esakal | अग्रलेख : प्रसिद्धूंचे प्रांगण! Congress
sakal

बोलून बातमी शोधा

Congress

अग्रलेख : प्रसिद्धूंचे प्रांगण!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मतभेदांच्या दऱ्या सांधण्यासाठी पक्षनेतृत्वाने प्रयत्न करायचे असतात. काँग्रेस पक्षश्रेष्ठींना त्यासाठी त्यांच्या कार्यपद्धतीत बदल करावा लागेल. अद्याप त्यांची तशी तयारी दिसत नाही.

राजकीय निरीक्षकांपासून ते हितचिंतकांपर्यंत आणि पक्षातील काही नेत्यांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत अनेक जण काँग्रेस पक्षाला ज्या काळात आत्मपरीक्षणाचे, कार्यशैली बदलण्याचे सल्ले देत आहेत, त्याच काळात पक्षनेतृत्व पठडी सोडणे तर दूरच; पण नवनव्या चुका करताना दिसत आहे. पंजाबात पक्षाची जी काही गोंधळलेली अवस्था समोर आली, त्याचे एक कारण या पठडीबद्ध निर्णयप्रक्रियेत आहे. त्यातूनच नवज्योतसिंग सिद्धूसारख्या विक्षिप्त व्यक्तीच्या महत्त्वाकांक्षांना हवा देण्यात आली. तत्कालिन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या विरोधात वातावरण तयार करण्यात तेच आघाडीवर होते. काही आमदारही त्यांच्यामागे होते, हेही तितकेच खरे. पण आजपर्यंत राजकीय क्षेत्रात भरीव असे काही सिद्ध न केलेल्या या सिद्धूंवर काँग्रेसच्या हायकमांडनेच वरदहस्त ठेवल्यानंतर त्यांच्या महत्त्वाकांक्षांचा वारू सुसाट सुटला. त्यांना थेट प्रदेशाध्यक्षपद दिले गेले. पण तेवढ्यावर ते खुश नव्हते.

आपल्याला मुख्यमंत्रिपदच दिले जाईल, असे त्यांना वाटत होते. निदान नव्या मंत्रिमंडळाच्या स्थापनेत आपला शब्द अंतिम राहील, अशी समजूत त्यांनी करून घेतली होती. तसे काही होत नाही, हे लक्षात येताच जेमेतम दोन-अडीच महिने सांभाळलेल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन ते मोकळे झाले. आता पंजाबच्या आणि तेथील सर्वसामान्य जनतेच्या हिताचे आपणच कैवारी आहोत, असा आव त्यांनी आणला आहे. पण राजीनामा दिल्याने हे हित कसे साधले जाणार आहे, हे त्यांनाच ठाऊक. आपल्या महत्त्वाकांक्षांना लोकहिताच्या तळमळीचे आवरण लावण्याचा हा दांभिकपण त्यांच्याकडे पुरेपूर आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना बाजूला करून दलित समाजातील व्यक्तीला मुख्यमंत्रिपद देण्याची राजकीय चाल खेळलेल्या काँग्रेस नेत्यांनी नवी घडी बसविल्याचा समाधानाचा सुस्कारा सोडण्याआधीच हा धक्का सहन करावा लागला. पण त्याला राजकीय व्यवस्थापनातील ढिसाळपणाच कारणीभूत आहे.

हिंदी पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर काँग्रेस पक्षाची पडझड सुरू असताना पंजाबसारख्या एका महत्त्वाच्या सीमावर्ती राज्यात या पक्षाची सत्ता असणे निश्चितच महत्त्वाचे आहे. त्यामुळे सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकांची तयारी जोमाने करणे, त्यासाठी पक्षसंघटनेत चैतन्य निर्माण करणे हे सगळे अपेक्षित होते. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे केंद्रातील भाजपच्या विरोधात तापलेले वातावरण, रोजगार निर्मितीअभावी असलेला असंतोष अशा काही प्रश्नांवर मुद्यांआधारित राजकारण पुढे नेण्याचा ‘राजमार्ग’ न स्वीकारता दरबारी राजकारण करण्याचा आणि प्रतीकात्मकतेला महत्त्व देण्याचा सोपा पर्याय प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांनी निवडलेला दिसतो. तेही एकवेळ आपत्कालिन परिस्थितीची सबब म्हणून समजून घेता येईल. पण मग जो पर्याय निवडला त्यात तरी सफाई दिसावी, तर तेही नाही.

वास्तविक राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस पक्षाला मोठी पिछेहाट सहन करावी लागल्यानंतर पक्षाचे अस्तित्व जाणवते, ते काही राज्यांतील सत्तेमुळे. त्यामुळेच राज्याराज्यांतील पक्षसंघटनेचे प्रश्न हाताळताना अधिक काळजी घ्यायला हवी. राज्यांच्या मातीतून स्वकर्तृत्वावर स्वाभाविकपणे पुढे येणाऱ्या नेतृत्वाच्या पायात खोडा घालणे, ही ‘चैन’ आता परवडणारी नाही. कॅप्टन अमरिंदरसिंग यांना बदलण्याचा निर्णय मुदलातच चुकीचा होता असे नव्हे. त्यांच्या कारभाराविषयी तक्रारी होत्या आणि त्यांचे वय विचारात घेता, किती तडफेने ते विधानसभा निवडणुकीत पक्षाला विजय मिळवून देतील, याविषयी साशंकता होती. शिवाय प्रस्थापितविरोध हा आपल्या निवडणुकीतील एक घटक असतो. तो प्रभाव कमी करण्यासाठीदेखील असे काही करण्याची गरज होती. पण त्याची वेळ पूर्णतः चुकीची होती. नव्या मुख्यमंत्र्याला आपला ठसा उमटविण्यासाठी किमान कालावधी तरी द्यायला नको काय? एकूणच अशा पद्धतीच्या वरवरच्या राजकारणामुळे पोकळी निर्माण होते. ती तशीच राहात नाही. ती भरून काढायला कोणीतरी पुढे येतेच. त्यातच अमरिंदसिंग बुधवारी भारतीय जनता पक्षाचे नेते, गृहमंत्री अमित शहांना भेटले आहेत. त्यामुळे पंजाबच्या क्षितिजावर नव्या समीकरणांची जुळवाजुळव होते का, हेही पाहावे लागेल.

पंजाबातही अकाली दल, भाजप यांच्याबरोबरच आम आदमी पक्षाचे आव्हानही ठळक होत चालले आहे. त्याला तोंड देण्यासाठी पक्षाची एकसंध फळी उभी करण्याकडे नेतृत्वाने लक्ष द्यायचे असते. समोर एक समान ध्येय ठेवायचे असते. मतभेद असतातच; पण ते विकोपाला जाऊन त्यातून फाटाफुटीचे उद्रेक होणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागते. पंजाबात मात्र नेमके उलटे घडले. माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग, नवे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी, सिद्धू, अंबिका सोनी, सुनील जाखड, सुखजिंदर रंधवा असे गट तयार झाल्याचे चित्र तेथील घडामोडींमुळे समोर आले आहे. आधीच अंतर्गत धुसफुसीने त्रस्त पक्षसंघटनेत एकोप्याची भावना निर्माण व्हायच्या ऐवजी चिरफाळ्या उडाल्याचे चित्र निर्माण झाले. सरकारमध्ये बदल होत आहे म्हटल्यावर सत्तेचा वाटा मिळावा म्हणून अनेकांची धडपड सुरू झाली. राजकारणात ते स्वाभाविकही असते. पण अशावेळीच समन्वय आणि समतोल कसा निर्माण करायचा, याची कसोटी लागते. लोकशाहीच्या हितासाठी मजबूत विरोधी पक्ष ही देशाचीही गरज आहे. ती तीव्रतने जाणवत असताना काँग्रेसचे श्रेष्ठी आपल्या कोशातून बाहेर पडण्याची तयारी दाखवित नाहीत, हा खरा चिंतेचा मुद्दा आहे. एकेकाळी कार्यकर्त्यांचे जाळे असलेल्या काँग्रेस पक्षात सध्या प्र‘सिद्धूं’चा सुळसुळाट झाला आहे. यात बदल घडविण्यासाठी आणखी काय काय घडण्याची प्रतीक्षा केली जाणार आहे?

loading image
go to top