esakal | अग्रलेख : नव्या युद्धाची तज‘वीज’

बोलून बातमी शोधा

Cyber-Attack}

मुंबईतील वीज पुरवठा अचानक विस्कळित होण्याच्या घटनेमागे चीनमधून झालेला सायबर हल्ला कारणीभूत आहे किंवा नाही, याविषयी परस्परविरोधी वक्तव्ये केली गेली, तरीही या संकटाचे गांभीर्य कमी लेखणे धोक्याचे आहे.

अग्रलेख : नव्या युद्धाची तज‘वीज’
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबईतील वीज पुरवठा अचानक विस्कळित होण्याच्या घटनेमागे चीनमधून झालेला सायबर हल्ला कारणीभूत आहे किंवा नाही, याविषयी परस्परविरोधी वक्तव्ये केली गेली, तरीही या संकटाचे गांभीर्य कमी लेखणे धोक्याचे आहे.

सुरक्षेशी संबंधित असा संवेदनशील विषयही आपल्याकडे कसा राजकीय कलहाचा होऊ शकतो, याचे उदाहरण मुंबईतील वीज पुरवठा अचानक खंडित होण्याच्या विषयावरून सुरू असलेल्या कलगीतुऱ्यावरून पाहायला मिळते. बारा ऑक्टोबरला मुंबईत अचानक वीज गायब झाल्याने या देशाच्या आर्थिक राजधानीतील व्यवहार ठप्प झाले होते. त्यासंबंधीच्या तपासाची माहिती देताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा प्रकार सायबर हल्ल्यातून झाल्याचे पत्रकारांशी बोलताना नमूद केले. परंतु या निवेदनाला २४ तासही उलटायच्या आत भाजपनेत्यांनी ‘अपयश झाकण्यासाठी राज्य सरकार खोटे अहवाल तयार करीत आहे’, असा गंभीर आरोप केला; तर केंद्रीय ऊर्जामंत्री आर.के. सिंह यांनीही मुंबईच्या घटनेला चिनी सायबर हल्ला असल्याची शक्यता फेटाळून लावली. ही परस्परविरोधी विधाने सर्वसामान्यांना केवळ गोंधळातच टाकणारी आहेत, असे नव्हे तर सुरक्षेसंबंधी काळजी वाढविणारी आहेत. एका गंभीर घटनेला राजकीय वादाचे वळण मिळाल्याने सायबर हल्ला, हॅकिंग आणि भविष्यात त्यातून निर्माण होणारी संकटे, या विषयाचे गांभीर्यच नष्ट होण्याचा धोका आहे आणि आपल्या राजकीय नेत्यांना त्याची काहीही फिकीर नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या बारा ऑक्टोबर या दिवशी वीजपुरवठा अचानक ठप्प झाल्याने मुंबईकरांना चांगलाच धक्का बसला होता. बाहेरून होणाऱ्या वीजपुरवठ्यात काहीही व्यत्यय आला, तरी आर्थिक राजधानीच्या जनजीवनाला झळ पोहोचू नये, यासाठी जी ‘आयलॅंडिंग’ची व्यवस्था करण्यात आली आहे, ती निकामी झाली. व्यवहार थंडावले. स्टॉक एक्सचेंजचे कामही विस्कळित झाले. विविध यंत्रणांच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यासमोर भरदिवसा काजवे चमकवणारा हा प्रकार म्हणजे सायबर हल्ल्याचा परिपाक असावा, हा संशय होता. परदेशातून झालेले हॅकिंगच या ‘अंधारनाट्या’ला कारणीभूत असल्याचे प्राथमिक तपास अहवालातून स्पष्ट झाले आल्याचे राज्याच्या गृहमंत्र्यांनी सांगितले. तर ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तांतात थेट चीनचे नावच घेण्यात आले. या सायबर हल्ल्यामागे चिनी हॅकर होते आणि ‘रेडएको’ या चीनमधील समुहाने मालवेअर सोडून वीजयंत्रणेशी संबंधित संगणकीय जाळ्यात बिघाड घडवून आणला, असे त्यात म्हटले होते. याविषयी कोणाचेही काहीही मत असले तरी अधिक सखोल तपास नि चौकशीची आवश्यकता आहे, याविषयी दुमत होऊ नये. याचे कारण नव्या प्रकारचे हे युद्ध आहे. मुळात युद्ध म्हटले, की बाहू फुरफुरू लागतात आणि आपली भूमी इंच इंच लढविण्याच्या गर्जना केल्या जातात. चीनच्या सैन्याने गलवान खोऱ्यात घुसखोरी केल्यानंतर या सगळ्याचा अनुभव आपणही घेतला आणि अशा प्रकारच्या संघर्षाचे यशापयश प्रामुख्याने भूमीवरील हक्काशी जोडले गेले असल्याने काही भागातून चिनी सैन्याने माघार घेतल्यानंतर आनंदही व्यक्त केला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हे सगळे आजही स्वाभाविक असले तरी आताच्या काळात रणांगणाचे स्वरूप बऱ्याच अंशी बदलले आहे, हेही लक्षात घ्यायला हवे. युद्धे केवळ भूमी बळकावण्यासाठी आणि सैन्य, अत्याधुनिक शस्त्रप्रणाली आणि बॉम्बगोळे यांनीच लढवली जातात, असे नाही. दुसऱ्या देशातील व्यवस्था विस्किळित करणे हेही नव्या छुप्या युद्धाचे स्वरूप झालेले आहे. मुंबईतील वीज पुरवठा विस्कळित होण्याचा प्रकार हा नव्या प्रकारचे युद्ध अगदी आपल्या अंगणापर्यंत येऊन ठेपल्याची जाणीव करून देणारा म्हणावा लागेल. देशातील सुविहित चाललेल्या ‘सिस्‍टिम्स’ किंवा ‘व्यवस्था’ कशा रीतीने हल्‍ल्याचे लक्ष्य ठरू शकतात, याची प्रखर जाणीव या घटनेने करून दिली आहे, हे नक्की.

आंतरराष्ट्रीय राजकारणातील संघर्ष इतके पेचदार आणि व्यामिश्र होत चालले आहेत, की शत्रूदेशाला नमविण्यासाठी, वर्चस्व निर्माण करण्यासाठी त्या देशातील व्यवस्थांवर घाला घालायचा, आर्थिक व्यवहारांत व्यत्यय आणायचा, त्या व्यवस्थांवर असलेल्या लोकांच्या विश्वासालाच तडा जाईल, असा गोंधळ माजवायचा अशा हेतूंनी सायबर हल्ले घडविले जाऊ शकतात.

अमेरिकी संस्थेने सादर केलेला अहवाल आणि तेथील वृत्तपत्राने दिलेले वृत्त एवढ्याच आधारावर कोणताही निष्कर्ष काढला जाऊ नये, हेही खरेच आहे. चीनच्या वाढत्या वर्चस्ववादाचा मुकाबला हा अमेरिकी अजेंड्यावरचा प्राधान्याचा विषय आहे. `माहितीयुद्धा’च्या बाबतीत अमेरिकेकडूनही कशाप्रकारचे मार्ग अवलंबले जातात, हे सर्वज्ञात आहे. त्यामुळे आत्मनिर्भरतेची कसोटी याही बाबतीत लागणार आहे. हॅकरनी घातलेला धुमाकूळ खुद्द अमेरिकेच्या डोकेदुखीचा विषय झाला होता आणि तेथील निवडणुकीतच रशियाने हस्तक्षेप केल्याचा आरोपही झाला. २०१५मध्ये रशियातील सायबर चाच्यांनी युक्रेनमधील तीन वीज कंपन्यांच्या संगणक यंत्रणाच ताब्यात घेऊन तेथील वीजपुरवठा खंडित केला होता. त्यामुळेच अशा प्रकारचे हल्ले ही काल्पनिक बाब राहिलेली नाही. अशा हल्ल्यांमागे एखादा देशच असेल असे नाही, तर दहशतवादी गटही असू शकतात. संगणकीय संशोधनातून ॲटिव्हायरसच्या कितीही तटबंद्या उभारल्या तरी त्या भेदून आत घुसण्याची नवनवी तंत्रे शोधून काढली जात आहेत. हे संगणकीय विषाणू आणि त्याहीपेक्षा त्यामागील हेतू लक्षात घेऊनच या बाबतीत उपाय योजावे लागतील.

त्याचबरोबर सर्वसामान्यांनाही सावध राहावे लागेल. आपल्या व्यवस्था, त्यांतील नियम व कायदेकानू , त्यात वापरले जाणारे तंत्रज्ञान आणि त्याचा अल्गोरिदम ही सगळीच आपली मोलाची ‘साधनसंपत्ती’ असते, हे ओळखणे आणि ती जपण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्नशील राहाणे ही काळाची गरज आहे. याचे कारण आधुनिक युद्धाच्या या सगळ्याच आघाड्या आहेत. आर्थिक प्रगतीचा डोलारा उभा राहातो, तो वेगवेगळ्या व्यवस्था नीट, सुविहीतपणे चालण्यातूनच, हे ध्रुवसत्य कधीही डोळ्याआड होता कामा नये.

Edited By - Prashant Patil