esakal | अग्रलेख : निशाराणी मुंबई
sakal

बोलून बातमी शोधा

अग्रलेख : निशाराणी मुंबई

जगातील अनेक महानगरांमध्ये जसे रात्रीचे जग फुलत असते, तसे ते आपल्या मुंबईतही फुलावे, बहरावे, असे काही तरुण नेत्यांना वाटत होते. विशेषतः राज्याचे नवे पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना ते नक्‍कीच वाटत होते.

अग्रलेख : निशाराणी मुंबई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गेली कित्येक वर्षे काही जणांच्या स्वप्नातली रात्रीची मुंबई आता प्रत्यक्षात अवतरेल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. अहर्निश स्पंदणाऱ्या हृदयानिशी धडाडत राहणारी मुंबई महानगरी गेली काही दशके रात्री काहीशी थंड पडू लागली होती. सुरक्षिततेचा प्रश्‍न, गुंड टोळ्यांचा संचार आदी कारणांमुळे रात्रीचा संचार मुंबईत नाही म्हटले तरी अवघड होत गेला होता. या मुंबईत कुठल्याही प्रहरी काही ना काही मिळतेच, असा लौकिक एकेकाळी होता, हे खरेच. परंतु, ते पूर्ण सत्य नव्हते, हे रात्रीच्या वेळी कामाला जुंपल्या जाणाऱ्या काही चाकरमान्यांना नक्‍कीच जाणवत होते. जगातील अनेक महानगरांमध्ये जसे रात्रीचे जग फुलत असते, तसे ते आपल्या मुंबईतही फुलावे, बहरावे, असे काही तरुण नेत्यांना वाटत होते. विशेषतः राज्याचे नवे पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना ते नक्‍कीच वाटत होते. गेली सात वर्षे ते आणि त्यांचे सहकारी मुंबईच्या ‘नाइट लाइफ’साठी धडपडत होते. आता २६ जानेवारीपासून हे स्वप्न साकार होईल, असे त्यांनी घोषितही करून टाकले. तूर्तास मुंबईच्या निवडक अनिवासी भागांमध्येच ही ‘जागरणे’ होणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावरच या योजनेला मान्यता मिळाली असली, तरी भविष्यात लोकांचा प्रतिसाद पाहून तिची व्याप्ती वाढवली जाईल. मुंबईच्या रात्रजीवनाविषयीची योजना गेल्या फडणवीस सरकारच्या काळातच कागदावर उतरली होती. पोलिस खात्याच्या मंजुरीविना घोडे अडले होते. नव्या पर्यटनमंत्र्यांनी सत्तेवर आल्याआल्या मुंबईत शबेबहार येण्याची तजवीज करून टाकली आहे. या योजनेला विरोध करावा तर तो कसा? या संभ्रमात भारतीय जनता पक्षाची अंमळ पंचाईत झालेली दिसते. विरोध करावा, तर आपल्याच कारकिर्दीत योजना मंजूर झाली होती आणि पाठिंबा द्यावा, तर श्रेय ठाकरे सरकारला जाणार, हा संभ्रम विरोधकांना सतावत असावा.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ते काहीही असले, तरी काळानुसार हा बदल स्वाभाविक आहे. सुरक्षात्मक उपायांच्या दृष्टिकोनातून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही नवे प्रश्‍न आणि शंका उपस्थित केल्या आहेत. या साऱ्यांचे निरसन झाले, तर मुंबईचे रात्रजीवन खऱ्या अर्थाने सुरू होईल. दुकाने आणि मॉल्ससारख्या आस्थापना रात्रपाळीत सुरू राहिल्यामुळे व्यापार उदीम वाढेल, रोजगाराच्या किमान १५ लाख संधी नव्याने निर्माण होतील, पर्यटनालादेखील चालना मिळेल, असे काही फायदे सांगितले जातात. ते मिळावेत, यादृष्टीने प्रयत्न करावे लागतील. रात्री दुकाने खुली ठेवण्यासंदर्भात केंद्र सरकारने २०१६मध्येच परवानगी देऊनही बदल का जाणवले नाहीत, याची कारणे शोधून त्यावर उपाय योजायला हवेत. कुठल्याही नव्या योजनेला प्रारंभी विरोध होतोच, तसा तो याही योजनेला होत आहे; पण ती यशस्वी करण्याचा निर्धार केला, तर बऱ्याच गोष्टी सुकर होतील.

जगभर बहुतेक सर्व महानगरांमध्ये रात्रीचे विश्‍व उलगडत असते. पॅरिसच्या रंगील्या रात्री तर एव्हाना कवितेचा विषय ठरल्या आहेत. शिकागोपासून न्यूयॉर्कपर्यंत आणि हॉलंडच्या ॲमस्टरडॅमपासून कझाकस्तानातील अलमातीपर्यंत अनेक शहरांमध्ये रात्रजीवनाचे विशेष माहात्म्य आहे. या महानगरांचा मध्यवर्ती भाग किंवा एखादा कोपरा रात्र झाली, की अक्षरशः कात टाकतो. निशेचे नवनवोन्मेष उत्फुल्ल चषकातील सोनेरी द्रवाप्रमाणे फेसाळून वर येतात. दिवसभरातील तापत्रयाचा मागमूसदेखील शिल्लक राहत नाही. ‘वीकेंड’ नामक आठवडाअखेर तर सणासुदीसारखी वाटू लागते. दिव्यांच्या रोषणाईने रात्र नटूनथटून वावरते. जगातील एक महत्त्वाचे शहर असूनही हे निशासौष्ठव मुंबापुरीला नाही. मुंबई जागी असलीच, तर ती बव्हंशी फुटपाथवर किंवा कुठल्यातरी गल्लीबोळातील अंधारात पोलिसांचा ससेमिरा चुकवत जागरणे सोसत असते. दीड कोटीच्या आसपास लोकसंख्या असलेल्या या महानगराचा दिवस घड्याळाच्या काट्याला बांधलेला आणि रात्र पोलिसी दंडुक्‍यांच्या खणखणाटाने, असह्य उकाड्यात गरगरा फिरणाऱ्या पंख्याच्या घरघराटाने अस्वस्थपणे कटलेली असते. हातावर पोट असलेल्या श्रमिकांच्या वस्त्यांप्रमाणेच ऐश्‍वर्यवानांचे बिलोरी काचमहालदेखील निर्ममपणे नांदवणाऱ्या मुंबईला अधिकृत रात्रजीवनाचे वरदान नव्हते. नव्या योजनेमुळे ते अंशतः का होईना मिळेल! नव्या नियमानुसार ठरावीक भागातील मॉल्स, हॉटेल्स, पब्ज, खाऊगल्ल्या आणि दुकाने रात्रभर खुली राहतील. तूर्त अनिवासी भागातच ही योजना राबवली जाणार असल्याने कुणाच्या रात्रीच्या झोपेचे खोबरे होणार नाही, असे मानायला हरकत नाही. प्रश्‍न उरला तो सुरक्षिततेचा. सव्वीस- अकराच्या अतिरेकी हल्ल्यात पोळलेली मुंबई अजूनही तो भयचकित करणारा अनुभव विसरलेली नाही. रात्री-अपरात्री महिलांना एकटा-दुकटा प्रवास आजदेखील मुंबईत भरवशाचा मानता येत नाही. अशा परिस्थितीत नव्या योजनेमुळे उद्‌भवणाऱ्या परिस्थितीत सुरक्षेबाबत पोलिसांना विशेष प्रयत्न करावे लागतील. आदित्य ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी हट्टाने दक्षिण कोरियातून पेंग्विन आणून भायखळ्याच्या जिजामाता उद्यानात ठेवले होते, ते पेंग्विन आज गर्दी खेचत आहेत. मुंबईच्या रात्रजीवनाचा ‘पेंग्विन’ अशीच बरकत घेऊन येवो.