esakal | अग्रलेख : झिंग झिंग झिंगाट! Drugs
sakal

बोलून बातमी शोधा

Aryan Khan

अग्रलेख : झिंग झिंग झिंगाट!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कमी वयात मिळालेला अमाप पैसा आणि प्रसिद्धी तमोगुणांचे एक लटांबरही घेऊन येते. त्यातून स्वैराचाराचा वारू बेलगाम सुटतो. पण महत्त्वाचे आहे, ते या निमित्ताने एका गंभीर दुखण्याकडे समाजाचे लक्ष वेधले जाणे.

सोळा महिन्यांपूर्वी कुण्या एका सुशांतसिंह राजपूत नावाच्या अभिनेत्याचा गूढ मृत्यू झाला. त्यानंतर जणू आग्यामाशांचे मोहोळ उठावे आणि त्याने नजीकची वाडीवस्ती अक्षरश: फोडून काढावी, तसे काहीसे आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीचे झाले आहे. सुशांतसिंह याने आत्मघात करुन घेतला की त्याची हत्या झाली? तो अंमली पदार्थांच्या आहारी गेला होता का? वगैरे प्रश्नांची उत्तरे तपास यंत्रणांनाही धड मिळालेली नाहीत. पण त्याच्या पश्चात चित्रपटसृष्टी मात्र परिस्थितीचे दणके खाताना दिसते आहे. हिंदी जगतातला सुपरसितारा शाहरुख खान याचा ज्येष्ठ पुत्र आर्यन खान याला ऐन गांधी जयंतीच्या ‘कोरड्या’ दिवशी मुंबईच्या किनाऱ्यालगतच्या समुद्रात, एका आलिशान जहाजावरल्या नशिल्या पार्टीत रंगेहाथ पकडण्यात आले. हा कोवळा लक्ष्मीपुत्र त्याच्या दोस्तमंडळींसह सध्या अंमलीपदार्थ नियंत्रण विभाग, म्हणजेच ‘एनसीबी’च्या कोठडीची हवा खात आहे.

दिल्ली आणि मुंबईतली धनाढ्यांची तरुण मुले-मुली या रंगारंग जहाजपार्टीत सामील झालेली होती. या पार्टीचे तिकिटच मुळी साठ हजार ते सहा लाखाच्या घरातले होते. या पार्टीप्राण्यांपैकी काही जणांपाशी अंमली पदार्थ सापडल्याचे सांगण्यात येते. मद्याच्या आहारी जाऊन आपल्या आयुष्याची माती करुन घेतलेले दुर्दैवी कलावंत चंदेरी दुनियेत कमी नाहीत. परंतु, आता मद्य ही बाब जणू किरकोळ वाटावी, अशी स्थिती आहे. हशीश, वीड, कोकेन, हेरॉइन, एमडी, क्रिस्टल मेथ असली भलभलती अंमली पदार्थांची नावे परिचित होऊ लागली आहेत. हे घातक पदार्थ सेवन करणारे कलावंत आणि त्यांची कुलंगडी समाजमाध्यमांवर यथेच्छ चघळली जाऊ लागली आहेत.

फिल्मी नियतकालिके आणि मनोरंजन वाहिन्यांना तर चरायला कुरणच उपलब्ध झाले. आर्यन खान ही त्या सेलेब्रिटीसाखळीतील अगदी अलिकडली कडी. ‘एनसीबी’च्या तपासात खरे-खोटे काय ते बाहेर येईलच; पण मुद्दा हा आहे की, हा कुणीएक आर्यन नावाचा तरुण जर शाहरुखपुत्र नसता तर माध्यमांनी एवढा ‘सोहळा’ केला असता का? तपास यंत्रणांनी तरी एवढा ‘कार्यक्रम’ केला असता का? कुण्या मस्तवाल नेत्याच्या गाडीखाली चिरडल्या गेलेल्या शेतकऱ्यांपेक्षा स्टारपुत्राच्या कथित कारनाम्याला बातम्यांमध्ये ठळक स्थान मिळाले…हे घडले असते का? समाजमाध्यमांवर लाखोंच्या संख्येने भल्याबुऱ्या प्रतिक्रिया उमटल्या असत्या का? या सर्व प्रश्नांचे उत्तर नकारार्थी आहे.

चित्रसृष्टीचे दिखाऊ जग हे चाहत्यांच्या भावनिक प्रतिसादावरच जगत असते. ‘बदनामी में भी नाम तो है…’ अशा मानसिकतेतच बव्हंशी हे विश्व वावरते. ‘कलावंत म्हणजे नीतिमत्तेच्या बाबतीत ढिली जमात’ हा दृष्टिकोन बराचसा बुरसटच म्हणायला हवा. दुर्दैवाचा भाग असा, की हा पारंपरिक दृष्टिकोन बदलण्याच्या भानगडीत हे झगमगते जग कधीही पडत नाही.

काही सन्मान्य अपवाद वगळले तर हमेशा ग्लॅमर आणि पैसा या दोहोंच्या मागे लागलेल्या या सिताऱ्यांच्या जगाला अनैतिकता जणू अंगवळणीच पडली असावी. कमी वयात मिळालेला अमाप पैसा आणि प्रसिद्धी तमोगुणांचे एक लटांबरही घेऊन येते. त्यातून स्वैराचाराचा वारू बेलगाम सुटतो. त्यातही बॉलिवुड हे समाजासाठी नेहमीच दुबळे लक्ष्य म्हणजेच सॉफ्ट टार्गेट राहिलेले आहे. पण महत्त्वाचे आहे, ते या निमित्ताने एका गंभीर दुखण्याकडे समाजाचे लक्ष वेधले जाणे. चर्चा आणि कृती व्हायला हवी ती त्या दिशेने. तशी ती झाली तर हा विषय केवळ कायदा आणि त्याची अंमलबजावणी करणाऱ्या;तसेच तपास करणाऱ्या यंत्रणांपुरती सीमित नाही, हे वास्तव ठळकपणे समोर येईल. योग्य काय अयोग्य काय, काय घ्यायचे, काय टाकायचे, याचा नीरक्षीर विवेक कळत-नकळत मनावर बिबविणाऱ्या गोष्टी समाजातून कमी होत आहेत का, हा मुळातला प्रश्न आहे. व्यसनाधीनतेचा प्रश्न केवळ सेलिब्रिटींचा, बॉलिवूडचा आणि लक्ष्मीपुत्रांचा नाही. समाजाच्या सर्व स्तरांत ते संकट आहे. समस्येचे विष समाजात खोलवर जाण्याआधीच समाजातली संस्कारकेंद्रे पुन्हा सक्रिय करण्याची गरज आहे. विचार व्हायला हवा तो या आव्हानाचा.

अंमली पदार्थांचा विळखा ही एक गंभीर जागतिक समस्या आहे, आणि तरुण पिढीला बरबाद करणारी ही विषवल्ली दिसताक्षणी ठेचलीच पाहिजे. आर्यन खान आणि त्याच्या मदोन्मत्त मित्रांचे काय करायचे ते न्यायव्यवस्था ठरवेलच. पण अशावेळी खरेतर नायक-नायिकांनी आपले जाहीर वर्तन शक्य तितके सुसंस्कृत ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण याच हिरोंना कोवळी पिढी आपले आदर्श मानत असते. अर्थात, बॉलिवुड हा काही संस्कारवर्ग नव्हे; पण जेव्हा ‘ चित्रिकरणात बिझी असलेल्या माझ्या वडलांना भेटण्यासाठी अपॉइण्टमेंट घ्यावी लागते’ असे आर्यन खानसारखा स्टारपुत्र आपल्या कथित कबुलीजबाबात सांगतो, तेव्हा मात्र मन चरकते. वाटते, हे सारे कुठल्या दिशेने चालले आहे? गडगंज ऐश्वर्य आणि अनिर्बंध स्वातंत्र्य हे स्वैराचाराचे परमिट आहे का? आर्यन खानच्या नशिल्या पार्टीचा किस्सा हा रंगवून सांगण्याजोगा नाही, उलटपक्षी यानिमित्ताने घराघरातील पालकांनी अंतर्मुख होऊन विचार करायला हवा आहे. एक़ा सुपरस्टारचे गर्भश्रीमंत पोरगे शेवटी खडकावरल्या झुडपासारखेच स्वैर, मशागतीविना वाढणार असेल, तर मग असल्या व्यवस्थेला अर्थच काय उरला? या प्रश्नाचे उत्तर ज्याचे त्याने मनातल्या मनात शोधायला हवे. आर्यन खानच्या अटकेतून आपल्याला शिकण्याजोगे फक्त एवढेच आहे. बाकी सगळा झिंग झिंग झिंगाट म्हणायचा, आणि सोडून द्यायचे.

loading image
go to top