
अग्रलेख : टक्का अन् धक्का
कितीही गंभीर स्वरुपाचे आरोप झाले तरी खुर्चीला चिकटून राहण्याची आपल्या राजकारणातील रीत पाहता भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याबद्दल मुख्यमंत्र्यांनीच आपल्या मंत्र्याला तडकाफडकी काढून टाकण्याची पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची कृती निश्चितच दखलपात्र ठरते. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप करत उभ्या राहिलेल्या आंदोलनातून तयार झालेल्या ‘आम आदमी पार्टी’ने आता नऊ वर्षांनंतरही आपले राज्य कारभाराबाबतचे आग्रह कायम असल्याचे दाखवून दिले आहे. ‘आप’ने पंजाबचे राज्य काँग्रेसकडून हिसकावून घेतले त्याला दोनच महिने झाले आहेत. या सरकारमध्ये आरोग्यमंत्रिपदी विराजमान झालेले विजय सिंगला यांची भ्रष्टाचाराचे आरोप होताच तातडीने मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर तेथील भगवंत मान सरकारने सिंगला यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्यास अटकही झाली आहे. सिंगला यांच्याविरोधात ठोस पुरावे आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. आपल्या देशात भ्रष्टाचाराचेच नव्हे तर गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप असलेली अनेक बडी धेंडे न्यायालयीन प्रक्रियेकडे बोट दाखवत खुर्च्या सोडायला अखेरच्या क्षणापर्यंत तयार नसतात, हे वेळोवेळी बघायला मिळाले आहे.
शिवाय, त्या त्या पक्षाचे प्रमुख नेतेही ‘अद्याप न्यायालयात आरोप सिद्ध झालेले नाहीत,’ असे सांगत या भ्रष्टाचाराचे वा गुन्हेगारी संबंधांचे आरोप असलेल्या मंत्र्यांची पाठराखण करताना बघायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर भगवंत मान यांनी कसलाही मुलाहिजा न राखता, सिंगला यांची तातडीने मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून एक चांगले पाऊल उचलले आहे. मान यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे ‘आपल्या डोळ्यात अश्रू उभे राहिले!’ अशी प्रतिक्रिया ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी देणे मग स्वाभाविकच होते. अर्थात, ‘आप’वर अशी वेळ पहिल्यांदाच आलेली नाही. २०१५ मध्ये ‘आप’ने भारतीय जनता पक्ष तसेच काँग्रेस या दोन्ही पक्षांना अस्मान दाखवत दिल्ली विधानसभेच्या ७० पैकी ६७ जागा जिंकून मोठा विजय मिळवला होता. त्यानंतर काही दिवसांतच केजरीवाल यांना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री असीम अहमद खान यांना भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावर मत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवणे भाग पडले होते. त्यानंतरच्या सात वर्षांत पुलाखालून यमुनेचे बरेच पाणी वाहून गेले आणि ‘आप’चे रूपांतरही प्रस्थापित पक्षात तर झाले नाही ना, अशा चर्चा सुरू झाल्या. मात्र, मान यांच्या या ताज्या निर्णयामुळे तशा चर्चांना तूर्त तरी पूर्णविराम मिळेल.
मात्र, पंजाबात अवघ्या दोन महिन्यांतच सिंगल यांनी जो काही ‘खेळ’ केला तो बघता, ‘आप’ची उमेदवारांची निवड चुकली तर नाही ना, असा प्रश्न विचारता येऊ शकतो. सिंगल हे (दाताचे) डॉक्टर आणि त्यामुळेच बहुधा आरोग्य खात्याची धुरा त्यांच्याकडे सोपवली गेली असणार. मात्र, अचानक एका अधिकाऱ्याने मान यांच्याकडे येऊन हे डॉक्टर महाशय आपल्या खात्यातील साहित्य खरेदी तसेच निविदा यामध्ये एक टक्का ‘कमिशन’ मागत असल्याचे सांगितले! मान यांनीही तातडीने पावले उचलली आणि ‘सापळा’ लावला. त्यावेळचे टेलिफोन संभाषण हे सिंगला यांच्यावरील आरोपांना पुष्टी देणारे ठरले. त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाली. एवढेच करून मान थांबलेले नाहीत तर आपल्याच सरकारच्या अखत्यारीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आता त्यांना अटकही झाली आहे.आपल्य नेत्यांचे ‘अर्थपूर्ण’ व्यवहार बघता, अत्यंत स्वागतार्ह अशीच ही बाब आहे आणि त्याबद्दल मान व केजरीवाल यांचे अभिनंदन करायला हवे. आता पुढच्या सहा महिन्यांत काही राज्यांत विधानसभा निवडणुका आहेत.
पंजाबातील यशानंतर या निवडणुकांतही ‘आप’ जोमाने उतरणार, असे चित्र आहे. त्यातही गुजरात या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या ‘होमपीच’वर ‘आप’ दणक्यात धावा काढणार, असे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर अवघे नऊ वर्षे इतकेच वयोमान असलेल्या पक्षातील सहकारी तसेच सत्तेच्या लालसेपोटी या पक्षाची दारे ठोठावणारे नवशे-गवशे यांना कोणत्याही परिस्थितीत भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, असा संदेशच ‘आप’ने दिला आहे. आता या घटनेकडे राजकीय पक्ष आपापल्या राजकीय गणिताच्या दृष्टिकोनातून पाहणार हे उघडच आहे. ‘आप’ने या कृतीतून आपले वेगळेपण दाखविण्याचा ठळक प्रयत्न केला आहे, त्यामुळे प्रस्थापित राजकीय पक्ष अस्वस्थ झाले तर नवल नाही. विविध प्रतिक्रियांवरून ही बाब स्पष्ट होते. त्यातही विरोधक सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करणार हे सगळे जणू ठरल्याबरहुकूम चालू आहे. पण भ्रष्टाचाराचे राजकीय कारणांसाठी आरोप करणे आणि खरोखरच हे आरोप सिद्ध होणे यात फरक आहे. मुळात प्रश्न हा राजकीय व्यवस्थेतून भ्रष्टाचाराच्या समूळ उच्चाटनाचा आहे. मान यांनी सिंगला यांच्यावर कारवाई केली ती त्यांच्यावरील आरोपांची खातरजमा झाल्यानंतरच. पंजाबातील विरोधी पक्षांमध्येही या विषयावरून दुफळी माजली आहे. ‘आप’ समर्थकांनी या निर्णयाचे स्वागत करणे आणि भाजप नेत्यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केलेली ही दिखाऊ खेळी असल्याची टीका करणे हे एकवेळ समजण्यासारखे आहे. मात्र, काँग्रेसमधील नवज्योत सिद्धू समर्थकांनी या निर्णयाचे स्वागत केल्यानंतरही काही आमदार या ‘खेळी’बाबत साशंक आहेत. तर दिल्लीतील काँग्रेस प्रवक्ते याकडे दुर्लक्ष करत आहेत. एक मात्र खरे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर मान यांचा हा निर्णय ‘आप’ची विश्वासार्हता वाढवणारा ठरू शकतो.
Web Title: Editorial Article Writes Aap Party Politics Punjab Bhagwant Mann
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..