esakal | अग्रलेख : स्वप्नांचे नव गेंद गुलाबी!
sakal

बोलून बातमी शोधा

Sunrise

नव्या वर्षाने हसतमुखाने दारावर टकटक केली आहे. त्याच्या चेहऱ्यावर निरोगी हास्य आहे, मुद्रेत आत्मीयता आहे आणि दिलासाही. त्याच्या डोळ्यांत नवी स्वप्ने आहेत. ‘किती उशीर केलास’, असे विचारत आपण सारे त्याचे मोकळेपणाने स्वागत करूयात. 

अग्रलेख : स्वप्नांचे नव गेंद गुलाबी!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नव्या वर्षाने हसतमुखाने दारावर टकटक केली आहे. त्याच्या चेहऱ्यावर निरोगी हास्य आहे, मुद्रेत आत्मीयता आहे आणि दिलासाही. त्याच्या डोळ्यांत नवी स्वप्ने आहेत. ‘किती उशीर केलास’, असे विचारत आपण सारे त्याचे मोकळेपणाने स्वागत करूयात. 

काळोख्या भुयारातून भयभीत मनःस्थितीत वाट काढत, चाचपडत पावले टाकताना, अचानक वळण लागून पुढ्यात उजेडाचे प्रवेशद्वार दिसावे आणि उगवत्या दिनकराची चाहूल देणारा संधिकाल जगण्याची केवढी तरी उमेद देऊन जावा, असे काहीसे संपूर्ण मानवजातीचे झाले आहे. गेले वर्ष फार काळोखाचे गेले. अनिश्‍चिततेची ही भुयारे पाताळात नेणार की उजेडाच्या दिशेने, हेच कळेनासे झाले होते. अचानक सूर्यबिंबाची चाहूल लागली आणि अस्तित्वाबाबतची शाश्वती वाटू लागली. या भयचकित अवस्थेत पुढ्यात ठाकलेल्या त्या सहस्ररश्‍मीला नमस्कार करण्याचे मात्र राहूनच गेले. अर्थात, अंधाराचे जाळे फिटू लागले असले तरी अजून आभाळ मोकळे झालेले नाही. दरीखोऱ्यांतून निवळशंख प्रकाश अजून वाहू लागलेला नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तरीही सृष्टी मोठ्या अपेक्षेने नव्या वर्षाकडे पाहाते आहे. गेले वर्ष कसे गेले, याचा विचारही मन करू धजावत नाही. जसे जाऊ नये तसे गेले, इतकेच म्हणता येईल. कित्येकांनी सगेसोयरे गमावले, कित्येकांना जीवघेण्या आजाराला सामोरे जावे लागले, कित्येकांना घरादाराला मुकावे लागले, तर कित्येकांना पोटाची चिंता भेडसावू लागली. अन्न, वस्त्र, निवारा या तर माणसाच्या मूलभूत गरजा, पण त्यालाही माणूस मोताद व्हावा, यापरतें दुर्दैव ते कशाला म्हणायचे? व्यथा, वेदनांनी वर्षभर नुसता उच्छाद मांडला होता. अशा परिस्थितीत, क्षितिजावर उगवलेले नवे वर्ष तरी बरे जावे, अशी करुणा भाकण्यापलीकडे हातात होते तरी काय? तसे पाहू गेल्यास कुठलेच वर्ष सरसकट चांगले किंवा वाईट असे असू शकत नाही. वर्ष म्हणजे माणसाने आपल्या सोयीसाठी केलेल्या कालगणनेतला एक प्रवाही तुकडा तेवढा असतो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यात चांगले आणि वाईट काय असणार? तरीही मनुष्यप्राणी त्याची पंचांगे आखतो. तिथ्या-जयंत्या-मयंत्यांचे दिवस मुक्रर करतो, बरकतीची गणिते मांडतो. प्रसंगी ग्रहदशेवरही ठपका ठेवतो. ऋतुचक्रालाही काळाच्या दावणीला बांधण्याची त्याची ही धडपड शेवटी उत्कर्षासाठीच असते. सृष्टी तिच्या चक्रात मग्न असते. सरते वर्ष, नवे वर्ष वगैरे सगळ्या माणसाच्या जगण्याच्या कल्पना. म्हणूनच सरत्या वर्षाला निरोप देण्याचे जलसे होतात आणि येत्या वर्षाच्या स्वागताचे उत्सवही पार पडतात! हे त्या भिंतीवरच्या कॅलेंडरनुसार घडते, तो काही सृष्टीचा नियम नव्हे.

मावळत्या वर्षाचे भिंतीवरले कॅलेंडर भेंडोळे करून कुठेतरी लवकरात लवकर दृष्टीआड करावे, असे कुणाला वाटले तर त्यात नवल नाही. त्याच खिळ्यावर नव्या वर्षाचे कॅलेंडर टांगतानाही कुणाच्या मनात थोडी साशंकता दाटून येईल. सरत्या वर्षाने आपले रंगच मुळी असे बटबटीतपणे दाखवले, की ज्याचे नाव ते! या वर्षकाळातले बव्हंशी सगळेच महिने मृत्यूच्या सावटाखाली गेले.

आजारपणे, अनिश्‍चितता, चिंता-काळज्या, भीती अशा नानाविध विवंचनांनी भरलेले ते वर्ष होते. येणाऱ्या अनेक संवत्सरांचे येणे-जाणे आणि एकूणच जगणे दुष्कर करून ठेवणारे गेले वर्ष भिंतीवरून उतरले. पण या नकोशा संवत्सराने फक्त वेदनाच दिल्या असे कसे म्हणावे? अवघे विश्व वेठीला धरणाऱ्या विषाणूचा विच्छेद करणारी लस याच वर्षी मानवाने शोधली. त्यासाठी जीवशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, रसायनशास्त्रादी अनेक शास्त्रांना कामाला लावून मानवाने आणखी एक देदिप्यमान विजय नोंदवला. खरे तर मानवी उत्क्रांतीच्या इतिहासात या कर्तृत्वाची ठळकपणे नोंद करायला हवी. याच वर्षभरात माणूस नावाचा प्राणी विधात्याप्रमाणे सृष्टीच्या पालनपोषणासंबंधी गंभीरपणे विचार करू लागला. पर्यावरण ही जपणूक करण्याची चीज आहे, याचे बऱ्यापैकी भान त्याने मिळवले. विषाणूविरुद्धच्या महासंघर्षात सारे जग नाइलाजाने का होईना, एकजूट झाल्याचे चित्र दिसले. माणसाने आत्तापर्यंत लावलेले जवळपास सगळेच शोध हे आव्हानात्मक परिस्थितीतच लावले आहेत. बांका प्रसंग आला की माणूस बुद्धी पणाला लावून त्यातून मार्ग काढतोच, नव्हे, फिनिक्‍स पक्ष्याप्रमाणे राखेतून गगनभरारी घेतो, हे पुन्हा एकवार सिद्ध झाले. एवढे सारे मावळलेल्या वर्षात झाले. त्याला अवलक्षणी कसे म्हणावे?

‘काळोखाची रजनी होती, हृदयिं भरल्या होत्या खंती, विमनस्कपणे स्वपदे उचलित, रस्त्यातुनि मी होतो हिंडत... एका खिडकीतुनी सूर तदा आले दिडदा दिडदा दिडदा...’ अशा कविवर्य केशवसुतांच्या कवितेतील ओळी आहेत. त्याचा रुपकात्म भाव उकलून पाहिला तर लक्षात येते, की माणसाने लावलेला विषाणूप्रतिबंधक लशीचा शोध हेच ते ‘सतारीचे बोल’ आहेत! या बोलांसह हर्षखेद ते मावळले, हास्य निमाले, अश्रू पळाले, अशी अवस्था झाली. तशाच अवस्थेत असताना नवे वर्ष उंबरठ्यावर येऊन ठेपले आणि त्याने हसतमुखाने दारावर टकटक केली. - त्याच्या चेहऱ्यावर निरोगी हास्य आहे, मुद्रेत आत्मीयता आहे आणि दिलासाही. त्याच्या डोळ्यांत ‘स्वप्नांचे नव गेंद गुलाबी’ आहेत. या नव्या अतिथीला घरात घेतलेच पाहिजे. मोकळ्या मनाने त्याचे स्वागत करायला हवे. एरवी आलिंगन देऊन त्याचे स्वागत केले असते. पण तूर्त अंतरभान पाळून त्याला मनःपूर्वक म्हणावे, ‘‘सुस्वागतम, मित्रा... ये ना!’’

Edited By - Prashant Patil

loading image