणे, स्वाभाविक आहे. १९८३ मध्ये कपिलच्या नेतृत्वाखाली भारताने प्रथम विश्‍वचषक हा थेट क्रिकेटचे माहेरघर असलेल्या इंग्लंडमधून मायदेशी आणला आणि ‘यस, वुई कॅन विन!’ ही भावना केवळ क्रिकेटप्रेमींच्या नव्हे तर अशी भावना समस्त भारतवासीयांच्या मनात जागवली. धोनीने २००७ मध्ये ‘ट्‌वेंटी २०’ स्पर्धेतील विश्‍वचषक भारतात आणला तेव्हाही नेमकी हीच भावना आपल्या मनात जागृत झाली होती. पुढे २०११ मध्ये एकदिवसीय स्पर्धेतील विश्‍वचषकही जिंकून धोनीने आपल्या ‘कॅप’मध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला. खरे तो निवृत्तीसाठी धोनीच्या आयुष्यातील सर्वांत सुंदर क्षण होता. मात्र, थांबावे कोठे हे ज्याला कळते, तोच महान, यात शंका नाही. अर्थात, कपिलला तरी ते कुठे कळले होते? त्यामुळेच आपल्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात केवळ एक जागतिक विक्रम मोडण्यासाठी दमला-भागलेला कपिल षटकांमागून षटके टाकताना बघणे, त्याच्या चाहत्यांच्या नशिबी आले होते. 

खरे तर गेल्या अनेक मालिकांमध्ये भारतीय संघाने धोनीला दूरच ठेवले होते आणि त्याने सन्मानाने निवृत्ती स्वीकारावी, असे संकेत क्रिकेट नियामक मंडळाबरोबरच अनेक ज्येष्ठ, तसेच वडीलधाऱ्या क्रिकेटपटूंनी दिले होते. मात्र, धोनीने त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले. शरीराशी खरे तर लढाई करण्याचे त्याला काही कारणच नव्हते; कारण आपल्या कारकिर्दीत मैदानावरील लढतीत त्याने तुफानी लढाई केली होती. मात्र, अजूनही मैदानावर परत येण्याचा हट्ट, कोणत्याही श्रेणीत करारबद्ध न होण्याची नामुष्की पदरी आल्यानंतर सोडायला तो तयार नाही, असेच दिसत आहे. क्रिकेट नियामक मंडळाने हा धाडसी निर्णय घेतला, तेव्हाही तो झारखंडच्या रणजी संघाबरोबर सरावातच मग्न होता. मैदानाशी त्याचे नाते इतके घट्ट आहे, की त्याला मैदानाबाहेर पडणे अवघडच जाणार आणि असंख्य क्रिकेटप्रेमींनाही त्याची अनुपस्थिती तीव्रतेने जाणवणार, हे खरेच आहे. पण काळाची मर्यादा कोणालाच ओलांडता येत नाही, हे लक्षात घ्यावे लागते. सर्वच क्षेत्रांत; विशेषतः क्रिकेटमध्ये अचूक टायमिंगला अत्यंत महत्त्व असते. धोनीचे या बाबतीत ते चुकले आणि त्यामुळे शक्‍य असूनही स्वयंचित होणे त्याला टाळता आले नाही. 

loading image