अग्रलेख : प्रकाशमय पहाट...

एका विचित्र आजाराची महासाथ काय करू शकते, याचा सर्वस्पर्शी अनुभव आपल्या देशासह साऱ्या जगाने घेतला आहे, घेत आहे.
Construction
ConstructionSakal

एकूण देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) झालेली वाढ आशेची किरणे घेऊन आलेली आहे. बांधकाम आणि उत्पादन क्षेत्रातील झेप सुवार्ता देत आहे. कोरोनासारखी महासाथ आली तरी थांबता कामा नये, अर्थचक्र अव्याहत राहिले पाहिजे, हेच खरे.

एका विचित्र आजाराची महासाथ काय करू शकते, याचा सर्वस्पर्शी अनुभव आपल्या देशासह साऱ्या जगाने घेतला आहे, घेत आहे. कोरोनाच्या या महासाथीच्या सावटाखाली गेले सुमारे दीड वर्ष आपण सारे वावरत आहोत. या साथीला आटोक्यात आणण्यासाठी दीर्घकाळ लागू केल्या गेलेल्या लॉकडाउनमुळे साऱ्यांचीच आर्थिक गणिते बिघडवली. त्याला आपला देशही अपवाद ठरला नाही. लॉकडाउनमुळे सारे उद्योगधंदे ठप्प झाले, त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम रोजगारावर होत गेला, लोकांच्या उत्पन्नावर होत गेला. पर्यायाने देशाच्या अर्थचक्राला खीळ बसवून गेला. सुमारे दीड वर्षाच्या या विचित्र, अस्थिर आणि अनपेक्षित कालखंडानंतर कोरोनाची भीती आजही कायम असली, तरी लॉकडाउनचे निर्बंध शिथिल होत असताना काही आशेचे किरणही दिसू लागले आहेत. त्यापैकीच महत्त्वाचा घटक म्हणजे एकूण देशांतर्गत उत्पादन अर्थात ‘जीडीपी’! चालू आर्थिक वर्षाच्या (२०२१-२२) पहिल्या तिमाहीत म्हणजे एप्रिल ते जून या कालावधीत देशाचा जीडीपी २०.१ टक्क्यांनी वाढल्याची सुवार्ता राष्ट्रीय सांख्यिकी संघटनेने (एनएसओ) नुकतीच दिली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या (२०२०-२१) याच तिमाहीत कोरोनाच्या पहिल्या लाटेतील कडक लॉकडाउनमुळे आपला जीडीपी २४.४ टक्क्यांनी घटला होता. त्या ऐतिहासिक घसरणीची चर्चाही बरीच झाली होती. त्या पार्श्वभूमीवर चालू वर्षाच्या तिमाहीतील वाढ निश्चितच सुखावणारी आणि आशेचा किरण जागवणारी आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेची तब्येत दर्शविणाऱ्या प्रमुख निकषांत जीडीपीचा समावेश होत असल्याने, या ताज्या आकडेवारीचे महत्त्व अधिक आहे. देशाच्या अर्थचक्राचे, प्रगतीचे चाक पुन्हा फिरू लागल्याचे थेट संकेत यातून मिळाले आहेत आणि ते फक्त उद्योगधंद्यांसाठीच नव्हे, तर तमाम जनतेसाठीही दिलासादायक आहेत. अर्थात, यामुळे फार भारावून जाण्याचेही कारण नाही. कारण गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील कमी आकडेवारीच्या पायावर (लो बेस) नोंदली गेलेली ही वाढ आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. गेल्या वर्षी एप्रिल ते जून या काळात अत्यंत कडक लॉकडाउन होते, त्यामुळे आर्थिक आघाडीवर कमालीची घसरण होणार, हे अपेक्षितच होते, तशी ती दिसून आली. यंदा हे चित्र बदलेल, असे वाटत असतानाच कोरोना महासाथीच्या दुसऱ्या लाटेचे संकट सामोरे ठाकले होते. आर्थिक वर्षाच्या प्रारंभीच याची सुरुवात झाल्याने, पुनश्च लॉकडाउन आणि पुनश्च घसरणीची भीती व्यक्त होऊ लागली होती.

रोजगार आणि कौटुंबिक उत्पन्नही घटले होते. इतिहासाची पुनरावृत्ती होणार, असे वाटू लागले होते; पण अर्थव्यवस्थेतील काही क्षेत्रांत हालचाल वाढली होती, ती कदाचित सर्वांना ठळकपणे नजरेत भरली नसेलही; मात्र त्याचे प्रतिबिंब आताच्या सकारात्मक आकडेवारीतून उमटलेले आहे. विविध अर्थतज्ज्ञांच्या सर्वेक्षणानुसार, या तिमाहीत जीडीपी २० टक्के वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती, तर रिझर्व्ह बँकेनेदेखील या तिमाहीत जीडीपी २१.४ टक्के वाढण्याचा अंदाज व्यक्त केला होता. जीडीपीच्या या वाढीत सर्वांत मोठा वाटा बांधकाम क्षेत्राने उचलला आहे. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी बांधकाम क्षेत्र ६८.३ टक्के वाढले आहे. मागील वर्षी हेच क्षेत्र ४९.५ टक्क्यांनी आक्रसले होते. तेथून घेतलेली ही झेप निश्चितच दखल घेण्यासारखी आणि पायाभूत सोयी-सुविधा क्षेत्राचा महत्त्वाचा घटक असलेल्या बांधकाम क्षेत्राला मोठा दिलासा देणारी आहे. त्याखालोखाल उत्पादन क्षेत्रानेही या तिमाहीत चांगली वाढ नोंदविली आहे.

त्यातील वाढ अर्थव्यवस्थेला गतिमान करत असते. मागील वर्षी ३६ टक्क्यांनी घटलेले हे क्षेत्र या वर्षी ४९.६ टक्के वाढले आहे. मागणीच्या अपेक्षित वाढीला पूरक असणाऱ्या या क्षेत्राकडून पुरवठ्याची दरी भरून निघण्यास यामुळे निश्चितच मदत होणार आहे. व्यापार, हॉटेल, वाहतूक, दूरसंचार हे व्यवसाय गेल्या वर्षी एप्रिल ते जूनदरम्यान ४८.१ टक्के रोडावले होते; तर या वर्षी ते ३४.३ टक्क्यांनी झेपावले आहेत. सुगीची ही चुणूक असली तरी ही क्षेत्रे पूर्वपदावर येण्यास आणखी अवधी लागणार, हे निश्चित आहे. कृषी क्षेत्रानेही आपली परंपरा कायम राखताना यंदाही आपला अपेक्षित वाटा उचलला आहे. थोडक्यात, सततच्या अंधकारमय नकारात्मक वातावरणातून आता प्रकाशमय पहाट उजाडताना दिसत आहे.

पहिल्या तिमाहीतील आकडेवारी दिलासादायक असली, तरी देशाच्या विकासचक्राला गती देण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर असेल. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे दोन महिने आता उलटून गेले आहेत. त्यातच आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. पण सध्यातरी जागतिक बाजारपेठांतून मागणी वाढत आहे, परकी गुंतवणुकीचा ओघही वाढताना दिसत आहे. सिमेंट, स्टील आदी अनेक उद्योगांत खासगी गुंतवणूक येत आहे, तर दुसरीकडे आपली निर्यात लक्षणीयरीत्या सुधारत आहे. ‘जीएसटी’चे संकलनही मोठा आधार देत आहे, कंपन्यांचे उत्पन्न आणि पर्यायाने नफ्याचे आकडे वाढत आहेत. त्याचे प्रतिबिंब आपल्या भांडवली बाजारात उमटत आहे. या साऱ्या आशादायी घटनांच्या निमित्ताने विकासाचे नवे पर्व सुरू होण्याची आशा बाळगता येईल आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने धक्का न दिल्यास, जीडीपीचा वर्षअखेरीचा अपेक्षित दुहेरी आकडाही गाठला जाऊ शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com