अग्रलेख : ...किनारा तुला पामराला!

कोरोना विषाणूच्या जगद्‌व्यापी हाहाकारामुळे सर्वच क्षेत्रांत पीछेहाट झाली, त्यात क्रीडा क्षेत्रदेखील होरपळले.
Paralympic Competition
Paralympic CompetitionSakal

मानवी देहमनाच्या क्षमतेचा कस पॅरालिंपिकमध्ये लागत असतो. शरीराने असहकार पुकारला तरी झुंजण्याच्या जिद्दीच्या बळावर यशाला गवसणी घातली जाते आणि ती सगळ्यांना प्रेरणेचा नवा स्रोत बनते, हीच या स्पर्धेची मोठी जमेची बाजू आहे.

कोरोना विषाणूच्या जगद्‌व्यापी हाहाकारामुळे सर्वच क्षेत्रांत पीछेहाट झाली, त्यात क्रीडा क्षेत्रदेखील होरपळले. घरातून बाहेर पडायचे नाही आणि त्यातूनही पडावे लागलेच तर नाका-तोंडाला ‘कुलूप’ (मास्क) लावायचे, हा परिपाठ बनून गेला. अशा परिस्थितीत मैदानावरचे रांगडे खेळ खेळायचे कसे? लहानांपासून ते दिग्गजांपर्यंतच्या खेळाडूंचा श्वास या मास्कने प्रदीर्घकाळ कोंडला. कोरोनाच्या वर्चस्वाला अक्षरश: झुगारून देत जपानमधल्या टोकियो ऑलिंपिक क्रीडा सोहळ्यात देशोदेशीच्या खेळाडूंनी आपला हुन्नर दाखवला. कधी नव्हे तो, त्या भारतीय ऑलिंपिकवीरांनीही तेथे कमाल केली. त्यांच्या यशोगाथा अजूनही बातम्यांचे विषय बनत आहेत. ऑलिंपिकच्या इतिहासात प्रथमच भारताच्या खात्यात सर्वाधिक सात पदकांची भर पडली. नीरज चोप्राने आपल्या सुवर्णभाल्याने इतिहास रचताना जणू ठणकावून सांगितले की, इच्छाशक्ती प्रबळ असेल तर महामारीलाही मात देता येते! नीरज चोप्रा, मीराबाई चानू, रविकुमार दाहिया यांसारख्या पदक विजेत्यांच्या पराक्रमांचे पोवाडे अद्याप विरले नसतानाच टोकियोत सुरू असलेल्या पॅरालिंपिक क्रीडा सोहळ्यातून विजयानंदाच्या आणखी आरोळ्या ऐकू आल्या. आपले दिव्यांग खेळाडू तिथेही मैदान गाजवत आहेत, ही बाब भारतीयांची मान अभिमानाने आणखीनच ताठ करणारी.

दिव्यांगांचे ऑलिंपिक ही तुलनेने नवी चळवळ म्हणावी लागेल. १९४८ मध्ये दुसऱ्या महायुद्धातील काही घायाळ सैनिकांनी एकत्र येऊन अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचे छोटेसे आयोजन केले होते. त्याला शानदार पॅरालिंपिकचे आधुनिक स्वरूप प्राप्त झाले, आणखी चाळीसेक वर्षांनी, १९८८ मध्ये उत्तर कोरियामधल्या सोल ऑलिंपिकमध्ये. कोणाचे हात नाहीत, कोणी पाय जमिनीवर टेकवू शकत नाही तर कोणाचा मणका तुटलेला, अशी एक ना अनेक व्यंग असलेले आणि तरीही आत्मविश्वासाचा कणा मात्र ताठच्या ताठ असलेले देशोदेशीचे खेळाडू पॅरालिंपिकमध्ये अशी काही देदीप्यमान कामगिरी करताना दिसतात की, धडधाकटांनाही ओशाळल्यागत व्हावे! कोरोनाच्या महासंकटामुळे हतबल झालेल्या, धीर खचलेल्या, जगण्याची उमेद हरपलेल्या सर्वांसाठीच ही फार मोठी प्रेरणा आहे. लहान वयात कधी पोलिओमुळे, तर कधी अपघातामुळे हात-पाय गमावले असले तरी झुंजण्याची जिद्द हे पॅरालिंपिकपटू दाखवतात, पदके जिंकून नवनवे आदर्श निर्माण करतात.

‘अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अन्‌ आशा... किनारा तुला पामराला’ असे थेट समुद्रालाच हिणवणारे कोलंबसाचे गर्वगीत या पॅरालिंपिकपटूंच्या गळ्यातून उमटते आहे, असा भास होतो. खरे तर या ठिकाणी पदके किती मिळवली सुवर्ण, रौप्य की ब्राँझ हे दुय्यम आहे. मानवी देहमनाच्या क्षमतेचा कस इथे खऱ्या अर्थाने दिसून येतो. मानवाच्या उत्क्रांतीची कारणे दृग्गोचर होताना दिसतात.  याआधीदेखील पॅरालिंपिक क्रीडास्पर्धा होत होत्या, आपले खेळाडू सहभागी होत होते. पदकेही मिळवत होते, पण आपण पडलो क्रिकेटवाले! पॅरालिंपिकपटूंच्या कर्तृत्वाकडे लक्ष द्यायला आपल्याकडे कुणाला फारशी फुर्सतच नव्हती. मीराबाई चानू ते नीरज चोप्रा यांनी अन्य खेळांकडे पहाण्याचा राष्ट्रीय दृष्टिकोनच बदलला आणि कालपर्यंत अवनी लेखरा, सुमित अंतिलसारख्या खेळाडूंनी तो दृढ केला. एकीकडे इंग्लंडमध्ये तिसऱ्या कसोटी सामन्यात दारुण पराभव होत असताना पॅरालिंपिक खेळाडूंनी मिळवलेले यश डोळ्यांत भरणारे ठरावे. चाकाच्या खुर्चीवर असतानाही जयपूर ते पनवेल असा प्रवास करून अवनी लेखरा ‘लक्ष्य’ या अकादमीत मेहनत घेते, तर कुस्तीपटू होता होता अपघातात पाय गमावलेला सुमीत अंतिल त्या अवस्थेत मोठी झेप घेण्याचे स्वप्न बाळगतो आणि पूर्णही करतो. जन्मानंतर काही महिन्यांत पोलिओ झालेली भाविना पटेल वयाच्या चौतिसाव्या वर्षी जग्गजेती होते. ही केवळ प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. त्यांनी पदके मिळवली म्हणून ते सर्वांच्या नजरेत आले, पण असा प्रत्येक दिव्यांग खेळाडू सर्वांसाठी  हिरोच आहे.

खेळाडूंसाठी सरावाचा एकेक दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. अशा परिस्थितीत कोरोनामुळे काळ शून्यावर येऊन थांबला. अर्थात, मैदान मारण्याच्या ऊर्मीने पेटलेल्या खेळाडूंना स्थळकाळाचे तसे भान उरत नाहीच. पॅरालिंपिकपटूंबाबत तर शरीरानेही असहकार पुकारलेला असतो. अशा परिस्थितीत अक्षरश: काही महिन्यांत त्यांनी आहारापासून सरावापर्यंत कशी तयारी केली असेल? कुठलीही क्रीडाव्यवस्था पुरेसे पाठबळ देण्यासाठी उभी नसताना त्यांनी आपल्यातील जिद्दीची मशागत कशी केली असेल? हा खरे तर अभ्यासाचा विषय ठरेल. कोणत्याही यशाच्या शिखरापेक्षा तिथपर्यंत जाण्याची एकेक पायरी ‘मेकिंग ऑफ चॅम्पियन’चा अध्याय लिहिणारीच असते. या प्रत्येक पॅरालिंपिक खेळाडूचा प्रवास सर्वत्र ठळकपणे जगासमोर यायला हवा. एक आत्मचरित्र दुसऱ्या आत्मचरित्राची प्रेरणा ठरू शकते. सुवर्णपदक विजेती घडवू शकते, याचे उदाहरण म्हणून अवनीचे नाव घ्यावे लागेल.

भारताचा पहिला वैयक्तिक ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्राचे आत्मचरित्र अवनीने वाचले आणि याच खेळात आपल्याला कारकिर्द घडवण्याचा तिने निर्धार केला. तेथूनच तिचा पॅरालिंपिकमध्ये विश्वविक्रमी पदकापर्यंतचा प्रवास सुरू झाला. या निमित्ताने भारतीय क्रीडा क्षेत्रात एक गोष्ट चांगली घडली. क्रिकेट किंचितसे मागे पडले आहे, आणि अन्य खेळांची चर्चा सुरू झाली आहे. मात्र हे प्रेम भरती-ओहटीप्रमाणे नसावे. आयपीएल किंवा ट्वेन्टी-२० विश्वकरंडक सुरू झाले की हे खरेखुरे हिरो मागे पडू नयेत, एवढीच अपेक्षा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com