esakal | अग्रलेख : लाटांशी झुंजताना सावधान!
sakal

बोलून बातमी शोधा

Doctors

अग्रलेख : लाटांशी झुंजताना सावधान!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दुसऱ्या लाटेचा अंदाज घेण्यात आणि त्यामुळेच प्रतिबंधात्मक उपाय योजण्यात अपयश आले. पण त्या चुका आता पुन्हा होऊ नयेत, याची काळजी घेतली पाहिजे. सध्याच्या परिस्थितीत अखंड सावधानता बाळगली पाहिजे. तरच ितसऱ्या लाटेच्या तडाख्याला तोंड देता येईल.

कोरोना विषाणूच्या पहिल्या हल्ल्यातून आपण काहीसे बाहेर आलो, असल्याचे चित्र साधारणपणे चार महिन्यांपूर्वी भारतात उभे राहिले, तेव्हा आपण आपलीच पाठ ठोपटून घेत होतो. मात्र, त्यानंतर पुन्हा ‘गनिम’ हल्ला चढवणार की नाही, याबाबत आपण पूर्णपणे गाफिल राहिलो, याची प्रचीती आता या विषाणूच्या दुसऱ्या लाटेने उडवून दिलेल्या हाहाकारामुळे आली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे विज्ञानविषयक सल्लागार डॉ. के. व्ही. विजयराघवन यांनी या विषाणूच्या तिसऱ्या लाटेबद्दल आपल्याला वेळेतच सजग केले आहे. निदान आता तरी आधीच्या चुका टाळायला हव्यात. विषाणूच्या अचानक झालेल्या प्रतिहल्ल्यामुळे देशातील सार्वजनिक तसेच खाजगी आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली आहे आणि बाधितांचे तसेच मृतांचे आकडे रोजच्या रोज नवे उच्चांक प्रस्थापित करत आहेत. खुद्द पंतप्रधानांनी या हल्ल्याचे वर्णन ‘ही दुसरी लाट नसून ते वादळ आहे,’ अशा शब्दात केले आहे. तेव्हा पहिली लाट ओसरू लागताच आपण काय चुका केल्या ते ध्यानात घ्यावे लागते. कोरोनाच्या पहिल्या लाटेचा सामना करताना आपण अनेक जम्बो कोविड उपचार केंद्रे उभारली होती आणि त्यात आपल्या आरोग्यसेवकांनी अथक प्रयत्नांनी अनेकांना कोरोनाच्या कराल दाढेतून बाहेर काढले होते. मात्र, त्यानंतर अशा अनेक केंद्रातील व्यवस्था कुठे बंद केली गेली, तर कुठे त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे ती नादुरुस्त झाली. कोरोनाची दुसरी लाट सर्वशक्तिनिशी चाल करून आली तेव्हा गेल्या एप्रिल-मे मध्ये उभारलेले ‘आयसीयू बेड्‍स’ दुसरी लाट आली तोपावेतो ४६ टक्यांनी कमी झालेले होते तर ‘ऑक्सिजन बेड्‍स’च्या संख्येत ३६ टक्क्यांची घट झाली होती. त्यामुळेच या हल्ल्याचा सामना करताना सारी यंत्रणा प्रथम त्या त्या पायाभूत सुधारणा उभारण्यातच अडकून पडली. त्यामुळेच डॉ. विजयराघवन यांनी वेळेतच दिलेल्या या इशाऱ्याचा सर्वांनीच गांभीर्याने विचार करायला हवा.

आता हा इशारा देणाऱ्या वैज्ञानिकांना आपल्या देशातील दुसऱ्या लाटेचा अंदाज मात्र आला नव्हता आणि तशी स्पष्ट कबुलीही डॉ. विजयराघवन यांनी दिली आहे. पहिल्या लाटेनंतर संसर्ग कमी कमी होत गेला, तेव्हा समूह प्रतिकारशक्ती निर्माण झाली, असे वाटू लागले होते. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नव्हते आणि त्यामुळेच या प्रतिहल्ल्यात बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तिला आटोक्यात आणण्यासाठी सर्वशक्तिनिशी प्रयत्न करावे लागतील. एकीकडे लसीकरणाला वेग, दुसरीकडे औषधोपचार आणि पुरेशा ऑक्सिजनची जिथे गरज आहे तिथे वेळीच पुरवठा यांना या प्रयत्नांत प्राधान्य हवे. ऑक्सिजन वितरणाच्या बाबतीत मुंबई महापालिकेने यासंदर्भात बजावलेल्या कामगिरीची दखल सर्वोच्च न्यायालयानेही घेतली असून ‘ऑक्सिजन नियोजनाबाबत मुंबई महापालिकेकडून काही धडे घ्या,’ असा सल्लाही केंद्र सरकारला दिला आहे. सध्या देशाची राजधानी असलेली दिल्ली आणि त्यालगतचे उत्तर प्रदेश हे सर्वात मोठे राज्य येथे या विषाणूने खऱ्या अर्थाने हाहाकार माजवला असून ऑक्सिजनअभावी अनेकांना आपले प्राण हकनाक गमवावे लागत आहेत. ऑक्सिजनचा ‘बफर स्टॉक’ उभारण्यासंदर्भात केलेल्या सूचनेकडे दुर्लक्ष झाले आणि त्याचेच परिणाम आज दिसत आहेत, असा टोलाही सर्वोच्च न्यायालयाने लगावला आहे. एक कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या मुंबईत हे शक्य झाले तर मग त्याचे अनुकरण दिल्लीत का होत नाही, हा सर्वोच्च न्यायालयाला पडलेला प्रश्न आहे. अर्थात, दिल्लीत मुंबई महापालिकेसारखी एकछत्री प्रशासकीय यंत्रणा नाही, हेही त्याचे एक कारण असू शकते. दिल्लीत अधिकार नसलेले केजरीवाल सरकार, सर्व अधिकार केंद्रित झालेले नायब राज्यपाल आणि शिवाय केंद्र सरकार यांच्यातील विसंवादाचाच फटका नागरिकांना बसत आहे, हे उघड आहे.

खरे तर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या विषाणूचा सामना करण्यासाठी एक सर्वपक्षीय तसेच तज्ज्ञांचा समावेश असलेली समिती नेमण्याची सूचना काही दिवसांपर्वीच केली होती. तर आता भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली एक आरोग्यविषयक यंत्रणा उभारावी, असा घरचा आहेर दिला आहे. त्यापलीकडची बाब म्हणजे बेड्‍स, ऑक्सिजन तसेच औषधे यांचा कमालीचा तुटवडा यामुळे सर्वसामान्य जनता कमालीची हैराण झाली आहे. त्यामुळे आता गेल्या वर्षभरातील अथक कामगिरीमुळे थकलेली आरोग्य यंत्रणा आणि मुख्य म्हणजे डॉक्टर तसेच आरोग्यसेवक यांना बळ देण्याचे काम केंद्र तसेच राज्य सरकारांना करावे लागणार आहे. विज्ञान सल्लागारांच्या इशाऱ्यामुळे घबराट निर्माण होण्याचे कारण नसले तरी हलगर्जीपणा परवडणारा नाही, एवढा धडा मात्र घ्यायलाच हवा. आपल्यापुढील संकट समान स्वरुपाचे आहे, हे ओळखून या कोरोनाविरुद्धच्या लढाईला सगळ्यांनी एकत्र येऊन मुकाबला करायचा आहे, असे सहमतीचे वातावरण तयार व्हायला हवे. मोदी सरकारने त्यासाठी पुढाकार घ्यावा. आत्ताचा काळ श्रेय-अपश्रेयाचे हिशेब मांडण्याचा नाही.

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा